Sunday, September 8, 2024
Homeलेखतस्मै श्री गुरुवै नमः

तस्मै श्री गुरुवै नमः

उद्या, रविवार, २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे.या निमित्ताने स्वतः कुलगुरू राहिलेले प्रा डॉ विजय पांढरीपांडे यांनी जागविलेल्या त्यांच्या गुरूंच्या काही हृद आठवणी.
गुरू पौर्णिमेनिमित्त सर्व गुरू जनांना विनम्र अभिवादन.
– संपादक

आपल्या आयुष्याच्या जडण घडणीत शिक्षकाचा सिंहाचा वाटा असतो. आज पंचाहत्तरीत मागे वळून पाहताना, आयुष्याचा जमाखर्च मांडताना मला आठवतात ते माझे निवडक शिक्षक. त्यातील बहुतेक आज हयात नाहीत. पण आयुष्यातील त्यांचे स्थान धृवा सारखे अढळ आहे.

शाळेतले शिक्षक तर कुणालाच विसरता येत नाहीत. सुरुवात तिथूनच करतो. कायमचा ठसा उमटवणारे दोन शिक्षक. त्याचा अर्थ ज्यांच्या विषयी लिहिले नाही त्यांचे महत्व कमी होते असे नाही. पण काही ठसे अमिट असतात. नगर पालिकेच्या प्रायमरी शाळेतले एक पाठक सर सोडले तर दुसरे कुणीही आठवत नाही. प्रायमरी शाळेत मी वर्गात शिकवत असे. इतर विद्यार्थ्यांचे पेपर तपासत असे ! म्हणजे माझे पाय पाळण्यात नव्हे तर शाळेतच दिसू लागले. जणू मी पुढे शिक्षक होणार हे तेव्हाच ठरले.

हायस्कूल मधील भाषेचे शिक्षक मला सर्वार्थाने घडवून गेले. त्यातले एक पंचवटीकर सर. ते इंग्रजी शिकवायचे. अतिशय कडक.त्यांची भीती वाटायची. धोतर, पांढरा शर्ट, ठेंगणी मूर्ती. खुर्चीत बसून शिकवायचे. त्यांची पद्धत वेगळी. आले की ठराविक एक दोन मुलापैकी एकाला उभे करायचे. मी त्यापैकी एक. आल्या आल्या मला उठा पंढरीनाथ, वाचा अशी आज्ञा करायचे. मग मी एकेक वाक्य वाचणार. ते त्याचा संदर्भासहित छान अर्थ स्पष्ट करणार. म्हणजे ते म्हणतील ती वाक्ये मी घोकायची त्यांच्या नंतर.. असा प्रकार.. हे करताना, वाचताना, उभे राहून मी वहीत नोट्स देखील काढत असे ! तेव्हाच जलद गतीने लिहायची सवय लागली. तेही त्यांच्या कडे बघत लिहायचे, खाली वहीत न बघता ! याचा परीक्षेत खूप फायदा झाला.

त्यांनी शिकवलेले धडे अजूनही आठवतात. आर एल स्टीवन्सन चा निबंध, पी जी वूडहाऊस चा अंकल, पोजर हांग्स् ए पिक्चर, रवींद्रनाथ यांची पोस्टमास्तर कथा हे सारे आठवते, यातच सारे काही आले. शब्दाचे अचूक उच्चार, वाक्याची, परिछेदाची नीट मांडणी, व्याकरणातले बारकावे त्याच वर्गात नीट समजले. माझ्या लिहिण्या बोलण्यातल्या भाषेच्या प्रभुत्वाचे श्रेय याच सरांना जाते. पण गुण देण्याच्या बाबतीत त्यांच्या इतका कंजूस गुरू मी पाहिला नाही. ते अर्धा, पाऊण असे गुण द्यायचे. पन्नास पैकी वर्गात हायेस्ट गुण पंचवीस सव्वीस एव्हढेच. दुसऱ्या सेक्शन चे इंग्रजी चे शिक्षक पंचेचाळीस पर्यंत हायेस्ट गुण द्यायचे. त्याचा क्रमांकाच्या स्पर्धेवर परिणाम व्हायचा. माझे बोर्डातले इंग्रजी विषयातले प्रावीण्य केवळ एका गुणाने, शाळेतले गुण कमी असल्याने गमावले होते. पण त्याचे वाईट वाटले नाही. कारण पंचवटीकर सरांचे इंग्रजी शिकवणे आजही आठवते.

