येतानाची पाटी कोरी
जातानाची कोरी पाटी
दो घटितांच्या अंतरात या
विधिलिखितांची असते दाटी
संस्कारांच्या कुबड्या घेउन
जो तो पाउल टाकत राही
कुणी सरळ तर कुणी वाकुड्या
वाटेवरचा पाइक होई
प्रवाहासवे कुणी वाहतो
कुणी अक्रसत झिजत राहतो
कुणा दान पुण्याचे मिळते
कुणि पापी रुतव्यात अडकतो
कोणी वरतो विवेक, संयम
कोणी डोक्यावरती पडतो
अशी प्रभावळ आगे मागे
जो तो अपुली जागा घेतो
गिचमिड विधिलिखितांची उकलुन
जो डोळ्स ती समजुन घेतो
त्यास सापडे दिशा उजळती
तोच प्रगल्भत फुलत राहतो
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800