Wednesday, September 17, 2025
Homeपर्यटनटूर अमेरिका : 06

टूर अमेरिका : 06

आता आम्ही तीन दिवस मस्त आराम करणार होतो. तुम्ही म्हणाल, फिरायला गेलात की आराम करायला ? तो आरामच होता पण क्रूझवरती! चक्क तीन दिवसांची क्रूझवारी !

प्रथम अमेरिकेच्या या टूरवर जाण्याचे ठरवले तेव्हां हे तीन दिवस कसे जातील असा मला प्रश्र्न पडला होता. कारण क्रूझवर काय मजा असणार ? असे वाटले होते. पण जाऊं दे ! डेकवर बसून मस्त वारा खात बसू नाहीतर एखादं पुस्तक वाचत बसू असा विचार केला. पण पुस्तक बरोबर नेलेले नव्हते. आतां काय ?

पण हा प्रश्र्न अचानक सुटला. लाॅस एन्जेलिस सोडण्यापूर्वी एका हाॅटेलात आम्ही लंच घेतले. तेथे बाहेर एका बाॅक्समध्ये बरीच पुस्तके होती. चौकशी करता असे कळले की येथील लोकांची ही संवय आहे की पुस्तके वाचून झाली की ती अशी ठेवतात. ज्या कोणाला पाहिजे असतील त्यांनी ती वाचावयास न्यावी आणि तीही कशी ? तर फुकट ! मग काय ? मी खूष ! भराभर अनेक पुस्तके पालथी घातली आणि त्यांतून दोन कादंब-या निवडल्या. क्रृझवरचं टेन्शन असं अचानक, अकल्पितपणे नाहिसं झालं. पण खरी गंमत तर पुढेच आहे.

तसं तर क्रूझवारी कांही पहिल्यांदाच करत नव्हते मी ! युरोप टूरमध्ये क्रूझवर स्वारी करून झाली होती पण ती फक्त थोड्या वेळापुरती ! अहो ! इथे तर तीन दिवस काढायचे होते. मातृभूमी तर सोडाच पण साध्या मातीचं तरी दर्शन होईल की नाही ही चिंता होती. असो….
तर आम्ही क्रूझवर चढाई केली. आमचं स्वागत छानच झालं. मला वाटतं की क्रूझ सात मजली होती. तळात दोन मजले होते. जेवणासाठी हाॅल, मनोरंजनासाठी वेगळं थिएटर, मध्यावर एक हाॅल करमणूकीसाठी. डेकवर बसण्याची सोय, पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी तरणतलाव, open थिएटर,जाॅगिंग ट्रॅक ! म्हणजे ते एक गांवच म्हणाना ! well planed city ! सर्व सुखसोयी हजर ! राहायची व्यवस्थाही तशीच चोख!ज्यांना समुद्राच्या बाजूला खोल्या हव्या असतील त्यांचे जास्त पैसे घेऊन स्वागत !

आमच्या खोल्या अर्थातच् आंतल्या बाजूला होत्या. खोली छोटी होती पण सर्व गरजा व्यवस्थित पूर्ण करणारी ! दोन बेड, नाईट लॅम्प, संडास बाथरूम, सामान ठेवण्यासाठी एक कपाट ! फक्त झोपण्यापुरताच उपयोग करणार होतो आम्ही ! एरवी डेकवर ! खाण्यापिण्याची तर चंगळच चंगळ! कुठेही केव्हाही जा, आईस्क्रीम, ज्यूस, फळे तुमची वाटच बघत आहेत. क्रूझवरील क्रू तर एकदम शिस्तबध्द, नम्र आणि Trained. तर आमच्या स्वागतासाठी एक समारंभ आयोजित केला होता. स्वतः कॅप्टनने आमचे स्वागत केले. त्यानंतर रोज कांही ना कांही मनोरंजनाचे कार्यक्रम हाॅलमध्ये सुरूच होते. कधी गायन, कधी वादन, नृत्ये, सिनेमा, विनोद ! जास्त करून ज्येष्ठ नागरीकच याचा आस्वाद घेतांना दिसत होते. तरुण जाॅगिंग पार्क, तरणतलाव येथे मजा करत होते. स्विमिंगसूट असल्याखेरीज आंत उतरता येत नव्हते व असला तरी आम्ही बायका सर्व अपरिचित लोकांपुढे नक्कीच उतरलो नसतो. संस्कृतीतील फरक !

मी आणि माझी मैत्रिण या सर्वांपेक्षा डेकवर बसून निळ्या निळाईत गुंग होतो. आता निळी निळाई म्हणजे काय तर निळशार, नितळ समुद्राचं पाणी आणि निळशार, स्वच्छ आकाश!इतकं प्रदुषणमुक्त वातावरण आम्ही प्रथमच पाहात होतो. शिवाय सूर्योदय, सूर्यास्ताची मजाही वेगळीच होती. मधूनच वेगळेच, कधी न पाहिलेले पक्षी दर्शन देत होते. निर्जन बेटेही कुठे कुठे दृष्टीस पडत होती.

समुद्रातून प्रवास करीत क्रूझ पुढे पुढे चालली होती बहामा बेटाकडे ! ते बेट लांबूनच पाहिले. पण कोकोक्ले या बेटावर आम्ही उतरलो. थोडीफार वस्ती होती. एक डोंगर नाही टेकडीच म्हणावी लागेल. तिथपर्यंत जाऊन जमिनीवरची गंमत अनुभवली आणि परत क्रूझवर चढून पुढचा प्रवास सुरू झाला. वेळ कसा जाणार असं वाटत होतं पण विकत, नाही नाही, फुकट घेतलेल्या पुस्तकाचं पानही उघडावं लागलं नाही.

या क्रूझवर कॅन्टीनमध्ये काम करणारे, शेफ वगैरे लोक इंडियन दिसत होते. मी व माझी मैत्रिण गप्पा मारीत असतांना एक वेटर आमच्याशी मराठीत बोलू लागला. आम्ही त्याची चौकशी केली. तो भांडुपचा म्हणजे मुंबईचाच राहणारा होता. वयानेही फार मोठा नव्हता, फार तर वीस एक वर्षांचा असेल.vसहजच उत्सुकता वाटली म्हणून त्याला कामाबद्दल, पगाराबद्दल, पुढे काय करणार अशा सा-या गोष्टी विचारल्या. थोडक्यात काय तर त्याचा Interview घेतला. त्या मुलांना कपडा-लत्ता,राहणं,
जेवण सर्व फुकट मिळतं व घरी आठवड्यातून एकदा फोनही करता येतो. म्हणजे मिळणारा सर्व पगार त्यांच्या खिशातच जातो. त्या मुलाने तर आम्हाला चकीतच केले. दोन वर्ष क्रूझवर थांबून पैशाचं भांडवल जमा करून तो कोकणात हाॅटेल काढणार होता. तेही विकसनशील पर्यटन केन्द्रावर ! अशा सा-या गोष्टीत व मौजमजेत तीन दिवस कसे सरले ते कळलेच नाही आणि आता क्रूझवरून उतरण्याच्या मार्गी लागलो.
क्रमशः

स्वाती दामले

— लेखन : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मस्त मस्त आम्ही म्हणजे मी पण क्रूझवर तीन दिवसांचा सुदंर छान अनूभव घेतला आहे. न विसरणारा अविस्मरणीय.
    स्वाती दामलेनी पुन्हा या सर्व आठवणी ती बहामास कूझ डोळ्यासमोर आणली व त्या आठवणी ताज्या केल्या.
    धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं