गौरव गाथा तुझ्या लढ्याची
गहिवरूनी वसुधेवरी निनादते
जरा ऐक त्यातुनी अंगाई तिची
घेण्या कुशीत जी साद घालते
लाल देहाच्या हर एक तुकड्याने
उरातले प्रेम मातीत रंगवून गेलास
लढलास देशासाठी प्राणपणाने
शहीद नव्हे आज तू अमर झालास
रक्त गोठताना लाल, त्या बर्फावरी
कसा डगमगला नाही स्वाभिमान !
घायाळ तरी तू, पडला तुटुनी शत्रुवरी
जागवुनी या मातीवरला अभिमान
आता डोळ्यांत केवळ अश्रू उरले
अन् कंठांत राहिले काही सुर
वाघाचे काळीज बापाचे का झाले
तुझ्या तुकड्यांसोबत चुरचुर
कानी खबर तुझ्या अंताची येता
म्हातारा बाप चालता चालता पडला रे
कोवळी फुले तुझ्या देहावर वाहता
तो जीव तरुणरुपात तुझ्या जडला रे
पाठ थोपटून सदा बहिणीची
देत आलास तिला तू पाठबळ
राहिली भाऊराया राखी बांधायची
त्या विचारांनी मनी माजविली खळबळ
सवती सारखे युद्ध माथ्यावर आले
अन् स्वप्नांची झाली राखरांगोळी
वैधव्य युगांचे का या नशिबी आले
पुसल्यावरी कुंकू सजलेले कपाळी
दोन काळ्या मण्यांत केवळ आता
बांधले बंध साऱ्या आयुष्याचे तिने
सैनिकाची पत्नी होऊन मिरविता
ल्याले रंग सारे शुभ्र साडीत तिने
अर्ध्यावर सोडून डाव दोन घडीचा
माझा तू कायमचाच निरोप घेतला
जगण्याचा अमर जवानाची पत्नी बनून
कसा हा प्रसंग आज मजवरी बेतला
हातात घेऊन तुझी शौर्य पदके
शहिदाची लेक उभी राहिली
काय करावे पुरस्कारांचे लेकरांनी
छप्पर बापाचे जी हरवुन बसली
शौर्य पुरस्कारी सन्मानित मी
युद्ध झाले अन् संपूनही गेले
मरणोपरांत सन्मान मिळाला
पण लेकीचे कोडकौतुक करणे राहिले
आईच्या डोळ्यात अश्रूधारा अनावर
घेता पदक हाती एकसारखे वाहू लागले
मला पान्हा का फुटत नाही आज
बाळ माझे तिकडे उपाशी झोपी गेले
सुवर्णपदक घेतले झोळीत आईने
मात्र अश्रू झाले अनावर तिला
पदर जरी सजला सुवर्ण पदकाने
परंतु काळजाचा तुकडा मी गमावला
हवे कशाला हिंसक युद्ध हे जगा
माणुसकीचा नाही लवलेशही जिथे
नकोत असे हिंसाचार मन आर्जवे
नांदु गुण्यागोविंदाने सर्व एकत्र इथे
उजडतात मळे दोन्हीकडले
जळतात घरे तरुण फुलांची
रापली उन्हे युद्धाची आजवर
आता तहान जगास आहे प्रेमाची
नकोच आता युद्धाच्या गोष्टी
मानवतेचीच माणगंगा वाहो
नकोत हिंसाचार अन् बिबत्स
नकोत बलिदान जगी वावो
– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर!👌👌