शिक्षण म्हणजे फक्त डिग्री, सर्टिफिकेट, पद, प्रतिष्ठा, नोकरी एवढेच असते का? नाही ना? ज्यामुळे आचार व विचार उत्तम होतात ते असते शिक्षण. हो ना? मान्य आहे ना तुम्हाला? मात्र ज्या शिक्षणामुळे मी पणा येतो, लहान थोरांचा आदर केला जात नाही, ‘ग’ ची बाधा उत्पन्न होते, मीच सर्वश्रेष्ठ असे वाटू लागते, कमी शिकलेल्याना तुच्छ समजले जाते तर माझ्यामते ह्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही. तुम्हाला काय वाटते? बरोबर बोलते ना मी? आता तुम्ही विचार करा.
जे आई वडील अनेक त्याग करून मुलांना उच्च शिक्षण देतात, त्यांना विदेशात पाठवण्यासाठी घर गहाण ठेवतात, वेळ आली तर दाग दागिने देखील विकतात इतकेच नव्हे तर स्वतःच्या स्वप्नाचाही त्याग करतात केवळ मुलांना मोठे बनवण्यासाठी आणि कालांतराने तीच मुलं आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात अथवा त्यांना गलेलट्ठ पगार असूनसुद्धा पालकांच्या साध्या गरजा भागवू शकत नाही, अहो विचारपूस ही करत नाहीत तर असे शिक्षण काय कामाचे? सुशिक्षित अडाणी ना मग ही मंडळी?. ज्या जोतिबांनी, सावित्रीबाईनी शिक्षणाचा वसा घेतला, अतोनात कष्ट सोसले, मुलींनी शिकून स्वावलंबी असावे, मोठे व्हावे असे स्वप्न पाहिले, मुलींना समान संधी मिळावी असा त्यांचा प्रामाणिक हेतू होता. पण आज अशा अनेक उच्चशिक्षित मुली लग्न जमवताना अनेक अटी तटी घालून लग्न करतात. त्यांना मुलगा भरपूर पगाराची नोकरी करणारा, शक्यतो मुंबई पुण्याचा पाहिजे. लग्न झाल्याबरोबर वेगळे रहायचे असते. मुलाचे आई वडील ह्यांनी पाहुण्यांसारखे घरी यावे, लग्न झाल्यावर भाऊ बहिणींना आर्थिक मदत करू नये म्हणजे थोडक्यात सांगायचे तर मी व माझे कुटुंब असे स्वार्थी विचार झाले आहेत. आज अनेक मुलींच्या अशा उच्च शिक्षणाला काय अर्थ? जे नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते. फार थोड्या मुली खेळी मेळीने एकत्र राहतात. शिक्षणामुळे मनुष्य घडतो. त्यांचे भविष्य उज्वल, आनंदी व सुखकर होते. त्यामुळे शिक्षण फार महत्वाचे आहे ह्यात अजिबात दुमत नाही. पण शिक्षणामुळे विचारात परिवर्तन होणे गरजेचे आहे.
शिक्षण असे असावे ज्यामध्ये नम्रपणा असावा, मोठयाचा मान सन्मान असावा, माणुसकीला धरून असावे, शहाणपण, समजूतदारपणा असावे, आपल्याबरोबर इतरांची ही प्रगती साधावी असे निर्मळ, निस्वार्थी विचार असावे. आपल्या पदाचा, आपल्या ओळखीचा इतरांना देखील लाभ मिळावा असे वाटावे, म्हणजे सर्वांनी यशस्वी वाटचाल करावी असा शुद्ध हेतू म्हणजे खरे शिक्षण होय. जे योग्य दिशा दाखवते. ज्या शिक्षणामुळे, पदामुळे भ्रष्टाचार वाढतो, स्वार्थीपणा जागृत होतो, अहंकार होतो, गर्व होतो दुसऱ्यांना तुच्छ समजले जाते, अतिशय वाईट वागणूक दिली जाते, आपल्याला लाभलेल्या अधिकारांचा गैरफायदा घेतला जातो, दुसऱ्याला फसवले जाते ह्याला शिक्षण म्हणावे का?
