लहान मुलांना आजी, आजोबा जेव्हा गोष्टी सांगतात, शिकवतात , दाखवतात, त्यात ढग असतातच. पांढरे शुभ्र, कापसासारखे दिसणारे, मऊ वाटणारे ढग लहान मुलांनाही आवडतात. वाऱ्यामुळे त्यांची पळापळ बघायला मजा वाटते. त्यांचे आकार वेगवेगळे दिसतात. “आजोबा तो पहा मासा, तो ससा, तो राक्षस, तो चेहरा, ते झाड..“ असे आपल्या परिने त्या आकाराचे वर्णन, ती मुलं करतात आणि एका वेगळ्याच भाव विश्वात रमतात.
जरा मोठे झाल्यावर “नाच रे मोरा गाण्यातल्या.. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे… आता तुझी पाळी, वीज देते टाळी”…ह्या ओळी ऐकून, काळे ढग आणि वीज हे समीकरण त्यांनी केलेले असते.
तर हल्लीची मुलं सलील कुलकर्णींच “अगोबाई ढगोबाई”.. हे गाणे ऐकले कि नाचायला लागतात.त्याचे चित्रीकरण मुलांना आवडेल इतके सुरेख केले आहे. काळे, मोठे ढग कधी कधी मुलांना घाबरतातही.!
एके काळी दादा कोंडक्यांच्या… “ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं” ह्या धमाल गाण्यानी तरूणांना वेड लावलं होतं. ढगाला त्यावेळी फारच महत्व आलं होतं. ट्रिपला हे गाणं ठरलेलं असायचं.
आषाढ महिना आला कि कालिदासांच्या मेघदूताची आठवण होते. त्यातल्या यक्षाला आषाढातला मोठा ढग हत्ती सारखा वाटला , आणि त्याच्या मार्फत तो आपल्या प्रेयसीला निरोप पाठवतो, ही कवी कल्पना अजरामर झाली आणि या ढगाला दूताची नविन भूमिका मिळाली.
हल्ली खूप जण विमानातून प्रवास करतात. विमान आकाशात उडत असताना कधी खाली कापसाचे पुंजके, कधी आजूबाजूला गलेलठ्ठ कापसाची गादी, कधी सुर्यास्ताच्या रंगांची त्यांना झालर, कधी काळ्या ढगांतून प्रवास.. असे ढगांचे मनोहरी दृष्य दिसते.
शाळेत असतांना आपण समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ती वर जाते, त्याचे ढग बनतात, मग त्यातून खाली पाऊस पडतो असे ढोबळ शिकलेले असतो. एकंदरच, पूर्वी ढगाची, आपल्या आयुष्यात बालिश निरागस भावने पासून, रोमांटिक भावनेपर्यंत जागा होती.
हे सर्व सांगायचे कारण असे कि परवा मी माझ्या नातवाला कौतुकांनी पांढरे शुभ्र, सुंदर दिसणारे ढग दाखवले तर तो म्हणाला ”आजी हे स्टॅटोक्युम्युलस आहेत“.
माझी विकेट… मला काही कळले नाही.
“म्हणजे रे काय ?”….. “आजी तुला इतकं पण माहित नाही ? हे cloud च नांव आहे. हा कमी उंचीवरचा cloud आहे.“
हे दुसरीतल्या मुलांनी मला सांगितले. १० प्रकारचे clouds असतात, त्यांची मोठी मोठी नांव, त्यांची उंची, आकार …, कुठले पाऊस देतात,.. त्यांचे weather कळतांनाचे महत्व…
बाप रे ! मी तोंडात बोटं घालायचीच बाकी होते…
त्यांना हे पुस्तकांत, चित्रासकट होते. मी किंवा माझ्या सारख्या अनेकांनी कधीच ढगांकडे ह्या दृष्टीने पाहिले नसेल. कारण आपल्याला हे माहितच नाही.
जग किती पुढे गेले आहे आणि आपण मेघदूताच्या कविकल्पनेत, काळ्या ढगातून बरसणाऱ्या सरीसारखे त्यांत रमतो आहोत हे चुकीचे आहे की मुलांची निरागसता, बालिशपणा लुप्त होत आहे आणि ती अतिशय प्रॅक्टिकल होत, पांढऱ्या ढगांसारखी कोरडी, भावनाहीन होत आहेत हे बरोबर आहे ? ह्या विचारांत मी गोंधळून गेले.
“जनरेशन गॅप”ची ही दरी मला जास्तच जाणवायला लागली आहे. तुम्हाला काय वाटतं ?
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800