आज तरुणांना उद्योजक होण्याच्या असंख्य संधी उपलब्ध असून या संधींचा त्यांनी पुरेपुर लाभ घ्यावा,असे आवाहन महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले. ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता: नव्या क्षितिजांचे आव्हान’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत विविध कौशल्ये आत्मसात करायला हवीत असे सांगून ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’ त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करायला नेहमीच तत्पर आहे असे त्या म्हणाल्या. अनेक यशस्वी नवउद्योजकांची उदाहरणे देत त्यांनी आर्थिक पाठबळाबरोबरच जोखीम पत्करण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची तयारी असणेही महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, भारतीय महिला चेंबर ऑफ कॉमर्सच्या भारत-युरोपीय संघ व्यवसाय परिषदेच्या अध्यक्षा अॅडा डायंडो तसेच अभ्यास परिषदेच्या संयोजक डॉ. अर्चना प्रभुदेसाई व्यासपीठावर उपस्थित होत्या.
विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी परिषदेच्या आयोजकांना शुभेच्छा देताना सतत काहीतरी शिकत राहाणे हेही एक अत्यावश्यक कौशल्य असल्याचे प्रतिपादन केले.
अॅडा डायंडो यानी आपल्या बीजभाषणात भारत-युरोप व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यात महिला उद्योजक कशा प्रकारे महत्वाची भूमिका बजावू शकतात याचा आढावा घेतला.
अभ्यास परिषदेच्या संयोजक डॉ. अर्चना प्रभुदेसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता संगोपन’ कक्षाचा उद्देश विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवणे तसेच उद्योजकता संस्कृती जोपासणे असल्याचे सांगितले.
डॉ. सुजा रॉय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर परिषदेच्या समन्वयक प्रा. अर्चना नायर यानी आभार मानले.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी कौशल्यांचा विकास, नविन स्टार्ट-अपसाठी आर्थिक सहाय्याचे मार्ग आणि मार्गदर्शकाची (इनक्युबेटर) भूमिका इत्यादिंचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देण्यासाठी ही परिषद महाविद्यालयाच्या ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, मुंबई विद्यापीठाचा एमयु आयडियाज – इन्नोव्हेशन, इनक्यूबेशन आणि लिंकेजेस विभाग, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अटल इनक्यूबेशन केंद्र, गर्जे मराठी तसेच एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॅमिली-मॅनेज्ड बिझनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत जगभरातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800