Monday, February 16, 2026
Homeलेखतरुणाईचे विचारमंथन

तरुणाईचे विचारमंथन

“आजचे युवक युवती जर समकालीन सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतील तर त्यांना क्रियाशील बनवणे सोपे जाईल किंवा ते त्यांची दिशा ठरवू शकतील.”असे विचार आंतर भारती संस्थेचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर डी. एस. कोरे आंतर भारतीय युवा शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक करताना व्यक्त केले.

आंतर भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ कोरे

आंतर भारती पुणे शाखेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २६ जानेवारीचे औचित्य साधून पुणे येथील आझम कॅम्पस कॉलेजमध्ये एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. २८ आणि २९ जानेवारी रोजी शनिवार रविवार असल्याने तरुणांनी या शिबिराला चांगलीच उपस्थिती लावली.

आंतर भारती दिवाळी अंकाचे संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक मा.लक्ष्मीकांत देशमुख, आंतर भारती ट्रस्ट चे राष्ट्रीय सचिव डॉ.डी.एस.कोरे आणि पुणे शाखेच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी आंतरभारती संस्थेची मूळ संकल्पना लक्षात घेऊन या शिबिराचे विषय आणि वक्ते फार कल्पकतेने ठरवले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्ये यावर विचार व्हावा, संवाद व्हावा, मुख्य म्हणजे युवकांना जास्तीत जास्त बोलते करावे अशा प्रकारचे आयोजन केले होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सर.

उद्घाटन समारंभाची सुरुवात पुणे शाखेच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी यांच्या निवेदनाने झाली. आंतरभारती संस्थेची, साने गुरुजींच्या विचारांनी तयार झालेली संकल्पना तसेच संस्थेबद्दलची माहिती सांगितली. आझम कॅम्पस कॉलेजचे संस्थापक, संचालक डॉ. पी. ए. इनामदार हे शिबिराचे उद्घाटक म्हणून आमंत्रित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की “गेल्या ७५ वर्षात भारताची अनेक बाबतीत प्रगती झाली आहे. जात धर्मभेद बऱ्याच प्रमाणात नाहीसा झाला आहे. मुली शिक्षण घेताना व वेगवेगळ्या पदांवर काम करताना दिसत आहेत. यापुढील अनेक क्षेत्रातील प्रगती विद्यार्थी घडवून आणतील.”.

आझम कॅम्पस कॉलेज चे संचालक डॉ पी ए. इनामदार

उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते
श्री सुभाष वारे यांनी भारताची व परदेशाची मानसिकता यावर लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, “या देशाचे सर्व प्रश्न जातीव्यवस्थेशी, तसेच विचार करण्याच्या पद्धतीशी संबंधित आहेत.” आपली विचारधारा पूर्वीपासून कशी होती हे सांगताना त्यांनी वास्को-द-गामा आणि कोलंबस यांचा उल्लेख केला. “या दर्यावर्दी मंडळीनी समुद्र पर्यटन करून नवीन देशांचा शोध लावला, नवीन मार्ग शोधून काढला तेव्हा त्याची नोंद जगाने घेतली, त्यांची नावे अमर झाली. मात्र त्यानंतर दोनशे वर्षांनी आपल्या देशातील लोकमान्य टिळकांनी आपल्या स्वातंत्र्याच्या प्रश्नांसाठी समुद्र पर्यटन केले तर त्याबद्दल त्यांना प्रायश्चित्त घ्यायला सांगितले गेले. इतके कर्मठ लोक महाराष्ट्रात होते. आपली अंधश्रद्धा आपल्या प्रगतीच्या आड येत असते.”

आंतरभारती शिबिरात अनेक विषयांवर खुला संवाद झाला. साने गुरुजींचे चरित्र लिहिणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत डॉ.चैत्रा रेडकर यांनी मुलांना साने गुरुजींच्या साहित्याबद्दल प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ पुस्तकापलीकडे काही माहिती नव्हती. ते पाहून रेडकर म्हणाल्या, “मलाही विद्यार्थी दशेत असेच वाटायचे की साने गुरुजी म्हणजे वात्सल्य. साने गुरुजी म्हणजे गोड गोष्टी ! पण एकदा मला कळले की याच साने गुरुजींनी खोलवर अभ्यास करून प्रेषित मोहम्मद पैगंबराचे चरित्रही लिहिले आहे. याच साने गुरुजींनी स्वातंत्र्याच्या अनेक चळवळीत भाग घेतला आहे. शंभरच्यावर पुस्तके लिहिली आहेत. मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून चळवळीत भाग घेतला आहे. त्यावेळी साने गुरुजींचे वेगळे व्यक्तिमत्व मला दिसले. समोर दिसेल त्या रुढी स्वीकारण्याऐवजी त्यावर प्रश्न विचारण्याची त्यांची पद्धत होती. तुम्हीही असेच जागरूक राहिले पाहिजे. एखाद्या विषयावर खोलवर अभ्यास करून आपले विचार मांडले पाहिजेत.”