दुसरे आठवणारे शिक्षक म्हणजे मराठीचे मोहरीर सर.
मी पुढे लिहिता लेखक झालो, बत्तीस पुस्तकं लिहिली त्याचे श्रेय यांनाच. त्यांचे शिकवणे तितके प्रभावी नव्हते. पण शाळेतल्या वक्तृत्व, निबंध, वादविवाद,अशा सर्व स्पर्धांची तयारी तेच करून घ्यायचे. त्यामुळे माझी लिहिण्याबोलण्या ची मराठी भाषा प्रवाही झाली. लालित्य पूर्ण सुंदर झाली. आमच्या शाळेत अरुणोदय नावाचे वार्षिक हस्तलिखित निघायचे. त्याचा नववी ते अकरावी अशी तीन वर्षे मीच संपादक होतो. इतर विद्यार्थ्याचा लेखनातील सहभाग फार कमी असे. त्यामुळे संपूर्ण सजावट अन् अर्धे अधिक लेखन मलाच करावे लागे !

मी आणखीन एक नवा प्रयोग केला त्या काळात. माझे वाचन प्रचंड होते. ज्या लेखक कवीचे आम्हाला धडे होते त्यांची इतर पुस्तकं मी वाचून काढली. त्यांची शैली नीट अभ्यासली. अन् मग प्रश्नाची उत्तरे लिहिताना ज्या धड्याचे प्रश्न सोडवायचे त्याची उत्तरे त्याच लेखकाच्या शैलीत लिहायची. हे प्रयोग करताना मोहरीर सराची खूप मदत झाली. माझे त्यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. त्यांची सर्व मुले मेरिट मध्ये आली. मोठा मुलगा तर पहिला आला. तो पुढे हैद्राबादला आल्याने संबंध वाढले. मोहरीर सरांच्या लिखाणाचे, नोट्स चे पुस्तक त्यांच्या मुलांनी काढले. त्याला मी प्रस्तावना लिहावी हा त्यांचा आग्रह ! शिष्याने गुरूचे ऋण असे फेडले !

शाळेनंतर इंजिनियरिंग कॉलेजचे प्राध्यापक नवे जग दाखवायला आले. त्यात आठवतात ते फिजिक्स अन् गणिताचे शिक्षक..
प्रा पिंगळे, प्रा के जी देशमुख, प्रा मोहरीर..इंजिनियरिंग विषय शिकविण्यात आनंदी आनंद होता. सगळे नवी विटी नवे राज्य असा प्रकार. कॉलेज नव्या परिसरात नव्याने सुरू झालेले. अनेक शिक्षक तरुण होते. त्यातले प्रा पंडित, प्रा देशपांडे (एम यू या नावाने प्रसिध्द), प्रा जी एन गरुड हे अपवाद सोडले तर कसे शिकवू नये याचा उत्तम धडा देणारे शिक्षक मिळाले ! पुढे मी शिक्षक होणार असे आधीच नियतीने ठरवले असल्याने कसे शिकवू नये हे शिकणे जास्त महत्वाचे होते असे आता वाटते. (पुढे मी काही दशका नंतर याच स्वायत्त संस्थेचा डायरेक्टर झालो. त्यात वर उल्लेख झालेल्या एम यू सरांचा अदृश्य हात होता, त्यांनीच माझा बायोडेटा मागवला होता हा योगायोग !)

पदवी घेतल्या नंतर आय आय टी खरगपूर ला लाभलेल्या बंगाली प्राध्यापकांनी माझ्या प्रोफेशनल करीयर च्या दृष्टीने खरा आकार दिला. आमचे पदवीचे शिक्षण आय आय टी च्या तुलनेत अगदीच सुमार होते. त्यामुळे आम्हाला पहिल्याच सत्राला खूप त्रास झाला. पण तेथील शिक्षकांनी आमची अडचण समजून घेतली अन् ज्यादा क्लासेस, प्रयोग शाळा घेऊन खूप मदत केली. प्रा सन्याल विभाग प्रमुख होते. ते माझ्या मार्गदर्शक गुरूचे म्हणजे प्रा बी एन दास यांचे ही गुरू होते. सर्वोत्तम शिक्षक. उत्तम हस्ताक्षर. आवाजात देखणे मोड्यूलेशन. जगात त्यांच्या विषयात पाच उत्तम शिक्षक निवडायचे म्हटले तर त्यांचा नंबर लागेलच. ते स्वतः पी एच डी नव्हते पण त्यांनी अनेकांना पी एच डी साठी मार्गदर्शन केले. ते पुढे आय आय टी चे निर्देशक देखील झाले ! (आता नियमा प्रमाणे हे शक्य नाही !)

