कोरोनाचं संकट कायम असतानाच त्यात म्यूकरमायकोसिस या विकाराची भर पडली आहे. हा विकार नेमका काय आहे, झाला तर काय करावे आणि मुळातच होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी, हे सांगताहेत, पुणे येथील प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. क्षितिजा पंडितराव कस्तुरे……
डिसेंबर २०१९ मध्ये चीन मधील वूहानमध्ये हाहा:कार माजवणारा कोरोना विषाणू, अल्पावधीतच एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे आपले हातपाय पसरून साऱ्या जगाला कब्जात घेईल, असं तेव्हा स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं.
लॉकडाऊन, क्वारंटाइन, ॲंम्ब्युलन्सचे आवाज, असुरक्षितता तसेच कोरोना रुग्णांनी प्रचंड मानसिक तणावाखाली मोजलेले चौदा दिवस, ह्यातून पूर्णपणे सुटकादेखील होत नाही, तोच “म्यूकरमायकोसिस” ह्या बुरशीजन्य विकाराचा मानव जातीत शिरकाव झाला, आणि पुन्हा एकदा सगळीकडे चिंतेचं वातावरण पसरलं.
खरं तर म्यूकरमायकोसिस वैद्यकीय जगतात अजिबात नवीन नाही. फरक एवढाच की पूर्वी तो क्वचित आढळत असे आणि आता खूप जास्त प्रमाणात केसेस आढळत आहेत.
म्यूकर म्हणजे बुरशी. बुरशीचे तंतू आपल्या सभोवताली असतात. त्यांचा प्रवेश नाकातून किंवा क्वचित जखमांमधून देखील होतो. नाकातून प्रवेश केल्यानंतर बुरशीचे तंतू नाकाच्या बाजूला असलेल्या सायनसमध्ये येतात. तिथून त्यांचा प्रवास डोळ्यांच्या खोबणीकडे होतो. डोळ्यांनंतर हे तंतू थेट मेंदूत शिरकाव करतात.
म्यूकरमायकोसिस झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला नाक चोंदणे, नाकातून रक्तमिश्रित म्यूकस बाहेर येणे, अशी लक्षणे दिसून येतात. पुढे सायनस किंवा डोळे बाधित झाल्यावर डोके दुखणे, डोळे व चेहरा सुजणे व लाल होणे, नाकाच्या बाजूला दुखणे अशा लक्षणांना सुरुवात होते. आजार बळावल्यानंतर अचानक दृष्टी जाणे, दुहेरी प्रतिमा दिसणे, डोळे बंद न करता येणे अथवा डोळ्यांची हालचाल न करता येणे अशी लक्षणे दिसू लागतात.
म्यूकरमायकोसिसमध्ये नाकात व टाळूवर काळे डाग येतात. नाकातील म्यूकसच्या तपासणीत निदान पक्के होते. सिटी स्कॅन, एमआरआयमध्ये म्यूकरमायकोसिसची व्याप्ती कळते.
कोरोनाच्या उपचारादरम्यान प्रतिकारशक्ती कमी झालेले रुग्ण, व्हेंटिलेटर अथवा इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा वापर, स्टिरॉइड्सचा अति वापर, रुग्णांच्या स्वच्छतेच्या बाबतीतील निष्काळजीपणा, अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, ह्या गोष्टी आजाराच्या वाढीस कारणीभूत ठरतात.
उत्तम प्रतिकारशक्ती असलेले रुग्ण म्यूकरमायकोसिसशी यशस्वीरीत्या लढा देऊन त्यातून मुक्त होऊ शकतात. ९०% रुग्ण लवकर उपचार सुरू केल्यावर बरे होऊ शकतात. मधल्या स्टेजमधील ७०% रूग्ण देखील योग्य औषधोपचाराने बरे होऊ शकतात. परंतु आजार अंगावर काढून अथवा भीतीपोटी उशीरा आलेल्या रुग्णांना मात्र आपला जीवदेखील गमवावा लागतो.
म्यूकरमायकोसिसची लागण टाळण्यासाठी स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असण्याची गरज आहे.
दमट वातावरणात, शिळ्या अन्नावर, ओलसर भिंतीवर बुरशीची वाढ होत असते. घराच्या दारं खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती ठेवली पाहिजे. शिळं अन्न खाऊ नये. ओले कपडे घालू नयेत. नियमित आंघोळ, त्वचा कोरडी ठेवणे, अस्वच्छ हातांनी डोळे न चोळणे, अशा साध्या आणि सोप्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे.
म्यूकरमायकोसिस सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचाराने बरा होऊ शकतो परंतु तो वाढल्यास बाधित भाग ऑपरेशनद्वारे काढून टाकावा लागतो. डोळा बाधित झाल्यास डोळा देखील काढून टाकावा लागतो.
लक्षणांची सुरुवात झाल्या झाल्या इंटरनेट, गुगल धुंडाळण्यात वेळ न दडवता त्वरित दवाखान्याकडे रुग्णांचे पाय वळले पाहिजेत .
कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञ यांच्या सल्ल्याने तपासणी करून घेतली पाहिजे. नंतर हताश होण्यापेक्षा वेळेवर उपचार करणे कधीही हिताचेच नाही का ?

– लेखन : डॉ क्षितिजा पंडितराव-कस्तुरे
एम एस (ऑपथालमोलॉजी)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
very informative… thank you for sharing
👍सुंदर माहिती 👌
धन्यवाद