देव आणि दानवांमध्ये अमृतासाठी जेव्हा समुद्रमंथन केले गेले, तेव्हा समुद्रातून आधी हलाहल विष निघाले होते. ते विष त्यावेळी भगवान शंकराने प्राशन केले आणि ते पचवले देखील. परिणामी त्यांच्या गळ्यावर असा निळा पट्टा आला आणि त्यामुळेच त्यांना नीलकंठ असेही नाव पडले, अशा सर्व नोंदी पुराणात सापडतात.
हे सर्व आठवण्याचे कारण असे की काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात असा उल्लेख केला की, मी भगवान शिवाचा भक्त आहे. त्यामुळे मी सर्व विष पचवून टाकतो आणि तरीही जनसामान्यांची सेवा करतो आहे. मोदींना प्रत्यक्षात कोणते विष म्हणणे अपेक्षित होते, तो प्रश्न बाजूला ठेवू या. पण या माणसाने जवळजवळ दोन तपांच्या राजकीय आयुष्यात सतत टीकेचे आणि शिव्याशापांचे खूप हलाहल पचवले आहे. तरीही ते आपल्या स्थानावर टिकून आहेत. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांची धडपड सुरूच आहे.
नरेंद्र दामोदरदास मोदी म्हणजे गुजरात मधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले एक व्यक्तिमत्व. त्यांच्या लहानपणी कुटुंबाची आर्थिक स्थिती यथातथाच होती. आपण लहानपणी वडिलांबरोबर रेल्वे स्टेशनवर चहा विकत होतो अशा आठवणी नरेंद्र मोदींनी सांगितल्या आहेत. स्टेशनवर चहा विकणारा एक मुलगा ते भारतासारख्या महाकाय देशाचा पंतप्रधान आणि जागतिक स्तरावर आपली एक आगळीवेगळी ओळख करणारा नेता, हा त्यांचा प्रवास खरोखरीच विस्मयकारक म्हणावा लागेल.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही पंतप्रधान हे कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे पदावर पोहोचले, तर काहींना पक्षीय पाठबळ तरी होते. मात्र एका गरीब कुटुंबातून वाढत वाढत आपल्या पक्षाला देखील मोठे करत देशाच्या सर्वोच्च पदी पोहोचणे आणि त्या पदावर सलग अकरा वर्षे टिकून राहणे, यासाठी त्या व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष गुण असायलाच हवेत. नाही का?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेले नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. लहानपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळले होते. पुढे तरुण वयात ते संघाचे प्रचारक बनले. नंतर संघानेच सांगितल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात सक्रिय झाले. पक्षादेश मानत ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. तिथे तेरा वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळल्यावर ते देशाचे पंतप्रधान बनले. तिनदा निवडून येत आणि पक्षालाही घसघशीत बहुमत मिळवून देत अकरा वर्षे ते राज्यकारभार सांभाळत आहेत. त्यांनी देशात विविध क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडवून आणले आहे. त्यामुळे आज देशातल्या सामान्य माणसालाही मोदी आपले वाटतात. त्याचाच परिणाम मतदानावर दिसून येत असतो.
या दोन तपाच्या कारकीर्दीत मोदींना टिकेचे घाव मोठ्या प्रमाणात सहन करावे लागले आहेत. अगदी “मौत का सौदागर” पासून तर “चौकीदार चोर है” पर्यंत विविध दूषणं त्यांना दिल्या गेली आहेत. मुख्यमंत्री असतानाच विविध खऱ्याखोट्या आरोपांसाठी त्यांना न्यायालयासमोर देखील उभे राहावे लागले आहे. तरीही आपले निष्कलंक चारित्र्य समोर ठेवत त्यांची वाटचाल सुरूच आहे.
मोदी २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनले. वर्षभरातच गोधरा हत्याकांड घडले. त्याचे पडसाद म्हणून की काय पण संपूर्ण गुजरातमध्ये हिंदू मुसलमानांचे दंगे उसळले. त्यात हिंदू मुसलमानांचे बळी देखील गेले. त्याचेच भांडवल करत विरोधकांनी त्यांना धारेवर धरले. सोनिया गांधींनी त्यांची मौत का सौदागर म्हणून संभावना केली होती. मात्र अशा आरोपांना भीक न घालता ते पुढे जात राहिले. त्यांच्या कालखंडात त्यांनी गुजरातचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल हा प्रयत्न केला. व्हायब्रंट गुजरात ही संकल्पना राबवत त्यांनी तिथे मोठे उद्योगधंदे कसे येतील हा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे काम संपूर्ण देशवासीयांना भावणारे ठरले.
