मुंबई येथील महाराष्ट्र सेवा संघ संचालित साहित्य सम्राट न. चि. केळकर ग्रंथालय आणि मैत्रेयी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संघाच्या मुलुंड येथील सु. ल. गद्रे सभागृहात नुकतीच ‘तसेच घुमते शुभ्र कबूतर‘ ही ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेवर आधारित काव्यमैफिल आयोजित करण्यात आली.
रसपूर्ण आणि कलात्मक बांधणी असलेल्या या कार्यक्रमाची संहिता दीपाली दातार यांनी लिहिली आहे. ना. सी. फडके यांच्या कन्या गीतांजलि अविनाश जोशी आणि मुकुंद दातार यांच्यासह दीपाली दातार यांनी कवितांचे अभिवाचन उत्कटपणे सादर केले. परीचा पडला दगडावर पाय, पत्ता या बालकविता तसेच माझ्या मना बन दगड, साठीचा गझल, ती जनता अमर आहे सारख्या सामाजिक कविता, हे एकुणाचाळीसाव्वे, आठवणी घराकडच्या, तुला द्यावे असे काही, माझे मला आठवले, फारा दिवसांनी आली सारख्या प्रेमकविता, झपाताल सारखे तालचित्र ऐकताना श्रोते रंगून गेले.
मैफिलीत अनोखा रंग भरला गेला, तो श्रुति विश्वकर्मा मराठे यांच्या समर्थ, भावपूर्ण काव्यगायनाने आणि त्यांना लाभलेल्या अनुप कुलथे यांच्या व्हायोलिनच्या समंजस, नेटक्या साथीमुळे. बुद्धिनिष्ठ आणि विज्ञानवादी तरीही हळव्या हृदयाच्या विंदांच्या चिंतनशील, सामाजिक जाणीवेच्या कवितांना स्वरबद्ध करण्याचे आव्हान श्रुतिने उत्तम पेलले आहे. पवित्र मजला, ओंजळीत स्वर तुझेच, मृगजळत मी भरली घागर, अगा अथांग अथांग धुक्याचा दाटला, जन्मा आधी जन्मे, कसा मी कळेना अशा कवितांना अतिशय अर्थपूर्ण चाली श्रुतिने बांधल्या आहेत. ही गाणी श्रुतिच्या आवाजात ऐकताना रसिकांचे डोळे पाणावले.
दीपाली दातार आणि श्रुतीनं सादर केलेलं बंदीश एक स्वरचित्र थक्क करणारं होतं. ही बंदिश संपूच नये असं वाटत होतं. विंदांच्या कविता समजून घेणं आणि त्यानंतर त्यांचा आविष्कार करणं ही अत्यंत कठीण गोष्ट सर्व कलाकारांच्या उत्कट आणि भावपूर्ण सदरीकरणामुळे श्रोतृवर्गाला खिळवून टाकणारी होती, हे या कार्यक्रमाचं मोठं वैशिष्ट्य आहे.
आजवर या काव्यमैफिलीचे पुणे, मुंबई, सोलापूर, वसई, चेंबुर अशा विविध ठिकाणी वीसहून अधिक प्रयोग झाले आहेत. प्रत्येक प्रयोगात काहीतरी नवीन भर घालताना विंदांच्या बहुआयामी, प्रयोगशील व्यक्तिमत्वाचे आणि अर्थाचे मोठे आकाश पेलणार्या त्यांच्या कवितेचे नवे पैलू शोधत राहणार्या या संघाला अजूनही अनेक ठिकाणी याचे प्रयोग करण्याची इच्छा आहे. विंदांची कविता परिचित असली तरी अधिक सूक्ष्मपणे तिला समजून घेणे हेच या प्रयोगामागचे उद्दीष्ट आहे.
मुलुंडमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र सेवा संघाचे उपाध्यक्ष श्री.सतीश पाटणकर, कार्यवाह श्री.जयप्रकाश बर्वे. न.चिं.केळकर ग्रंथालयाचे कार्यवाह श्री.अरुण भंडारे आणि मैत्रेयीच्या अध्यक्षा वीणा नाटेकर इत्यादी मान्यवर तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतीश पाटणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर वीणा नाटेकर यांनी आभार मानले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800