भारताचे अर्थमंत्री झाल्यानंतर डॉ मनमोहनसिंग हे नांदेड येथील गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब येथे दर्शनासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांचे सिरेपाव, पगडी, तलवार भेट देऊन गुरुद्वाराचे तत्कालीन मुख्य जत्थेदार संतबाबा हजुरासिंगजी धूपिया यांनी सत्कार केला. त्या क्षणाची छायाचित्रे काढण्याचे भाग्य मला लाभले.
डॉ मनमोहन सिंग यांच्यासाठी या सत्काराचे महत्व ओळखून मी वेळ न दवडता सत्काराचे छायाचित्र मोठ्या आकाराचे बनवून घेतले आणि ते लैमिनेटे करुन डॉ मनमोहन सिंग यांना भेट स्वरुप दिले.
छायाचित्र पाहताच ते प्रसन्न झाले आणि सर्वांदेखत त्यांनी माझे कौतुक करीत ते म्हणाले, “माझ्यासाठी ही भेट खूप अनमोल आहे कारण गुरूजीच्या दरबारी माझा सन्मान झाला आहे.”
तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री स्व. शंकरराव चव्हाण, खासदार अशोकराव चव्हाण यांचीही त्यावेळी उपस्थिती होती.
आजही तो प्रसंग आठवला की, आपल्या सेवेचे चीज झाले असे वाटून त्यांच्या विषयी मन विनम्रतेने भरून येते.
— लेखन : विजय होकर्णे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800