त्या काळात विरोधकांनी त्यांची जगभर बदनामी केली. त्यामुळेच त्यांना अमेरिकेने काही काळ व्हिसा नाकारला होता. एका मुख्यमंत्र्याला अमेरिकेने असा प्रवेश नाकारणे हे देशवासीयांना खटकणारेच होते.
भारतीय जनता पक्षाला १९८४ मध्ये लोकसभेत फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. नंतर भाजपने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उचलत हळूहळू संख्या वाढवायला सुरुवात केली. परिणामी आघाडी करून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात १९९८ मध्ये सत्ताही मिळवली. मात्र वाजपेयी बाजूला होताच त्या ताकदीचा मोठा नेता भाजपाला मिळाला नव्हता. अडवाणींनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून २००४ आणि २००९ असे दोनदा भाजपचे नेतृत्व केले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१३ मध्ये झालेल्या बैठकीत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. मोदींनी आपले संघटन कौशल्य वापरून भाजपाला रणनीती दिली. नेतृत्वही दिले. “देश को बचाने के लिए मोदीजी को लाना है” हा नारा त्यावेळी देशभर तोंडातोंडी झाला. परिणामी २०१४ ला भाजपाला प्रथमच लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. नरेंद्र मोदींनी देशाचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत देखील मोदींनी भाजपाला अधिक जागा मिळवून देत विजय मिळवला.
कोरोना काळात मोदींच्या नेतृत्वाचा कस लागला होता. तिथेही भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावण्यात ते यशस्वी ठरले.
भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जागा कमी मिळाल्या, पण तरीही मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार बनवले गेले. वस्तूतः मित्र पक्षांना विरोधी आघाडीसोबत जाण्याची संधी होती. मात्र सर्वांनीच मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. गेली अकरा वर्ष ते पंतप्रधान पदावर आहेत. तिथे त्यांनी इंदिरा गांधींच्या सलग अकरा वर्षे पंतप्रधानपदी राहण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
भविष्यात कदाचित ते पंडित नेहरूंचा रेकॉर्ड देखील मोडू शकतील. या अकरा वर्षाच्या काळात त्यांच्यावर विरोधकांनी वाटेल तसे आरोप केले आहेत. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीत मोदींनी घोटाळा केला असा आरोप करत “चौकीदार चोर है” चा नारा दिला होता. तर २०२४ च्या निवडणुकीत मोदींनी निवडणूक आयोगाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मत चोरी केली, हा आरोप आजही राहुल गांधी मुक्तकंठाने करीत आहेत.
मधल्या काळात सी ए ए आणि एन आर सी यांच्या विरोधात आंदोलन करून काही महिने दिल्लीला वेठीस धरण्याचा देखील प्रयत्न विरोधकांनी केला होता. तसेच पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे करतही दिल्लीला वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला. अगदी गणतंत्र दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर ट्रॅक्टरने हल्लाबोल करण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र नरेंद्र मोदींनी अगदी शांतपणे सर्व समस्यांना धाडसाने तोंड दिले आणि त्यातून ते तावून-सुलाखून बाहेर निघाले आहेत.
मोदींवर आरोप करण्यासाठी विरोधकांना जेव्हा मुद्दे मिळाले नाहीत, तेव्हा चक्क मोदींच्या व्यक्तिगत आयुष्यावरही चिखलफेक करायला विरोधकांनी मागेपुढे पाहिले नाही.लहान वयातच मोदींचे लग्न झाले होते. मात्र उभयपक्षी सहमतीने ते नंतर संघाचे प्रचारक म्हणून निघून गेले. तेव्हापासून ते ब्रह्मचर्याचे जीवन जगत आहेत. मात्र त्या मुद्द्यावरून देखील त्यांना लक्ष्य करण्यात आले. मोदींनी कोणती पदवी घेतली यावरून देखील गदारोळ वाजवण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा गदारोळ करणाऱ्यांच्या पदव्या तपासायला गेले तर वेगवेगळी माहिती जनतेसमोर येऊ शकते याचे भानही आरोप करणारे विसरून जातात.
