नाटककार, दिग्दर्शक, नाट्य समीक्षक आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धेच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे वरिष्ठ सहायक डॉ.सतीश पावडे यांचे कॅनडाच्या टोरांटो शहरात “भरताचे नाट्यशास्त्र” या विषयावर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले.
हिंदी राईटर्स गिल्ड, कॅनडा द्वारा आयोजित गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर महोत्सवाच्या अंतर्गत डॉ. पावडे यांचे हे व्याख्यान स्प्रिंगडेल लाईब्रेरी, ब्रॅम्पटन येथे आयोजित करण्यात आले होते.
आपल्या व्याख्यानात डॉ. सतीश पावडे यांनी प्राचीन भारतीय कला परंपरा आणि भारतीय ज्ञान परंपरेच्या परिप्रेक्षात भरताच्या नाट्यशास्रावर प्रकाश टाकला. “”भरताचे नाट्यशास्त्र” मूलतः तत्कालीन भारतातील भरत नामक कलोपजिवी, श्रमजीवी तथा आयुधजिवी समाजाची नाट्य परंपरा आहे. हा ललित कलांचा सर्व प्रथम वैश्विक शास्त्रीय ग्रंथ आहे. समृद्ध भारतीय कला-संस्कृतिचे प्रतिनिधीत्व नाट्यशास्त्र हा ग्रंथ करतो आहे. नृत्य, नाटय, संगीत, शिल्प आणि चित्रकला या केवळ ललित कलांचेच नाही तर तत्कालीन समाज व्यवस्था आणि कला – संस्कृतिक जीवनाचे दर्शनही नाट्यशास्त्र या प्राचीन ग्रंथातून होते.
चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील शूद्र वर्णाने ही कला जोपासली, वाढविली आणि परंपरागत व्यवसाय म्हणून वृध्दींगत केली. नाट्यधर्मी (कलात्मकता) आणि लोकधर्मी (सामान्य लोकजीवन) हा नाट्यशास्त्र या ग्रंथाचा मुलाधार आहे. अशा भारतीय संस्कृती आणि ललित कलांचा वारसा असलेल्या, ललित कलांचा समग्र विश्वकोश असलेल्या नाट्यशास्त्र या ग्रंथाचा संपूर्ण जगाला परिचय करून देणे आवश्यक आहे.” असे मौलिक विचार त्यांनी आपल्या व्याख्यानात प्रस्तुत केले. शेवटी श्रोत्यांच्या प्रश्र्नांची उत्तरेही दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन हिंदी राईटर्स गिल्ड, कॅनडाच्या संचालक डॉ. शैलजा सक्सेना यांनी केले होते. तांत्रिक निर्देशक पुनम चंद्रा ‘मनु’ या होत्या.पाहुण्यांचा परिचय आणि कार्यक्रमाचे संचालन पियुष श्रीवास्तव यांनी केले. या कार्यक्रमाला कॅनडातील अनेक प्रथितयश कवी, कवयित्री, लेखक, नाटककार, नाट्यदिग्दर्शक, नाट्य संशोधक आदी उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800