प्रा सन्याल यांचे व्यक्तिमत्व अतिशय देखणे, भुरळ पाडणारे होते. ते नेहमी सूट बुट टाय अशा अद्ययावत पोशाखात असायचे. प्रा सन्याल याच पोशाखात स्नान देखील करतात असे विनोदाने म्हटले जायचे ! त्यांचा विषय समजायला अतिशय कठीण. पण ते अगदी सोपा करून शिकवायचे. एका सेमीस्टर ला त्यांनी फक्त एकच प्रकरण शिकवले. अभ्यासक्रमात चार प्रकरण होती. आम्हाला समजेना परीक्षेला कसे सामोरे जायचे ? आम्ही घाबरून त्यांना भेटलो. अडचण सांगितली. त्यांचे मार्मिक उत्तर होते, “मीच सगळे शिकवले तर तुम्ही स्वतः काय शिकणार ?” आम्ही आपल्या परीने कसाबसा अभ्यास केला. त्या विषयात कुणीही नापास झाले नाही !

प्रा सन्याल यांचा वेगळा दरारा होता. त्यांच्या समोर सेमिनार देणे, किंवा लेक्चर देणे दिव्य असायचे. त्यांचे गणिताचे ज्ञान, कन्सेप्ट स्फटिकासारखे स्पष्ट, स्वच्छ होते. त्यामुळे बाहेरून आलेले मोठमोठे प्राध्यापक त्यांच्या पुढे लेक्चर द्यायला घाबरायचे. कार ने येणारी ही एकमेव व्यक्ती होती त्यावेळी. अपवाद डायरेक्टर चा अर्थातच !

पुढे मी याच विभागात लेक्चरर झाल्यानंतर थेट त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळाले. टेक्निकल प्रपोजल, रिपोर्ट कसे लिहायचे, त्याचे प्रभावी सादरीकरण कसे करायचे, पत्रे कशी ड्राफ्ट करायची हे प्रशासनातील बारकावे मी त्यांच्या कडूनच शिकलो. काही काम असेल तर ते तुम्हाला ऑफिस मध्ये बोलवणार नाहीत. स्वतः तुमच्या कडे येतील. तुमचा हात हातात घेतील किंवा खांद्यावर हात ठेवतील. अन् मग काय ते काम समजावून सांगतील ! व्यक्तिमत्त्वातील हे औदार्य अफलातून होते.

ते शेवटचा श्वास घेई पर्यंत नव्वदी पार केल्या नंतर देखील आय आय टी त कार्यरत होते. माझ्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. त्यांची शेवटची भेट झाली तेव्हा ते आय आय टी च्या आय सी यू त होते.पण त्यावेळी नव्वदी पार केलेले प्रा सन्याल नर्स चा सल्ला झुगारून भरभरून बोलले. माझा अख्खा बायोडेटा त्यांना पाठ होता त्या वयात ! त्या परिस्थितीत देखील त्यांनी मला गणिती विषयातले गुंता गुंतीचे प्रश्न विचारले.अन् म्हणाले, “सोपे प्रश्न कुणीही सोडवू शकतो. पण गुंतागुंतीचे कठीण प्रश्न फार कमी जण सोडवू शकतात. तुझा जन्म कठीण प्रश्न सोडविण्यासाठी झालाय. साईबाबा तुम्हारा भला करेगा.” त्यांचा तो आशीर्वादाचा स्पर्श, त्यांचे शेवटचे बोल माझ्यासाठी आयुष्यभर अमोल ठरले. मी त्यांची कार्बन कॉपी आहे हे कबूल करण्यात कमीपणा न वाटता, अभिमान वाटतो !

प्रा सन्याल यांचे शिष्य, ज्युनियर प्रा बी एन दास हे माझे एम टेक अन् नंतर पी एच डी चे मार्गदर्शक होते. अतिशय कडक, रागीट स्वभाव. प्रसंगी तितकेच मऊ, गोड. फणसाची उपमा त्यांना फिट बसणारी. वर्गात शिकवताना बरेच विषयांतर व्हायचे. इतिहास, साहित्य याची प्रचंड आवड. आमच्या बरोबर असले की शिवाजी, पेशवे, मराठा, यांच्याबद्दल बोलायचे ! भरपूर माहिती. ते मुळ बांगला देशातून आलेले. सामान्य परिस्थितीतल्या कुटुंबातले. त्यामुळे डाऊन टू अर्थ असे ! माझा पी एच डी चा विषय किचकट, अतिशय गुंतागुंतीचा (कॉम्प्लेक्स). पण त्यांच्यामुळे तो सोपा झाला.

