समस्त मित्रमंडळींना नववर्षाच्या अनेक अनेक अनेक शुभेच्छा💐
नि जोडीला हा 👇 वर्षाला केलेला “टा टा” ! ✋✋😀
निरोप
“आज्जी, काय करतेयस ?”
रोहिनच्या ह्या विशिष्ठ लाडीगोडीच्या स्वरावरून ‘बच्चमजींना स्वत:कडे माझं ‘ध्यान’ वळवायचंय’ हे ध्यानात आलं माझ्या.😊
“अरे, समिधा मावशीने होमवर्क दिलंय, तो ‘निरोप’ लिहितेय”
“काssय ??😲”
ह्याला एवढं कशाचं कोडं पडलंय ते समजेना. म्हणून मी लिहिणं क्षणभर थांबवून त्याच्या कडे बघितलं.
“आज्जी, ‘रोप‘ लिहितेयस ?
ते तर कुंडीत ‘लावूया’ असं म्हणतेस नेहमी.
मी व्हर्ब युज करायला चुकलो की मला मात्र रागावून लगेच कर्रेक्ट करतेस”
रोहिनचे फुगलेले गाल बघणं ही खरं तर आवडती गोष्ट आहे माझ्यासाठी. 😍
“मी ? मी कधी रे रागावले ?🤔”
“परवा नाही का तू निरांजन लावत होतीस ….
देवपूजा झाल्यावर…”
“हां मssग ! तेव्हा ‘आग पेटव’ असं म्हटलंस तू, म्हणून तुझी चूक दुरूस्त केली मी. त्यामुळे पहा, आत्ता तू कसं न विसरता बरोब्बर क्रियापद वापरलंस की नै ?आणि.. अरे मी ‘रोप’ नाही निरोप लिहितेय”
“निरोप ? म्हणजे ss??”
“म्हणजे ‘ मेसेज’ !“
“पण.. ! तो तर हल्ली सगळे टाईप करत असतात, राईट ?
तू लिहितेयस काय एवढं ss ?”
WhatsApp era मध्ये जन्मलेल्या ह्या पिढीला ‘write 😛 करणारा’ निरोप माहित नसणं तसं नॅार्मलच म्हणायला हवं !
‘ चलो, इस बहाने’ निरोपाची थोडी जुनी ओळख करून द्यावी रोहिनला असं मनात आलं .
(निरोपात खरं तर ‘जुनं’ नस्तं काही ! पण..)
“बरं का रोहिन, माझ्या लहानपणी निरोप- लिहित, सांगत, पाठवत, देत आणि घेतही असत. निरोप टाईप करणं माहितच नव्हतं आम्हाला.”
“ So many verbs ? फक्त एका निरोप ह्या नाऊनला ?”😲
“माझ्या लहानपणी बरं का रोहिन,
‘जा गं जरा समोरच्या चाळीत रहाणारया काकूंना किंवा वरच्या मजल्यावरच्या वहिनींना-माझा निरोप सांगून ये पटकन् ! आणि शब्दात बदल न करता अचूक सांगितलंस तर खाऊ देईन हातावर!’ अशी ॲार्डर सोडायची आई. मग काय, पटापट जाऊन निरोप सांगून येत असे मी.
ह्यात २ फायदे व्हायचे. ज्यांना निरोप देऊ त्या घरी देखिल हातावर लिमलेट- गोळी किंवा श्रीखंड वडी वगैरे असा गोड खाऊ हातावर ठेवित आणि ‘अचूक निरोप’ दिला की आई खाऊ देत असे तो निराळाच !”
“व्वा, आज्जी हे ‘सांगणं’ सही आहे. मग दुसरी सगळी व्हर्बज् ?”
“तेव्हा रिलेटिव्हजना निरोप फोन वर सांगावा असंही करता येत नसे कारण घरात फोन आहे, अशी घरं खूपच कमी .
त्यामुळे मग जर एखादा निरोप पोचवायचा असेल तर तो चिठ्ठीत वा पत्रात लिहावा लागे नि मग पोचवावा लागत असे”
“फोन्नच नसायचा ?😳”
‘इतकी बेसिक गरज पूर्ण न होता तुम्ही कसं राहू शकत होतात 🤔’ असं रोहिनचं एक्सप्रेशन बघतांना, खरं तर, फक्त पन्नासेक वर्षांपूर्वीची गोष्ट सांगत असून देखिल मला एकदम ‘Stone Age Man’ वालं फिलिंग आलं. 😄
“Hmmm ! पण निरोप सांगितल्यावर मिळणारया गोळीचा किंवा ‘अगदी एक्कही शब्द न विसरता सांगितलान् हो’ अशा कौतुकाचा आनंद काही वेगळाच असायचा. 😎 नंतर निरोपाची ओळख झाली ती समारंभातून ! शाळा संपताना ११ वीच्या परिक्षेआधी !”
