आज आम्ही अमेरिकेची शान असलेला ‘नायगारा‘ फाॅल पाहण्यास निघालो.धबधबा म्हटलं की डोळ्यापुढे येतो डोंगरावरून कोसळणारा पाण्याचा वेगवान शुभ्रधवल प्रवाह!पण नायगारा फाॅल फार उंचावरुन कोसळत नाही तर तो पुढे आलेल्या टेकडीच्या पठारावरून तीन बाजूंनी कोसळतो. रात्रीच्या वेळी लाईटिंगमध्ये तो रंगीत दिसतो. आठवड्यातून एक दिवस तिथे फटाकेही उडवतात. हे लक्षात घेऊन त्या ठराविक दिवशीच रात्री आम्ही तिथे पोहोचलो. पण आमच्या नशिबात फटाक्यांची आतषबाजी नव्हती बहुतेक! इतक्या काटेकोरपणे वेळ सांभाळणा-या देशामध्येसुध्दां अशा छोट्या चुका किंवा छोट्या घटना घडू शकतात तर !
दुस-या दिवशी परत आम्ही धबधब्याशी आलो. कांहीजण धबधब्याच्या खाली जवळजवळ 125 पाय-या उतरून गेले.आम्ही मात्र वरूनच त्याची मजा अनुभवत होतो.
नायगारा नदीचे खूप रुंद पात्र आहे.दर सेक॔दाला त्यातून 35000 क्यूसिक्स पाणी पडते.त्याचे रुप जवळून बघण्यासाठी तेथे बोटीने जाता येते. अगदी जवळून बोट जातांना त्या पाण्याचे तुषार आपल्याला भिजवतात व मजा वाटते. सूर्याच्या उन्हाने पाण्यातच सप्तरंग दिसणारे इंद्रधनु खुललेले होते. ते पाहून अचंबितच झालो.पण एवढा मोठ्ठा प्रपात असून आवाज त्या मानाने खूप मोठा येत नव्हता. जणुं कांही ध्वनिप्रदूषणाचे परिणाम त्यांना माहित असावेत!
समोरच कॅनडा दिसतो.त्यांच्या इमारतींच्या जवळून आम्ही एक प्रदक्षिणा घातली. अहो, कशी म्हणून काय विचारता ? Helicopter Ride घेतली.त्या गगनभरारीमुळे जणुं कांही स्वर्गामधून पृथ्वी या स्वप्ननगरीचे दर्शन झाले.दूरवर पसरलेला सुंदर निसर्ग निरखित होतो.त्यांत रस्त्यांचे जाळे,इमारतींचे मनोरे छान दिसत होते.
नायगाराला रामराम करून आम्ही निघालो ते थेट Orlando इथल्या Epcot Center मध्ये मौजमजा करायला. World Disney Park.नाना त-हेच्या राईड. गोलगोल फिरवणा-या, उंचउंच नेणा-या, काळोखातून दुस-या नव्याच जगाची ओळख करून देणा-या! पण गर्दी एवढी होती की फक्त दोन तीन राईड जमू शकल्या. रांग लावून आंत शिरेपर्यंत अर्धा ते पाऊण तास जायचा.
डिस्नेलॅन्डचेही तसेच.वेळेचे गणित जुळून येत नव्हते, पण नाईलाज होता.जमेल तेवढे फिरलो. आणि आता ‘ नासा ‘ कडे मोर्चा वळवला.

— लेखन : स्वाती दामले
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800