सूर्य क्षितिजावर रेंगाळावा आणि त्यातील सुंदर अशा रंगछटांनी लहानशा टेकडीला सौंदर्याचा साज चढवावा व टेकडीच्या कुशीत असणाऱ्या स्वच्छंदी पाखरांच्या कलागुणांना वाव देणारा, त्यांचे कौतुक करणारा सोहळा म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नूतन ज्ञान मंदिर कल्याण (पूर्व) येथे नुकताच पार पडला .
अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे श्री शैलेश चव्हाण तसेच छत्रपती शिक्षण शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष श्री श्रीकांत तरटे, शाळेच्या लाडक्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी एकनाथ गागरे मॅडम या कार्यक्रमास उपस्थित होत्या. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कु मयुरी पाटील आणि अथर्व नरखेडे उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापिका सौ गागरे मॅडम यांनी छोट्या, कल्पक अशा कथेतून विद्यार्थ्यांच्या व प्रमुख अतिथी यांच्या हृदयाचा ठाव घेतला. त्यांची कथा म्हणजे एक पर्वणीच असते.
वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यास लाभलेले प्रमुख पाहुणे, चित्रपट, दूरदर्शन कलाकार मयुर खांडगे यांनी आपल्या सुंदर शैलीतून विद्यार्थ्यांशी संवाद साधत एक कलाकार बिकट परिस्थितीतून कसा मार्ग काढत पुढे हे सांगून जिद्द आणि चिकाटीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमास लाभलेले प्रमुख वक्ते शैलेश चव्हाण यांनी ज्ञान आणि विद्यार्थी या शब्दांचे अर्थ विद्यार्थ्यांना सांगून सतत जागृत करून ज्ञान ही छोट्या छोट्या गोष्टींमधून कसे प्राप्त करायचे, हे सांगितले. तसेच अभ्यासाकडे अभ्यास म्हणून न पाहता आपल्या भोवतालच्या गोष्टीतून शिकायचे असते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
या दोन्ही अतिथीनी शाळेचे विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करीत मराठी माध्यमाची शाळा असूनही इतके सामाजिक उपक्रम राबवून कला, साहित्य क्रीडा, यात शाळा नेहमी अग्रेसर असते, असे गौरवोद्गार काढले.
कुमारी गुंजन विश्राम महाजन हिने आदर्श विद्यार्थिनी होण्याचा मान पटकावला तर शालांत परीक्षेत प्रथम येणारी विद्यार्थ्यांनी कुमारी भक्ती जाधव हिचे ही कौतुक करण्यात आले.
विविध स्पर्धेत विजयी असणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. शालेय वार्षिक स्नेहसंमेलनात काळानुसार अनेक बदल होताना दिसतात हे बदलाचे वारे विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी घेऊन येतात असे असले तरी शाळांमधील पारंपारिक स्नेहसंमेलनाचा गोडवा काहीसा हरवल्याचा सूर ऐकू येतो. परंतु नूतन ज्ञान मंदिर मध्ये हा सूर आणि गोडवा आजतागायत असाच कायम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न या वार्षिक स्नेहसंमेलनात गेली कित्येक वर्ष करत आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्याचा जणू या शाळेने विडाच उचललेला आहे. बाल नाट्य, पथनाट्य, महाराष्ट्राची लोकधारा, नवीन व जुन्या गाण्यांचा सुंदर मिलापसाधून त्याची फ्युजन नृत्य प्रकार शिक्षक व विद्यार्थी मिळून बसवितात. तसेच त्यांचे वेगवेगळ्या शैलीत सादरीकरण केले जाते. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात व वैविध्यपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती होते. विद्यार्थी पालक अतिथीजन यांच्यासह सर्वांसाठी ही सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी ठरते. यावर्षी सांस्कृतिक प्रमुख सौ सुषमा मोटघरे व सौ यशोदा आव्हाड यांच्या कल्पनेतून सुंदररीत्या साकारलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आदिशक्ती म्हणजेच स्त्री शक्तीचे आगळीवेगळी रूपे साकारली. तसेच मराठी या माझ्या मायबोलीचा गोडवा गाणारे कार्यक्रम ही सादर केले.
पालकांसाठी घेतलेल्या पाककला स्पर्धेमध्ये विजयी असणाऱ्या स्पर्धकाला पारितोषिक देऊन त्यांचेही कौतुक करण्यात आले. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा म्हणजे एक मोठा सोहळा व शाळेचा जणू आरसाच. या सोहळ्यात शाळेतील शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचा सिंहाचा वाटा असतो कारण हा कार्यक्रम नियोजन पूर्व पार पाडण्याकरिता या सर्वांचे सहकार्य लाभते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपन्न करण्याचे आवाहन सर्व शिक्षकांनी मिळून पेलले व कार्यक्रम अतिशय सुंदररित्या संपन्न झाला.
— लेखन : आस. कल्याण (पूर्व)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800