“समारंभ म्हणजे ss ?”
“सेरिमनी ! मी म्हणतेय तो म्हणजे ‘निरोप समारंभ’ अर्थात्
- सेण्डॅाफ सेरिमनी !
इतक्या वर्षात शाळेशी नि मित्र-मैत्रिणींशी झालेल्या ॲटॅचमेंटला निरोप द्यायचा कार्यक्रम !
आत्ताच्या भाषेत सांगायचं तर तेव्हा खूप SAD 😔वाटलं होतं खरं ! पण…
पुढच्या हायर स्टडीज् चं रोप त्यानंतर उमलणार असल्याच्या आशेवर तो निरोप समारंभ देखिल छान साजरा झाला होता.
हां ! आता तेव्हा हे मात्र माहित नव्हतं हं की पुढे जाऊन निरोप टाईप करता येईल नि आम्हा सगळ्या शालेय मित्र-मैत्रिणींचा परत एकदा ग्रुप होईल. 😀”
“आणि…, ‘निरोप घ्यायचा’ म्हणजे काय आज्जी ?🤔”
एक्कही व्हर्ब विसरला नाही पठ्ठ्या !🤓
रोहिनशी मराठी गप्पा मारणं म्हणूनच तर रंगत जातं.☺️
“सुट्टी पडली की, किंवा कधी कधी नात्यातल्या कोणाच्यातरी लग्ना-मुंजीच्या निमित्ताने सग्गळे नातेवाईक नि आम्ही भावंडं एकत्र रहायला जमत असू.“
“सग्गळे ? n together ??😲”
‘ह्या एकत्रपणाच्या वैभवाला मात्र आज काळाच्या ओघात निरोप दिला गेलाय हे खिजगणतीतही नाहिये कोणाच्या ‘अशा नकारात्मक विचाराला मी कसोशीनं दूर लोटलं.
“ हुंss, खूप मज्जा येत असे. मग परत आपापल्या घरी यायची वेळ झाली की मात्र एकमेकांचा निरोप घ्यावा लागत असे. परंतु तेव्हाही ‘ परत भेटी’ च्या तारखा ठरवून मगच निरोप घेतला जाई.“
“आज्जी, मग आज आपण २०२४ चा निरोप घेताना काय म्हणायचं ? 😃”
मध्येच असा चहाटळपणे बोलतो नं हा की सावध रहावं लागतं.🧐
“प्रश्न छानै !! टाटा/ बाय बाय २०२४ !!!! पण.. ‘परत भेटूया’ असं मात्र म्हणता येणार नाही हं !! “😀😀
“Yess !👍पण .. आता आपला लंच टाईम कधी सुरू करायचा आजी ?”
“लग्गेच !! 👍सगळं तय्यार आहे.
पण जेवायला बसायच्या आधी समईला ‘निरोप’ देते नि मग सुरूवात करू, चालेल रोहिन ?”
“समईला पण ‘निरोप’ ?😲”
“रोहिन, असंच म्हणायची पध्दत आहे. शिवाय आपण जेवत असतांना समई मध्येच विझू नये ही काळजी देखिल घ्यायला हवी, ओक्के ?”
समिधा मावशीच्या होमवर्कमुळे, ‘पुनर्भेटीचं रोप रूजवणारया किंवा समई लावण्याच्या पुन:क्रियेचं रोप रूजवणारया ह्या “निरोप”- देवाणघेवाणीची ओळख रोहिनला करून देता आली.
आठवणींची ढवळाढवळ होऊन, लिमलेटची गोळी नि श्रीखंडवडी ची गोडी जिभेवर तरळली.
झालंच तर ‘समई’च्या निमित्ताने सांस्कृतिक कृतीचीही हसतखेळत ओळख करून देता आली रोहिनला.
मनोमन समिधाला धन्यवाद देत माझी पावलं स्वैपाकघराकडे वळली.😊
— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800