जगात दया, धर्म, मानवता यांची नेहमीच वानवा रहात आली आहे. त्यात आता तर दिवसेंदिवस नितिमत्तेचे अवमूल्यन होत आहे. सख्खे भाऊ एकमेकांचे जीव घेत आहेत. वृध्द आईवडिलांना मुलं वृध्दाश्रमाची वाट दाखवित आहेत. एकीकडे मानवी मूल्यांचे इतके पतन होत असताना पुण्याचे डॉ. अभिजित आणि डॉ. मनिषा हे दाम्पत्य भिकारी, निराधार, अनाथांसाठी आशेचे किरण बनले आहेत. त्यांच्या ह्या कार्यामुळे भिकाऱ्यांचे डॉक्टर अशी त्यांची ओळख होत निर्माण झाली आहे.
प्रेरणा :
मुळचे सातारा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले डॉ. अभिजित यांनी बीएएमएस केले. त्यानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. ते चांगले स्थिरावले होते. अशात त्यांना एका परोपकारी भिकारी बाबाजीची आठवण आली. डॉ. अभिजित यांना ही नोकरी मिळण्याआधीच्या काळात वैफल्य आले होते. त्यांचा डॉक्टरी व्यवसाय चालेनासा झाला होता. अत्यंत उव्दिग्न मनस्थितीत ते एकदा खडकवासला येथील मंदिरात जाऊन बसले असता तेथे एका भिकारी बाबाजीने त्यांना खूप धीर दिला.”हिम्मत हारू नको बाळ” म्हणून त्यांना दिलासा दिला. इतकेच नाही तर केवळ शाब्दिक दिलासा देऊन न थांबता त्यांनी स्वतःच्या कटोऱ्यात जमा झालेले भिकेचे सर्व पैसे देऊन प्रत्यक्ष मदत केली.

पुढे स्थिरस्थावर झाल्यावर या प्रेरणादायी बाबाजींना भेटण्यासाठी डॉ अभिजीत तेथे गेले असता त्या बाबाजीचे निधन झाल्याचे त्यांना कळाले. हे ऐकताच डॉ. अभिजित यांना अतिव दु:ख झाले. ज्या बाबाजींनी आपल्या पडत्या काळात आपल्याला दिलासा दिला, त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकलो नाही,त्यांना शेवटपर्यंत भीक मागून जगावे लागले ही बाब त्यांच्या मनाला चटका लावून गेली. आता या चुकीचे आपण परिमार्जन करावे असा निश्चय करून आपले उर्वरित आयुष्य अशा भिकारी, दु:खी, कष्टी लोकांना मदत करण्यासाठी, त्यांना माणूस म्हणून उभे करण्यासाठी वेचावे असा त्यांनी मनाचा ठाम निर्धार केला. चांगल्या नोकरीवर पाणी सोडून ह्या जगा अघाटीत सेवायज्ञात उडी घेतली. लोक काय म्हणतील ? याची पर्वा केली नाही.सुदैवाने पत्नी डॉ. मनीषा हिनेही त्यांच्या विचारांना साथ देऊन सक्रीय सहभाग दिला.
डॉ. मनीषा यांनी वैद्यकीय व्यवसायातून प्रपंच चालविला आणि उर्वरित पैसे त्या पतीच्या कार्यात मदत करण्यासाठी देत राहिल्या.
डॉ. अभिजित दिसेल त्या भिकाऱ्यांची मदत करू लागले. त्यांच्या दु:खावर फुंकर घालू लागले. मात्र सुरूवातीला भिकारी त्यांच्यावर विश्वास ठेवत नसत. हा डॉक्टर आपल्या किडन्या तर काढायला आला नसेल ना ? अशा शंकेने, भीतीने ते फुकट उपचार करून मिळत असतानाही उपचार करून घ्यायला घाबरत असत. पुढे मात्र हळुहळु डॉ. अभिजित यांची सचोटी व सेवा पाहून ते डॉक्टरांच्या जवळ येऊ लागले.
डॉ. अभिजित कोणत्या देवाचा कोणता वार आहे हे लक्षात घेऊन त्या-त्या दिवशी मंदिर, मशिद, चर्चच्या ठिकाणी जाऊन तेथे येणाऱ्या भिकाऱ्यांची विचारपूस करू लागले. त्यांचा औषधोपचार करणे, त्यांच्या जखमा पुसून मलमपट्टी करणे, जेथे गरज असेल अशा आजारी भिकाऱ्यांना दवाखान्यात भरती करू करणे, आवश्यक तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करणे आदी बाबी ते स्वतःच्या पैशातून करू लागले. या लोकांना आंघोळ घालणे, त्यांच्या अंगावर कपडे घालणे इ. कामे करू लागले. आता ते भिकाऱ्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग बनले आहेत.

