दिवाळीनिमित्त ठाणे शहरात भारतातील थोर शास्त्रज्ञ / वैज्ञानिक ह्या विषयावर व्यक्तिचित्र रांगोळी तसेच सुलेखन रांगोळीचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ह्या प्रदर्शनाच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दा. कृ. सोमण व श्री. अनिल काकोडकर लाभले होते.
ठा. म. पा. १९ नंबर शाळा, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे (प.) येथे रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३, पर्यंत पाहता येईल.
भारतीय संस्कृती व परंपरेचा प्रसार व प्रचार करून रांगोळी कलेची जोपासना करण्याच्या उद्देशाने ‘रंगवल्ली परिवार’, ठाणे गेली अनेक वर्ष ह्या उपक्रमासाठी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही कार्यरत आहे. ह्या अनुषंगाने यंदाच्या दिवाळीमध्ये भारतीय वैज्ञानिक व शास्त्रज्ञ हा विषय घेऊन भव्य व्यक्तिचित्र-रांगोळी तसेच वैज्ञानिकांची नावे सुलेखन रांगोळीत आलेखून हे प्रदर्शन आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीला अतिशय श्रीमंत इतिहास आणि परंपरा लाभलेली आहे. ह्या इतिहासामध्ये अनेक क्षेत्रांतील विविध लोकांनी केलेल्या कार्याची नोंद आहे. ह्यातच असंख्य शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकदेखील समाविष्ट आहेत. गणित, विज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूमिती, जैवशास्त्र, अणुविज्ञान, परमाणुशास्त्र, आयुर्वेद, योग अशा अनेक क्षेत्रांत विविध प्रकारचे शोध आर्यभट्ट, पतंजलि, सुश्रुत, चरक, लगध, नागार्जुन ह्या आणि अशा अनेक शास्त्रज्ञांनी लावले आहेत.
अतिप्राचीन काळापासून ते आत्ताच्या भारतीय वैज्ञानिकांना रांगोळीच्या माध्यमातून एक मानवंदना देण्यासाठी, तसेच रसिकजनांपर्यंत शास्त्रज्ञांची माहिती व कलेची प्रसिद्धी व्हावी ह्या हेतूने रंगवल्ली परिवाराने ह्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
प्रदर्शनाचे संयोजन, संकल्पना ही संपूर्णपणे रंगवल्ली परिवारचे अध्यक्ष श्री. वेद कट्टी ह्यांची आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800