आज आम्ही वाॅशिंग्टन डी सी ला भेट देणार होतो. ही तर अमेरिकेची राजधानी ! अरे ! मग न्यूयाॅर्कचे काय ? तर त्याचे असे आहे की प्रथम न्यूयाॅर्कच राजधानी होती. पण जाॅर्ज वाॅशिंग्टन यांनी वाॅशिंग्टन वसविले. न्यूयाॅर्कनंतर फिलाडेल्फिया हे Capital House म्हटले गेले. पण राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज वाॅशिंग्टन यांना राजधानी निवडण्याचा अधिकार देण्यात आला. त्यांनी वाॅशिंग्टन ही राजधानी ठरवली. पण राजधानीचा मान Dist.of Colombo याला मिळाला. हे राज्य नसून union teritory चा दर्जा मिरवित होते म्हणून राजधानीचे नांव वाॅशिंग्टन DC.
अमेरिकेची लष्करी सत्ता जेथून कार्य करते ती पेंटॅगाॅनची इमारत आतां आम्ही पाहात होतो. Twin Tower ला धडकण्यापूर्वी पेंटॅगाॅनवर प्रथम विमान धडकले. ही सारी कथा एका झटक्यात डोळ्यापुढून सरकत गेली. त्यावेळी काही जवान शहीद झाले. त्यांचे स्मारक तिथे एका टेकडीवजा उंचवट्यावर उभारले आहे. ते पाहून व तेथूनच समोर दिसणारी पेंटॅगाॅनची इमारत पाहून आम्ही परत फिरलो ते तडक राष्ट्राध्यक्ष यांच्या निवासस्थानाकडे, White House !
नांवाप्रमाणेच पांढ-या रंगाचे हे निवासस्थान पाहतांना आपल्या राष्ट्रपतींचे निवासस्थान आठवले. दिल्लीतील राष्ट्रपतींच्या निवासस्थानापेक्षा white house मला तरी लहानच वाटले. त्याला लागूनच एक छोटी इमारत होती, ते त्यांचे office आहे. कुंपणाबाहेरूनच दर्शन घेऊन, फोटो काढून आम्ही पुढे सरकलो ते airspace म्युझियम आणि aircraft म्युझियम पाहायला.
येथे अगदी पहिले अंतराळात सोडलेले राॅकेटही पाहावयास मिळाले. अंतराळात आजवर जेवढी याने सोडली त्या सा-यांनी इथे हजेरी लावली होती. त्यात कशीकशी प्रगती होत गेली त्याचा आलेखच जणुं मांडला होता. प्रत्येकाची थोडक्यात माहितीही होती. पण त्या विषयात आपण तज्ञ नसल्याने फारसे गम्य वाटले नाही. पण हा एक इतिहास होता अंतराळात होत असलेल्या वावराचा ! आणि हो! एक मात्र गंमत अनुभवायला मिळाली ती म्हणजे नील आर्मस्ट्राॅन्गने आणलेल्या चांद्र दगडाला स्पर्श करण्याची ! तो दगड सुरक्षितपणे ठेवलेला आहे. कुणीही त्याला स्पर्श करू शकतो.
क्रमशः

— लेखन : स्वाती दामले
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800