एका सर्वेक्षणानुसार पुण्यात सुमारे ३५०० भिकारी आहेत. त्यापैकी ११०० जणांशी ते जोडल्या गेले आहेत . घरून सकाळीच औषधाच्या बॅगा, कटिंग, दाढीचे सामान घेऊन ते आपल्या बाईकवर निघतात.
भिकारांच्या वस्तीत जातात. त्यांना तपासून औषधोपचार करतात. डोक्याचे केस, दाढी-कटिंग वाढल्याने विद्रुप दिसणाऱ्या भिकाऱ्यांना ते चांगले करतात. बऱ्याचशा भिकाऱ्यांना अंधत्व आल्याचे आढळल्यावर तपासणी करून अनेकांच्या त्यांनी नेत्र शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत.
स्वावलंबी करण्याची गरज :
भिकाऱ्यांचा समाज आणि सर्व सामान्य माणसांचा समाज ह्यात मोठी दरी आहे. भिकाऱ्यांना नेहमी हेटाळणी, तिरस्कार सहन करावा लागतो. याचे एकमेव कारण म्हणजे तो आपले स्वत्व हरवलेला परावलंबी माणूस आहे. तर दुसरीकडील समाज स्वावलंबी आहे. वास्तविक पाहता ही पण माणसं आहेत आणि ती पण माणसंच आहेत. म्हणूनच भिकारी समाजाला स्वावलंबी करणे गरजेचे आहे. ते स्वावलंबी व्हावेत, त्यांचे आजार, अपंगत्व घालवून रोजगार उपलब्ध करून दिल्यावर त्यांना माणूसपण पुन्हा प्राप्त होऊन त्यांचे भीक मागणे थांबावे यासाठी डॉ. अभिजित यांची सदैव धडपड सुरू असते. या कामासाठी पैसा कमी पडतो म्हणून त्यांनी सोहम ट्रस्टची स्थापना केली. त्याव्दारे लोकांना आवाहन करून मदत गोळा करण्याचे कामही ते करीत आहे. अशिक्षित, निर्धन अशा या समाजाला दोन पैसे मिळविता यावे यासाठी ते वेगवेगळे उपाय करीत आहेत. मंदिरातून निर्माल्य गोळा करणे, निर्माल्यापासून पावडर तयार करून त्यापासून औषधोपयोगी द्रव्य तयार करून विकणे, वाया गेलेले कापड मिळवून पिशव्या तयार करणे, द्रव साबण, शोभेच्या वस्तू, गुच्छ इत्यादी तयार करणे, यासह ज्यांच्यात कौशल्य असेल त्यांना कौशल्यानुरूप कामे मिळवून देणे अशाप्रकारे त्यांना उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ अभिजीत ह्यांना त्यांच्या कामाकरिता स्वतंत्र जागेची फार गरज होती. ही गरज द बिबवेवाडी येथे २५०० चौरस फूट जागा देऊन दानिश शहा या दानशूर व्यक्तीने पूर्ण केली. सोबत आवश्यक साहित्यही घेऊन दिले.
प्रशिक्षण केंद्र :
दानिश शहा यांनी दिलेल्या जागेत “मध्यरात्रीचा सूर्य” हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
ह्या केंद्रात काही प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्षेकरी वेगवेगळे कौशल्य अवगत करीत आहेत. हा “मध्यरात्रीचा सूर्य” भिकारांच्या जीवनातील अंधार दूर करीत आहे.

मुलेमुली दत्तक :
डॉ. अभिजित यांनी भिक्षेकऱ्यांच्या कुटुंबातील ५२ मुलेमुली दत्तक घेऊन त्यांना शिक्षित करण्याचे ते प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी काहींना शासकीय विभागात उत्तम नोकऱ्या पण मिळाल्या आहेत. एक मुलगी तर आता स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे.
देवाची कल्पना :
डॉ. अभिजित यांची देवाविषयीची संकल्पना साधी आहे. भिकारी, दीनदुबळे, निराधार यांची सेवा हीच त्यांची पूजा असून, रंजले-गांजले हेच त्यांचे देव आहेत. ते म्हणतात, एखाद्या भिकाऱ्याला जेव्हा मी आंघोळ घालतो तेव्हा तो माझ्यासाठी अभिषेक असतो. त्यामुळे मला कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. वेद जाणण्याऐवजी दु:खीतांच्या वेदना जाणाव्या, असा विचार ते मांडतात. मी कोणीच नाही जे काही आहात ते तुम्ही सगळे आहात. ह्या कार्यात आर्थिक, मानसिक प्रोत्साहन तुम्ही मला देता, त्यामुळे मी हे करू शकतो. तुमच्याबरोबरच पत्नी डॉ. मनिषा हिचा ही तेवढाच महत्त्वाचा वाटा माझ्या यशात आहे. ती नसती तर मी काहीच करू शकलो नसतो, असे ते मानतात.
दृष्टिक्षेपात कार्य :
२८५ भिक्षेकऱ्यांना स्वतंत्र व्यवसाय टाकून दिला.
५२ मुलामुलींना दत्तक घेऊन शिक्षित करण्यात येत आहे. काहींना चांगल्या नोकऱ्याही मिळाल्या आहेत.
२५०० नेत्र शस्त्रक्रिया करवून घेऊन त्यांचे अंधत्व दूर केले.
३० जणांना श्रवणयंत्रे मिळवून दिली.
१४४ जणांवर ५ लाख रुपयांवरील खर्च असलेल्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
१०० लोकांचा चमू तयार करून पुण्यातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येत आहे. त्या बदल्यात त्यांना वेतन देण्यात येत आहे.
पुरस्कार :
डॉ. अभिजित आणि डॉ. मनिषा यांच्या या मानवतावादी कामाची दखल घेऊन त्यांना आता पर्यंत २५०० पुरस्कार मिळाले आहेत. लोकमान्य टिळक, संत गाडगेबाबा, मदर टेरेसा ह्या सारख्या महत्वपूर्ण पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. शासनातर्फेही त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.

मुलाखतीचा शेवट करताना डॉ अभिजीत म्हणाले, “मला कितीही बक्षीसे मिळाली तरी खरे बक्षीस मला तेव्हाच मिळेल जेव्हा मी सर्व भिकाऱ्यांना स्वावलंबी करून प्रतिष्ठा मिळवून देईल.” हेच त्यांचे अंतिम स्वप्न आहे.

डॉक्टरांचे हे उदात्त स्वप्न साकार करण्यासाठी आपणही सर्व जण मिळून शक्य ती मदत करू या.

— लेखन : रणजीत चंदेल. निवृत्त माहिती अधिकारी, यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800