शिबिरातील दुसऱ्या टप्प्यात ‘प्रेम आणि मैत्री वर बोलू काही’ हा विषय होता. श्वेता सीमा विनोद आणि कृतार्थ शेवगावकर या नाट्य कलावंतांनी हा विषय नाजूकपणे हाताळला. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील प्रश्न मांडायला सांगितले. एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या हिंसेचा निषेध केला. प्रेमात दुसऱ्याला स्पेस देणे, एकमेकांच्या प्रगतीचा विचार करणे, प्रेम आणि मैत्रीत नकार पचवणे याची उदाहरणे देण्यात आली. प्रत्येकाने प्रेमात पडायलाच हवे असे का की काही लोक स्वतंत्र राहण्याचा विचारही करू शकतात, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा झाली.

शिबिरातील तिसरा टप्पा अभिवाचनाचा होता. स्वाती दाढे, अंजली कुलकर्णी आणि सविता कुरुंदवाड यांनी ‘कवितेतील गांधीजी’ हा कार्यक्रम सादर केला.
‘उचललेस तू मीठ मूठभर’ ही गदिमांची कविता’ ती पहा ती पहा बाबूजींची प्राणज्योती’ ही मनमोहन यांनी लिहिलेली कविता तसेच ‘हिमोग्लोबिन’ ही रामदास फुटाणे यांची कविता तसेच ‘ कुळव घेतलेल्या आपल्या ‘बा’ ला संसदेत स्थान का नाही असा धारदार पण कळवळून विचारलेला प्रश्न, या कवितांना युवकांनी खूप चांगली दाद दिली. विद्यार्थ्यांनी कविता मनापासून समजून घेतली. त्यानंतर कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट यांच्याही कविता शिबिरात सादर करण्यात आल्या.

२८ जानेवारीच्या शेवटच्या सत्रात यशस्वी कलाकारांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या. प्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर, निवेदक प्रसाद भारदे, अभिनेता योगेश फुलपगार, दिग्दर्शक, अभिनेता आणि कोरिओग्राफर कुणाल फडके यांनी कलाक्षेत्रातील गोष्टींवर संवाद साधला. अपयशांनी पुढील आयुष्यात खचून न जाता, संधीचा शोध मुलांनी घेतला पाहिजे असे या कलाकारांनी सांगितले. फिरोदिया व पुरुषोत्तम करंडक या स्पर्धांमधील आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या मनातील प्रश्न विचारून चर्चेत रंगत आणली.

पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात आंतर भारती चे डॉ. राजेंद्र बहाळकार यांनी मुलांच्या जगण्याशी संबंधित अशा काही विषयांवर मुलांच्या गटचर्चा घेतल्या. या सत्रानंतर साक्षी प्रभू आणि अमरकुमार या विद्यार्थ्यानी दिवसभराच्या शिबिराबद्दल मनोगत व्यक्त केले. दोघांनीही ‘ज्यावर एरवी कॉलेजमध्ये किंवा कुठेच आमच्याशी कुणी बोलत नाही, त्या विषयांवर आम्हाला ऐकायला आणि बोलायलाही मिळाले” असा आनंद व्यक्त केला.

शिबिरात वातावरणाची निर्मिती करण्यासाठी काही गीतांची योजना केली होती. साने गुरुजींनी लिहिलेले ‘खरा तो एकची धर्म’ तसेच ‘बलसागर भारत होवो’ ही गीते सर्व तरुणांनी एका सुरात गायली. स्वतः मी (मेघना साने लेखिका, एक पात्री कलाकार) ही गीते मुलांकडून गाऊन घेतली.

आंतरभारतीने विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर विनाशुल्क आयोजित केले होते. यासाठी आवश्यक ते सहकार्य केल्याबद्दल अंजली कुलकर्णी यांनी आझम कॅम्पस कॉलेजचे ट्रस्टी डॉ. पी ए इनामदार यांचे आभार मानले.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या विचारांचे बीज तरुणाईच्या मनात पेरण्याचा उद्देश या शिबिराच्या माध्यमातून सफल झाला असे म्हणायला हरकत नाही.

मेघना साने

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11