संशोधनाच्या बाबतीत अतिशय डीमांडिंग. कुठेही चाल ढकल खपवून घेणार नाहीत. माझा एम टेक चा प्रबंध त्यांनी मला पंधरा वेळा लिहायला, सुधारायला लावला. आश्चर्य म्हणजे शेवटी पहिला लिहिलेला ड्राफ्ट मंजूर केला ! मी ते नंतर त्यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा तेही हसून म्हणाले. ”त्याशिवाय तुम्ही उत्तम लिहायला शिकणार कसे ?” आश्चर्य म्हणजे माझा पी एच डी चा प्रबंध त्यांनी एका महिन्यात जसाच्या तसा मंजूर केला ! पण तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर चार पाच पूर्ण रिसर्च पेपर्स प्रसिध्द करायला लावले. ते खरे दिव्य होते. कारण अमेरिकन, युरोपियन जर्नल मध्ये एखाद दोन रिविजन असेच. त्यात वेळ जायचा. त्यावेळी इंटरनेट, ईमेल काहीही नव्हते. त्यामुळे परदेशी पाठवलेल्या प्रबंधाचे तज्ञांचे रिपोर्ट्स यायला देखील वेळ लागायचा. ती एक प्रकारची अग्नी परीक्षा असायची. मला आठवते, माझे पी एच डी चे रिपोर्ट्स आल्यावर प्रा दास यांनी मला बोलवून घेतले अन् म्हणाले, ”आता तू शांत झोपू शकतोस. तुझे सर्व रिपोर्ट्स क्लीन आहेत. ”क्लीन याचा अर्थ एकही उणीव नाही कुठे. एरवी रिपोर्ट मध्ये कुठंही निगेटिव्ह विधान असले की ते काम पूर्ण करावेच लागे. पुन्हा परीक्षा. पुन्हा विलंब. त्या मानाने आता सारे अगदी सोपे झाले आहे. दुधात भरपूर पाणी घातल्यासारखे !

प्रा दास यांच्या हाताखाली प्रबंध, पेपर्स लिहिण्यात मी इतका तज्ञ झालो की त्यांचे नंतरचे विद्यार्थी प्रबंध, पेपर्स लिहायला लागले की ते प्रा दास आधी माझ्याकडे पाठवत तपासायला ! आधी विद्यार्थी, नंतर तिथेच प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्यावर सहकारी असे दुहेरी नाते होते आय आय टी तील शिक्षकांशी. बंगाली माणसे तशीही मुळात हुशार, कलाप्रेमी, स्वभावाने प्रेमळ. मोकळी. प्रा दास यांना दोन मुले होती. मी तिसरा, असे आमचे नाते झाले पुढे. आम्ही कौटुंबिक स्तरावर एकमेकाशी बोलायला लागलो. मोकळे व्हायला लागलो. मी उस्मानिया त आल्यावर देखील त्यांना दोन तीन वेळा व्याख्यानासाठी बोलवले. अगदी शेवटच्या व्याख्यानाच्या वेळी ते भरकटल्या सारखे वाटले. बोलण्यात देखील विस्कळीतपण जाणवले. ती शेवटची भेट ठरली.

प्रा जे दास हे देखील विभागातले ज्येष्ठ प्राध्यापक होते. त्यांचा सगळ्यांना प्रचंड धाक. त्यांच्याशी बोलायला देखील सारे घाबरायचे. पण मी त्यांच्या बरोबर दोन वर्षे पी जी ला शिकवले. त्यावेळी आय आय टी त एक विषय ज्युनिअर टीचर ने सिनियर टीचर बरोबर शिकवायची प्रथा होती. त्यात कमीपणा वाटत नसे. उलट बरेच काही शिकायला मिळे. त्या काळात जे दास यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. अगदी मैत्रीचे. भीती केव्हाच पळाली ! त्यांनी मला सुंदर प्रशस्तीपत्र दिले होते जे पुढे बरेच ठिकाणी उपयोगी पडले.

