स्ट्रॉ ची झोपडी
आगळ्यावेगळ्या प्रकारची घरं शोकेसमध्ये किंवा रुखवंतात ठेवण्यासाठी केली जातात. पण ह्या गोष्टी तयार करण्यासाठी भरपूर वेळ, मेहनत आणि साधन सामग्री लागते. त्यामुळे बऱ्याचदा हौस असूनही त्या करता येत नाहीत. पण ही स्ट्रॉ ची झोपडी मात्र अगदी कुणालाही जमेल अशीच आहे.
ज्या स्ट्रॉ चा उपयोग आपण सहसा लस्सी, सरबत वगैरे थंड पेय पिण्यासाठी करतो त्याच स्ट्रॉ ची ही सुंदर झोपडी आपल्याला तयार करावयाची आहे.
त्यासाठी सुरुवातीला ज्या आकाराची चौरस झोपडी तयार करावयाची आहे त्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा पुठ्याचा चौरस डब्बा घ्यावा. तो एका कार्डबोर्डवर चिकटवून त्यावरच एक त्यापेक्षा छोट्या आकाराचा दुसरा डब्बा चिकटवावा. या छोट्या डब्याचा उपयोग झोपडी करण्यासाठी होईल.
आता या डब्याला चारी बाजूने स्ट्रॉ व्यवस्थित आकाराने कापून चिकटवून घ्याव्यात. याप्रमाणे चारही भिंती तयार झाल्यानंतर छत तयार करण्यासाठी एका जाड कागदावर स्ट्रॉ चिकटवून चांगल्या सुकल्यावर मधोमध दुमडून स्ट्रॉ ला छतासारखा आकार द्यावा. फोटोवरून याची कल्पना येईलच.
या झोपडीचे दार व खिडक्या तयार करण्यासाठी जाड कागद त्या आकाराने कापून घेऊन चिटकवावा. त्यावर सुंदर रंग द्यावा.
सभोवतालचे कंपाऊंड सुद्धा स्ट्रॉ व्यवस्थित कापून तयार करावे. आपल्या आवडीप्रमाणे रंगाने झोपडी सजवावी. अशी ही स्ट्रॉ ची झोपडी दिसण्यास आकर्षक आणि नाविन्यपूर्ण नक्कीच वाटेल.
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छानच.
हे बघून आमच्या अम्मी ची आठवण आली.ती अशी स्ट्राची तोरणे बनवायची.
Beautiful.
सुंदर.