आज मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबर सामान्य ज्ञानाचे धडे देखील दिले पाहिजे जेणे करून निदान घरी आलेल्या पाहुण्यांना या, बसा व किमान पाणी तरी दिले पाहिजे. आज ह्या साध्या साध्या गोष्टी देखील दुर्मिळ झाल्या आहे. घरात काम करणाऱ्या व्यक्तींना नावाने बोलावले जाते. मावशी, काका, दादा हे शब्द जणू त्यांना माहीत नाही. खरे तर परिस्थिती मुळे ती हतबल असतात. त्यांना हे काम करावे लागते. पण ती ही माणसंच ना? त्यांना देखील भावना आहेत. त्यांची विचारपूस करून त्यांचा अडचणी दूर केल्या पाहिजे. त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. जी व्यक्ती हे सर्व करते ते खरी शिक्षित असते. सर्व शिकलेली मंडळी वाईट असतात असे अजिबात नाही. मात्र आज ह्या आधुनिक जगात ह्यांचे प्रमाण फार कमी आहे. बोटावर मोजण्यासारखी मंडळी शिक्षणाबरोबर त्यांच्यातली माणुसकी, त्यांच्यातील चांगुलपणा, नम्रपणा जपतात. सर्वांना धरून राहतात, एकमेकांची काळजी घेतात, जपतात, वेळेला मदतीचा हात देतात. ते खरे शिक्षण होय जे आपले संस्कार व आपल्या संस्कृतीचा आदर करते.
आजकाल ह्या शिक्षणाचा देखील बाजार झाला आहे. ऍडमिशन साठी लाखो रुपये मोजावे लागतात. इतकेच नव्हे तर साध्या छोटा गटातील मुलांसाठी देखील वर्षाचा खर्च लाखांच्या घरात असतो.सामान्य लोकांनी काय करावे? त्यांना ह्याचा फार ताण येतो. आज कोरोनाच्या काळात तर अनेकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून देखील हा शिक्षणाचा खर्च करावा लागत आहे. एकीकडे गरजा भागत नाही तर हा खर्च कसा झेपणार? अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. त्यांना स्वावलंबी बनवतात. अनेक शिक्षक ज्ञान दानाचे काम करतात. ही खरी सुशिक्षित मंडळी जे इतरांचा विचार करतात व शिक्षणाची ज्योत रुजवतात.
आजकाल पाश्चात्य संस्कृतिचे अंधानुकरण केले जाते. ब्रँडेड कपडे घालण्यापेक्षा ब्रँडेड विचार जास्त महत्वाचे आहे. आज विदेशात आपल्या भारतीय संस्कृतीचे अनुकरण होते. आपले सण समारंभ साजरे केले जातात. मुलांना मराठी श्लोक व योगा शिकवतात. आपली संस्कृती रुजवली जाते, जपली जाते. तर आपल्याच देशात हाय बाय म्हणतात. नमस्कार म्हणायला लाज वाटते. त्यांचे अनुकरण करायचे तर नक्की करावे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. जसे की त्यांच्या देशातील स्वच्छता, वाहन चालवण्याचे नियम, लहान वयात दिले जाणारे स्वावलंबनाचे धडे, स्त्री पुरुष समानता, कडक कायदे व उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. कारण तेथे भ्रष्टाचार नाही. गोर गरीब असा भेदभाव नाही. सर्वांना सारखी नियमावली. बरोबरी करायची तर चांगल्या गोष्टीची करावी. कारण आपली भारतीय शिकवण म्हणजे वाईट सोडून चांगले घ्यावे हेच आहे जे आपल्या परंपरा नुसार आपल्यात लहानपणापासून रुजवले गेले आहे.
पूर्वी लोक फार शिकलेले नव्हते. पण त्यांची विचारसरणी उत्तम होती. खरे बोलणे, चांगले वागणे, ध्यान धारणा वेळेला एकमेकांना मदत करणे, माणुसकीचे धडे त्यांनी आपल्यावर रुजवले. हेच तर खरे शिक्षण जे आपल्या देशाचे नाव मोठे करते व आपले संस्कार व संस्कृती जपायला शिकवते व हातात हात घेऊन पुढे जायला शिकवते. सर्वांचे मन जपायला शिकवते. शाळेतच नाही तर घरी ही मुलांना आपण असे शिक्षण देऊ या.
लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.
शिक्षण म्हणजे नुसतं सुशिक्षित होण नसून सुसंस्कृत होणं हे सांगणारा उत्तम लेख…