अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, कोकण प्रांताच्या वतीने येत्या रविवार, दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘प्रादेशिक साहित्यातील राष्ट्रीयत्व’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गोळे यांची निवड करण्यात आली असून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे या संमेलनाचे उद्घाटक असतील. पितांबरी उद्योगसमूहाचे रवींद्र प्रभुदेसाई हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
उद्घाटन सोहळ्याला नॅशनल बुक ट्रस्टचे मिलिंद मराठे, टीजेएसबी बँकेचे शरद गांगल आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती साहित्य भारती (अ.भा.सा.प.) कोकण प्रांताचे अध्यक्ष दुर्गेश सोनार, कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख आणि मंत्री संजय द्विवेदी यांनी दिली.
साहित्य संमेलन परिसराला ‘म.पां.भावे साहित्य नगरी’ असे तर सभागृहाला ‘कै. मोहनराव ढवळीकर सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.
या संमेलनात ‘प्रादेशिक साहित्यात उमटलेले राष्ट्रीयत्व’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक पृथ्वीराज तौर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये या विषयावर कोकण प्रांतातून मागविण्यात आलेल्या शोधनिबंधातील सर्वोत्कृष्ट तीन स्पर्धक सहभागी होणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या संमेलनात ‘मला भावलेले शिवराय’ हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. यासाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतून निवडण्यात आलेले सर्वोत्कृष्ट पाच विद्यार्थी या सत्रात मांडणी करणार आहेत. युवा साहित्यिक आदित्य दवणे हे या सत्राचे अध्यक्ष असतील.
याशिवाय, ज्येष्ठ कवी नितीन केळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलनही होणार असून यात कोकण प्रांतातील २३ कवी-कवयित्री आपल्या कविता सादर करणार आहेत.
संमेलनाचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद बापट आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाच्या निमित्ताने ‘ओऊळ’ या विशेष स्मृतिग्रंथाचे प्रकाशनही होणार आहे.
साहित्य भारती पुरस्कारांचे वितरण
साहित्य भारती कोकण प्रांताकडून दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारांचे वितरणही या संमेलनाच्या समोराप सत्रात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कै. सदानंद त्रिंबक फणसे स्मृती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मिनल वसमतकर यांना त्यांच्या ‘वाडा’ या कादंबरीसाठी तर श्रीप्रकाश अधिकारी यांना ‘कथा मरूभूमीची’ या कादंबरीच्या अनुवादासाठी दिला जाणार आहे. कै. नीलिमा नारायण फडके स्मृती काव्य पुरस्कार कवी गीतेश गजानन शिंदे यांना ‘चित्रलिपी’ या अनुवादित कवितासंग्रहासाठी दिला जाणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800