निशिगंधाची फुले….
आपण आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची बरीच फुले पाहीली असतील आणि तयार सुद्धा केली असतील. आज मात्र आपण आपण निशिगंधासारखी नाजूक आणि आकर्षक फुले तयार करणार आहोत. ती सुद्धा कॅनव्हासच्या कापडापासून.
ही फुले तयार करण्यासाठी कॅनव्हासचे कापड घ्यावे. (शर्टची वगैरे कॉलर कडक राहावी म्हणून हे कापड वापरतात.) निशिगंधाच्या फुलाचा खालचा निमुळता भाग तयार करण्यासाठी या फुलांचा आकार लक्षात घेऊन त्रिकोणी आकाराचे कापड कापून घ्यावे. त्याला शंकूप्रमाणे लांबट गोलाकार आकार द्यावा. त्यांची टोके फेव्हीकॉलने चिकटवून टाकावीत. त्यामुळे ती उकलणार नाहीत. याप्रमाणे सात ते आठ फुलांसाठी आकार तयार करावे.
त्यानंतर फुलांच्या पाकळ्या तयार करण्यासाठी कॅनव्हासचेच कापड गोल गोल कापून घेऊन त्याला पाकळीप्रमाणे आकार देऊन कापून घ्यावीत. आता या पाकळ्या तयार झाल्या नंतर सुरुवातीला तयार केलेल्या निमुळत्या भागावर चिकटवून घ्याव्यात. चांगले सुकल्यावर रंगाने किंवा स्केचपेनचे पाकळ्यांचा आकार, पराग इत्यादी, देठाजवळील हिरवा भाग रंगवून फुलं आकर्षक करून घ्यावीत. आता ही फुले पूर्णपणे तयार होतील.
हिरव्या वेलव्हेट पेपरची लांब उभी पाने तयार करावीत. पाने सरळ उभी राहावीत म्हणून पानाच्या मागच्या बाजूने बारीक तार चिकटवून घ्यावा. नंतर जाड तार घेऊन त्याला हिरवा क्रेपकागद चिकटवून घेऊन सरळ फांदी तयार करावी. आता निशिगंधाच्या फुलांची ज्याप्रमाणे रचना असते तशी आकर्षकपणे फुले दोऱ्याने बांधून घ्यावीत. अशाप्रकारे तयार केलेली ही निशिगंधाची फुले फारच नाजूक आणि सुंदर दिसतात.
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेख कल्पना. सादरीकरणही छान.