२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतरच्या पुरी सर्जिकल स्ट्राइक च्या वेळेस मोदींच्या आडून चक्क भारतीय लष्करावरच अविश्वास दाखवण्याचे उद्योग देखील विरोधकांनी केले होते. तोच प्रकार पहेलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जे काही सणसणीत उत्तर दिले त्याबाबतीतही होतो आहे.
भारतात असताना आपण परस्परांचे विरोधक असू देखील, मात्र जेव्हा परदेशात जातो तेव्हा आपण प्रथम भारतीय नागरिक असतो, आणि तिथे भारताची प्रतिमा कशी जपता येईल हाच आपला प्रयत्न असावा हे अपेक्षित असते. मात्र विरोधकांना ते भानही राहिले नाही. दस्तूरखुद्द राहुल गांधींनीच परदेशात जाऊन मोदींची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. २०२४ च्या निवडणुकीत मोदी संविधान बदलत आहेत अशी बोंबाबोंब केली गेली होती. देशात मोदी छुपी आणिबाणी आणत आहेत असा आरोप तर दररोज होतच असतो. मात्र तरीही मोदी त्याला शांतपणे उत्तर न देता आपले काम पुढे चालू ठेवतात.
आज जागतिक स्तरावर देखील त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो आहे. अमेरिकेने आज भारतासोबत टॅरिफवॉर सुरू केले आहे. त्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळी चीन आणि रशियाशी मैत्री करत मोदींनी अमेरिकेला योग्य तो इशारा दिलेला आहे.
पंतप्रधान पदाच्या पहिल्या निवडणुकीदरम्यानच मोदींनी…
“मै न खाऊंगा, न खाने दूंगा,”
अशी घोषणा केली होती. त्यामुळे बऱ्याच जणांची पंचाइत झाली आहे. यात दुखावलेले आत्मे देखील आज मोदींना उपद्रव कसा देता येईल हाच प्रयत्न करीत आहे.
तरीही नरेंद्र मोदी आज कोणाचीही आणि कोणत्याही टीकेची, आरोपांची, शिव्याशापांची पर्वा न करता वाटचाल करत आहेत. इथे देशाला परमवैभवाकडे कसे नेता येईल याच दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे. हा मार्ग कठीण आहे याचे भान ठेवूनच ते वाटचाल करत आहेत. आपल्या अकरा वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी काश्मीरचा वेगळा दर्जा संपवला आणि तिथेही भारतीय संविधान लागू केले. नोटाबंदी डिजिटल मार्केटिंग झिरो बॅलन्स बँक अकाउंट असे प्रयोग करत काळा पैसा कसा संपवता येईल याचे यशस्वी प्रयोग केले. जास्तीत जास्त पायाभूत सुविधा कशा उभ्या होतील या दृष्टीने देखील प्रयत्न केले. भारताला संरक्षण क्षेत्रातही त्यांनी सज्ज केले. परिणामी आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. भविष्यात भारताला जागतिक महासत्ता म्हणजेच विश्वगुरू बनवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी नरेंद्र मोदींची वाटचाल सुरू आहे. त्यासाठी रात्रीचा दिवस करत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आज सत्तरी ओलांडून पाच वर्षे उलटत असतानाही ते पंचवीशीच्या तरुणाला लाजवेल इतक्या चपळाईने काम करत आहेत.
या सर्व प्रकारात त्यांच्यावर कोणताही व्यक्तिगत गैरप्रकाराचा आरोप नाही. त्यांनी आपल्या सर्व कुटुंबीयांना दूरच ठेवलेले आहे. आजही त्यांचे भाऊ पुतणे हे गुजरात मध्ये सामान्य नागरिकासारखे जीवन जगत आहेत. त्यामुळे मोदींचे नेतृत्व हे एक निष्कलंक नेतृत्व म्हणून सिद्ध झाले आहे.
असे देशाचे चौदावे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी आज १७ सप्टेंबर २०२५ रोजी वयाचे ७५ वर्ष पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांनी याच तडफेने आणि धडाकेबाज शैलीने देशाचे नेतृत्व करावे आणि देशाला जागतिक महासत्ता बनवावे. त्यासाठी परमेश्वराने त्यांना उदंड दीर्घायुरोग्य द्यावे यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.

— लेखन : अविनाश पाठक. जेष्ठ पत्रकार, नागपूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800