Wednesday, September 17, 2025
Homeपर्यटनटूर अमेरिका : समारोप

टूर अमेरिका : समारोप

क्रूझवरून उतरून आम्ही लास वेगास गाठले.लास वेगास हे तर खरे वाळवंट ! अगदी आपल्याकडील राजस्थानासारखे ! पण राजस्थान हिरवेगार करायला जसा एक राजेन्द्रसिंह धावला तसेच इथल्या कोलोरॅडो नदीच्या पाण्याचा व्हूवर या माणसाने वापर केला आणि आजच्या लासवेगासचा जन्म झाला.

ही नदी 1600 मीटर खोलपर्यंत पाण्याने भरलेली आहे. तिच्यावर लांबचलांब डॅम बांधून तिचे पाणी या वाळवंटात खेळविले आणि या डॅमला नांवही व्हूवर डॅम असेच दिले.

आज हा भाग नुसताच समृध्द नाही तर श्रीमंतांची ऐट मिरवित आहे. Casino King म्हणून ओळखला जातोय. ज्यांच्या खिशात डाॅलर खुळखुळतात ते इथे काॅलर ताठ करून वावरतात.

पर्यटकांना मोहविणा-या इतरही कांही गोष्टी इथे आहेतच. एक रंगीबेरंगी कारंज्याचा शो आहे. वेगवेगळ्या देशांच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृती मिरवणारी व खिलवणारी हाॅटेल नुसती खाद्यसंस्कृती नव्हे तर त्या देशाची वैशिष्ट्ये त्यांच्या सजावटीतून, बांधणीतून तुम्हांला खुणावत असतात. बाहेरूनच एका नजरेत हे हाॅटेल कुठल्या देशाची खाद्यसंस्कृती आहे ते आपोआप कळते.

आम्ही तेथील इंडियन रेस्टाॅरंटची चव चाखली. आमच्याकडे खेळण्यासाठी डाॅलर अर्थातच् नव्हते म्हणून त्या कॅसिनोमधून नुसताच एक फेरफटका मारला.

त्यानंतर आमच्या स्वा-या Grand Canyon व व्हूवरडॅम पाहण्यासाठी उंच उडाल्या म्हणजे आम्ही हेलीकाॅप्टर राईड घेतली.नदीचे ते विशाल पात्र, तेथील डोंगर,कांही डोंगर लाल तर कांही काळे म्हणजे तांबे, लोखंड या खनिजांचं आस्तित्व दाखवत होते. असेच डोंगर मी लेह-लडाख मध्ये जीपने फिरतांना जवळून पाहिले होते. त्यांची आठवण झाली. निसर्ग सर्वांना भरभरून देत असतो.किती घ्यायचं, काय घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं असतं.

ही भरारी संपवून आम्ही आतां बसमध्ये बसलो. फार पूर्वी आस्तित्वात असलेल्या पण आतां संपलेल्या चांदीच्या खाणी पाहण्यासाठी ! त्या खेडेगांवाला आम्ही भेट दिली. तेथे खोदकाम केलेल्या खाणी अगदी आंत उतरून आम्ही पाहिल्या. तेथील खाणकामगारांच्या घरांच्या, मनोरंजनासाठी असलेल्या हाॅल, हाॅटेलच्या वास्तव्याच्या खुणा जशाच्या तशा जपलेल्या होत्या.त्या पाहतांना परत मला आपल्या नागालॅन्डची आठवण झाली. तिथेही नागालोकांच्या वसाहतींचे वैविध्य दाखविणारे Heritage Village सुंदर उभारलेले आहे. तेथेच एका हाॅटेलात,जे पर्यटकांसाठी खुले आहे, आम्ही लंच घेतले व तेथून काढता पाय घेतला.

लास वेगासच्या थिएटरमध्ये एक सुंदर शो आमची वाट पाहात होता. ‘V’ show ! तो पाहून दुस-या दिवशी आम्ही सन् फ्रान्सिस्कोसाठी उड्डान केले.

सन् फ्राॅन्सिस्कोला येताच परत आमची क्रूझवारी झाली. क्रूझवर चढण्यापूर्वी तिथल्या शाॅपिंग सेंटर मध्ये हिंडलो. गंमत म्हणजे कुठेही made in USA असा स्टॅम्प मारलेलं कांहिही विक्रीस नव्हते. कपडे, ब्लॅन्केटस्, सारे कांही made in India ,made in koria/china असंच होतं.

या क्रूझवारीत पलिकडच्या तीरावरील गोष्टी पाहण्यास मिळतात. दुस-या तीरावर Alcatraz हा जो भाग आहे तो एके काळी तुरुंग म्हणून वापरात होता. तेथील तुरुंगाची इमारत लांबून तुम्हांला खुणावत असते.

Golden Gate हे सन् फ्रान्सिसस्कोचं वैशिष्ट्य ! काय आहे हो हे गोल्डन गेट ? हा तेथील नदीच्या पात्रावर दोन्ही तीर जोडणारा एक पूल आहे. त्या पुलाला आधारासाठी एकही खांब वापरलेला नाही. नदीत त्या पुलाचा एकही भाग रोवलेला नाही. असा हा खूप मोठ्ठा, एकावेळी चार-चार गाड्या जाऊ शकतील एवढा रुंद लोखंडी पूल ! येथून नदीमधून चाललेली बोटींची, जहाजांची ये-जा बघण्यात मजा वाटते. हा पूल म्हणजे सन् फ्रान्सिसस्कोची शान आहे. जगात या पुलाला खूप मानतात. पण हा पूल पाहात असतांना माझ्या मनात चलबिचल झाली आणि माझ्या डोळ्यांपुढे हरिद्वार-ॠषिकेश दिसू लागले.

आज आतां Technology खूप पुढे गेल्यानंतर झालेली या पुलाची निर्मिती आणि टेक्नाॅलाॅजी या शब्दाची entry होण्यापूर्वीच बांधलेला लक्ष्मणझूला ! तो ही नदीच्या भव्य-रुंद पात्रावर खांबविरहित आणि फक्त दोराचा बांधलेला आहे. हजारो वर्षे जुना आहे. पाऊस, ऊन, वादळ, बर्फवर्षाव सारंच झेलत आहे. अजून कधीही त्याची दुरुस्ती करावी लागली नाही. तसं कधी ऐकण्यात किंवा वाचनातही आलं नाही. त्या पुलावरूनही माणसं आणि सात टूव्हिलर जातात, जात आहेत. मुख्य म्हणजे तो फक्त दोरखंडाने विणलेला आहे. आतां हे कसबकौशल्य मोठं कां गोल्डन गेटचं मोठं ? याची तुलना होणार नाही हे मात्र खरं. पण मला तरी लक्ष्मण झूलाचाच जास्त अभिमान वाटतो एवढे मात्र खरे ! हां, दोन्हीकडील इंजिनिअरींगची कमाल मात्र अधोरेखित आहे.

तेथून निघून येथील आणखी कांही निसर्गचित्रे म्हणजे जुळ्या टेकड्या वगैरे पाहून आम्ही धन्य झालो आणि सकाळी Airport गाठला. अमेरिकेला टाटा, बाय-बाय करून आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात केली.
समाप्त.

स्वाती दामले

— लेखन : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं