मुळातच धाडसी स्वभावाचे, नौदल व पुढे कस्टम्स मध्ये गौरवास्पद सेवा बजावलेले, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते, स्वतःचे विचार स्पष्ट व परखडपणे मांडणारे वक्ते, रेकी मास्टर, वास्तू विशारद, अतिशय आनंदी, उत्साही अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे पुण्याचे डॉ सुनील अंदुरे हे होत. जाणून घेऊ या, त्यांचा भन्नाट पण तितकाच प्रेरणादायी जीवन प्रवास….
श्री सुनील अंदुरे यांचा जन्म ३१ जुलै १९६४ रोजी, आजोळी जुन्नर येथे झाला. त्यांचे मूळगाव अगदी दुर्गम, खेड़ पार्थडी. त्यांचे घराणे मूळचे खरवंडीचे. पण १०० वर्षा पूर्वी प्लेगच्या महामारीत आजोबांनी गाव सोडले. त्यामुळे सुनीलजींचं तिसरी पर्यंतचे शिक्षण
जाटदेवळे खेड्यात झाले.
पुण्यातील प्रसिद्ध गंभीर क्लासेसचे गंभीर सर
सुनीलजींचे मामा. त्यांच्या सांगण्यावरून सुनीलजीं पुण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रसिद्ध अशा भारत इंग्लिश स्कुल मध्ये झाले. पुढे बी एम सी सी सारख्या उकृष्ट कॉलेजमध्ये अकरावी व बारावीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांचे वडील सेनादलात होते. त्यामुळे सुनीलजींचा जास्त कल तिकडेच होता.
तेव्हा ते रहायला संगमवाडी सारख्या ठिकाणी होते, जिथे जवळच बॉम्बे इंजीनीअरींग ग्रुपचे ट्रेनिंग चालायचं. ते सर्व रोज पाहून त्यांनी ठरवले की आपणही सेनादलात गेले पाहिजे.
आपल्या इच्छे प्रमाणे नियोजनपुर्ण प्रयत्न केल्यामुळे सुनीलजींची निवड भारतीय नौदलात झाली. तिथे सेवेत पाच वर्षे झाल्यानंतर दुर्दैवाने एका मोठया अपघातात ते चौथ्या मजल्यावरून पडले. त्यांना मल्टिपल फ्रॅक्चर झाले. सुदैवाने त्यातून ते बरे झाले.
खरं म्हणजे तो, सुनीलजींचा पुनर्जन्मच होता. शरीरयष्टी चांगली होती म्हणून ते एवढ्या मोठया अपघातातून सुखरूप बाहेर पडले. शेवटी देव तारी त्याला कोण मारी, हेच खरे. नौदलात ते क्लास लीडर, नंतर डीव्हिजनल लीडरही झाले. पण वैद्यकीय कारणास्तव त्यांना नौदल सोडावे लागले, ज्याचे त्यांना आजही दुःख होते.
नौदलातुन परत आल्यावर, पेन्शन घेत घरी स्वस्थ न बसता त्यांनी पुन्हा लढायचे ठरवले. परिस्थिती पुढे ते झुकले नाही. त्यांनी हार मानली नाही. मुळातच धाडसी स्वभाव असल्याने त्यांना ते जमलेही आणि त्यांनी नव्या दमाने आयुष्याची सुरुवात करायचे ठरवले.
सुनीलजीं विविध स्पर्धा परीक्षा देऊ लागले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. १९८७ साली त्यांची निवड कस्टम्स खात्यात होऊन टेलिकम्युनिकेशन ऑपरेटर म्हणून नेमणूक झाली.
कस्टम्समध्ये सुरवातीला ते दापोली येथे होते. पुढे महाबळेश्वर, तेथून ते पुन्हा दापोलीत आले. नंतर पुण्यात देखील त्यांनी पाच वर्षे सर्विस केली. कामातील चिकाटी, प्रामाणिकपणा यामुळे ते कस्टम्स मध्ये सुपरवायझर पदापर्यंत पोहचले.
सुनीलजींनी १९९९ मध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विविध उपक्रमांचे नेतृत्व केले. कल्चरल स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य केल्याबद्दल प्रमुख पाहुणे अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांच्या हस्ते दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक घेताना ते धन्य झाले.
कस्टम्स मध्ये असताना युनियन लीडर नक्की काय व कसे काम करतात ? असे अनेक प्रश्न त्यांना पडत. त्यामुळे त्या दिशेने ते आकर्षित झाले. त्यांचा प्रामाणिकपणा, स्पष्ट वक्तेपणा, नेतृत्वगुण पाहून युनियन लीडर म्हणून त्यांची निवड झाली. आपल्या सहकाऱ्यांसाठी काम करताना त्यांनी कडक धोरण आखले. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कठोर निर्णय घेतले. त्याची त्यांना किंमतही चुकवावी लागली. पण त्याची त्यांना कधीही खंत वाटली नाही. शेवटी चोवीस वर्षे सेवा करून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली.
त्यांचा सेवेतील शेवटचा काळ, म्हणजे २००० ते २०११ रत्नागिरीत गेला. कोकणात सेवारत असल्याने त्यांना कोकण बघता आले. कोकणामधील गरिबी व आपला समाज यांच्याशी ते जोडले गेले.
शिक्षणाच्या ओढीने कस्टम्समध्ये असतानाच त्यांनी तत्वज्ञान हा प्रमुख विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी ए ची पदवी बाहेरून संपादन केली.
कस्टम्स मधून बाहेर पडल्यावर त्यांनी सरकारमान्य संस्थेतून तीन वर्षांचा बॅचलर इन आलटरनेटिव्ह सिस्टिम्स ऑफ मेडिसिन हा कोर्स पूर्ण केला आणि ते डॉक्टर झाले. पुढे ते वास्तू विशारद देखील झाले. इतक्यावर न थांबता ते रेकीसारख्या पारंपरिक उपचार पध्दतीचे ग्रँड मास्टर झाले आहेत.
पद्मश्री डॉ विजय भटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली
२००४ – २००५ साली इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड हेल्थ केअर संस्थेची स्थापना झाली. डॉ विनोद मराठे व डॉ सुजाता वैद्य यांच्यासह ते पारंपरिक उपचार पद्धतीवर संशोधन आणि उपचार करत होते. या अंतर्गत त्यांनी १०० हुन अधिक अंधांना मोफत अँक्यूप्रेशर शिकवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून दिले. अंधांना शिकवणे खूप चॅलेंजिंग होते. पण गुरुकृपेने ते शक्य झाले असे ते मानतात.
पारंपरिक उपचार पद्धतीने हृदय रोगांवर उपचार व ऍक्युपंक्चर उपचाराने हृदय रोगांवर उपचार या विषयांवर त्यांनी प्रबंध सादर केला आहे. या दरम्यान त्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर १३ डॉक्टर्सच्या टीमने उपचार केले. यावेळी सुनीलजींनी अग्निहोत्राने रोग प्रतिकारक शक्ती वाढणे याचा शास्त्रीय आधार मांडला व संस्थेमार्फत अग्निहोत्राचा प्रचार प्रसार केला. चार वर्षे या संस्थेच्या माध्यमातुन त्यांनी कार्य केले.
सुनीलजी जेव्हा १९९५ साली पुण्यात होते तेव्हाचे कासार समाजाचे अध्यक्ष ज्यांचे नाव आर्वजून त्यांना घ्यावेसे वाटते ते म्हणजे माननीय प्रकाशजी सासवडे यांच्याशी त्यांची भेट झाली. सविस्तर चर्चा करून त्यांनी समाजात काम करावे अशी इच्छा सासवडे यांनी व्यक्त केली व ती त्यांनी मान्य केली.
गणेशोत्सवाच्या माध्यमातुन त्यांनी समाजात काम करायला सुरवात केली. त्यावेळेस राजुशेठ, श्री विलास यंदे व गिरीश चळेगावकर आदी एकत्र आले. त्यांनी संघटनेला प्राबल्य दिले. त्यावेळी संवाद साधायला आजच्यासारखी आधुनिक साधने नव्हती. फोन नव्हते. मोबाईल नव्हते. तरी त्यांनी संघटना बळकट करून दाखवली. हे त्यांचे फार मोठे कर्तृत्व आहे.
संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष भेटून, बोलून समाजाचे संघटन किती महत्वाचे आहे हे समाज बांधवांना पटवून दिले. संपूर्ण पुण्यात ते फिरले. जेष्ठांची चौकशी केली. सर्वांशी संवाद साधला. त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे सर्वांमध्ये आपलेपणाची जाणीव निर्माण झाली.
समाजाच्या विकासासाठी त्यांनी नवीन पाऊले उचलली. ६० ते ७० मुलांची ‘युवा संघटना उभी केली. ही खरंच खूप मोठी कामगिरी होती. त्यावेळी श्री गिरीश कोळपकर हे सुनीलजींच्या दृष्टीकोनातून एक रत्न होते. सुनीलजींनी त्यांना मुळ प्रवाहात आणले. त्यांच्याकडून मंदिरातले डेकोरेशन करून घेऊ लागले. आज टीव्ही मालिकांच्या दुनियेत गिरीश कोळपकर यांनी स्वतःची मोठी ओळख निर्माण केली आहे, याचा सुनीलजींना सार्थ अभिमान वाटतो.
या विविध उपक्रमांमुळे समाजाला वेगळेपण दिसले. ही मुलं नवीन काही करत आहे याची जाणीव झाली. त्यामुळे समाजाचे पाठबळ मिळु लागले. माननीय वकील श्री बाळासाहेब सुपेकर हे त्यांचे सामाजिक कार्यातले गुरू. तसेच डि के मुरुडकर यांनीही खूप पाठबळ दिले. ते नेहमी म्हणत की, ‘सुनील तू चांगले काम करतोस, तु पुढे चाल’.
सुनीलजी व त्यांच्या समस्त सहकाऱ्यांनी १९९६ साली पुण्यात पहिला करिअर महोत्सव घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० मुलं आली होती. या दोन दिवसांच्या मेळाव्यामध्ये डिफेन्स सर्विस, यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परिक्षा, दहावी नंतरचे कोर्सेस, व्यवसाय मार्गदर्शन अशा विविध विषयांवर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अतिशय उत्तम, नियोजनबद्ध मेळाव्यामुळे सुनीलजींची सर्व महाराष्ट्रात ओळख
निर्माण झाली .
सोमवंशीय क्षत्रिय कासार मध्यवर्ती मंडळाचे १९९८ साली पु भा अक्कर अध्यक्ष होते. पुण्याचे, धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यानी सुनीलजींचे नाव सुचवले. त्यांना मध्यवर्तीच्या युवा संघटनेत युवा अध्यक्ष म्हणुन पद द्यावे असे सुचविले. पण दुर्देवाने त्यांना उशीर झाला. सुनीलजीना युवा उपाध्यक्ष हे पद देण्यात आले. १९९८-२००१ या तीन वर्षासाठी त्यांनी युवा उपाध्यक्ष म्हणून धडाडीने काम पाहिले.
१९९८ मध्ये पुण्यात कस्तुरबा हॉल मध्ये पहिला हाय टेक मेळावा त्यानी घेतला. त्या वेळेपासुन पुण्यात सर्व मेळावे आधुनिक पद्धतीने आयोजित करणे सुरू झाले आहे.
सुनीलजींचे आवडते क्षेत्र म्हणजे कुस्ती. त्यात देखील त्यांनी आपले वर्चस्व सोडले नाही. अनेक बक्षिसांचे ते मानकरी ठरले. इतकेच नाही तर मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन देखील बक्षिसे मिळवली. कस्टम्स मध्ये कार्यरत असताना देखील त्यांनी आपली खिलाडू वृत्ती सोडली नाही.कस्टम्स डिपार्टमेंटच्या टीम मधून क्रिकेट व कॅरम मध्ये त्यांनी बाजी मारली. क्रिकेट टीमचे तर ते कॅप्टन होते.
अभिनयाची आवड असल्याने सुनीलजींनी अनेक सांस्कृतिक उपक्रमात भाग घेऊन स्वतःला सिद्ध केले. राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली. तेथे देखील त्यांनी अनेक बक्षीसे पटकावली.
विविध प्रकारचे कल्पक उपक्रम धडाडीने राबवून ते यशस्वी करण्यात हातखंडा असलेल्या पुणे जिल्हा विकास समितीची स्थापना केल्याबद्दल त्यांना २०१९ साली सन्मानित करण्यात आले. रत्नागिरीत देखील त्यांना समाजभूषण प्रदान करण्यात आला होता. अशा एक न अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.
सुनीलजींच्या कुटुंबात आई, धाकटा भाऊ, पत्नी, दोन मुलं आहेत. त्यांची मुलगी सौ स्नेहा प्रसाद तवटे हीने बी कॉम व सॉफ्टवेअर इंजिनियर अशा पदव्या मिळवल्या आहेत. जावई श्री प्रसाद पुरुषोत्तम तवटे हे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. मुलगा रोहन हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात स्टोअर सांभाळतो.
सुनीलजींना अध्यात्माची देखील आवड असल्याने त्यांनी अनेक ग्रंथ वाचले आहेत. त्यातील विचार आत्मसात देखील केले आहेत. तरुणच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. पण ते आवर्जून सांगतात की, तरुणांनी पहिले प्राधान्य आपल्या करिअरला द्यावे व मगच लग्नाचा विचार करावा. सर्वात मोठी धन संपत्ती म्हणजे आपले आरोग्य आहे. त्यामुळे आपले आरोग्य टिकव, आरोग्य चांगले असेल तर मन चांगले राहते. त्यामुळे तुमचे विचार चांगले राहतील. तुमच्या हातुन कधीच वाईट काम होणार नाही. तुम्हीं समाजाचे भूषण म्हणून पुढे येऊ शकता. मुलांना ते असे सांगु इच्छीतात की, तुम्ही कोणाचेही अंधानुकरण करू नका. तर प्रश्न विचारा.
अभ्यासक व्हा. वाचन करा. समजुन घ्या. तुमची अंतर्ज्योत पेटवा आणि मग पहा तुमच्या चेह-यावर किती तेज येते !
सुनीलजींनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेऊन धीराने व धैर्याने बिकट परिस्थितीचा सामना करून स्वतःला सिद्ध केले आहे. तरुणांसाठी ते एक उत्तम उदाहरण आहेत. लढा, पुढे चला व जिंकून दाखवा, अशक्य काहीच नाही हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले आहे. त्यांची ही यशोगाथा वाचल्यावर आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. त्यांच्या जीवन कार्याला मानाचा मुजरा.

– लेखन : रश्मी हेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
रश्मी हेडे, यांचा ” डॉ सुनील अंदुरे, नौसेना ते समाजसेवा ” हा व्यक्ती रेखात्मक लेख उत्कृष्ट झाला आहे. डॉ. सुनीलजी यांच्या नौसेना सेवेच्या कारकिर्दीत वैयक्तिक पातळीवर नवनवीन तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रम पूर्ण केलेच, परंतू आपली सामाजिक जबाबदारी व दायित्व ओळखून व ती जागृत ठेवून कार्यरत राहिले. त्यामुळे त्यांच्या या यशोगाथेतून आजच्या तरूणांना प्रेरणा व प्रोत्साहन नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो.
राजाराम जाधव,
सहसचिव सेवानिवृत्त
महाराष्ट्र शासन