प्रा सन्याल, प्रा जे दास, प्रा बी एन दास यांचा विद्यार्थी, कलिग म्हणवून घेणे ही देखील फार मोठी अभिमानाची गोष्ट होती त्या काळी!ही माणसे मनाने देखील फार मोठी होती. माझे आय आय टी त प्रमोशन झाले तरी काही तांत्रिक कारणामुळे कुलसचिव ऑर्डर काढत नव्हते. चालढकल करीत होते. त्याच वेळी प्रा सन्याल डेप्युटी डायरेक्टर झाले. त्यांनी जॉईन होताच एका तासात माझ्या नियुक्तीचे पत्र मला दिले ! प्रा दास यांचे तर बंगाली शिष्यांपेक्षा जास्त प्रेम, मराठी, तेलुगु विद्यार्थ्यावर होते ! माझी उस्मानिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली तेव्हा प्रा बी दास हे वृत्त सगळ्या आय आय टी ला सांगत सुटले ! तेही या शब्दात..” ज्या वयात मी असिस्टंट प्रोफेसर देखील झालो नाही त्या वयात माझा विद्यार्थी प्रोफेसर झालाय. माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण !” असे शिक्षक लाभणे याला फार मोठे भाग्य लागते.

पुढे उस्मानिया विद्यापीठात मी प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्यावर जे सिनियर सहकारी लाभले त्यांच्या कडून देखील खूप शिकता आले. प्रा डी सी रेड्डी, प्रा उमापती रेड्डी यांच्याच प्रयत्नांमुळेच मी केवळ चौतीस वर्षे वयात पूर्ण प्राध्यापक झालो तेही उस्मानिया सारख्या जुन्या प्रतिष्ठित विद्यापीठात. दोन्ही रेड्डी प्राध्यापक माझे जन्माचे गाढ मित्र झाले, वयाने ज्येष्ठ असूनही त्यांनी मला सन्मानाने वागवले. दोन वर्षात विभाग प्रमुख व्हायला भाग पाडले ! प्रा डी सी रेड्डी कुलगुरू झाले तेव्हा तर मी त्यांचा उजवा हात म्हणून प्रसिध्द होतो ज्येष्ठ डीन या नात्याने. आमच्यात मतभेद व्हायचे. चक्क भांडणे व्हायची.पण ती तात्विक असायची. मनात काही साठवून ठेवायचे नाही कुणीच !

आमच्या विभागात त्यावेळी अल्लाडी प्रभाकर हे सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक होते. त्यांचाही मला भरपूर स्नेह लाभला. ते देखील प्रा सन्याल सारखे नेहमी थ्री पीस सुटा बुटात असायचे. उत्तम शिक्षक. सर्वाशी प्रेमाने वागणारे, जॉली स्वभावाचे. आमच्या शैक्षणिक चर्चा छान रंगायच्या. त्यातूनही खूप शिकता आले. मी संशोधनासाठी विभागात करोडो रुपयाचे प्रोजेक्ट्स आणले, प्रयोगशाळा अत्याधुनिक केल्या याचे या सर्वांना फार कौतुक होते. कारण मी येई पर्यंत संशोधन काहीच नव्हते. नंतर त्याला गती मिळाली. माझा आय आय टी चा अनुभव कामी आला. त्यामुळे आऊट सायडर (म्हणजे मराठी) असूनही इथल्या प्रशासनाने मला अक्षरशः डोक्यावर घेतले.

त्यावेळी प्रा नवनीत राव हे कुलगुरू होते. माझे त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध. त्यामुळे माझ्या मागणीची फाईल डायरेक्ट त्यांच्याकडे जात असे, क्षणात मंजूर होत असे. ते म्हणायचे, ”वरिष्ठांना असे पत्र लिहा की नकार देताना कठीण व्हावे !”

हे असे खूप शिकता आले ज्येष्ठ प्राध्यापक सहकाऱ्याकडून.. शिक्षका बरोबर माझ्या विद्यार्थ्यांनी देखील मला घडवले. मला शिकताना ज्या अडचणी आल्या त्या माझ्या विद्यार्थ्याना येऊ नयेत याची दक्षता घेत शिकवले. शिकवताना माझेच शिक्षक माझ्यात संचारत होते ! इतके ते सगळे माझ्या आयुष्याचा अभिन्न भाग झाले होते !
आजन्म त्यांच्या ऋणात रहावेसे वाटते.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. डॉ. पांढरीपांडे, खूपच छान लेख! आदराने, प्रेमाने ओथंबलेला!
    तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!

  2. गुरुपौर्णिमेनिमित्त उचित लेख.

  3. सादर नमस्कार….
    किती विस्तृत व भरभरून लिहिले आहे . गुरवे नमः |
    मनोवेधक वाटला लेख.
    मी आठ-दहा दिवसच झालेत हैद्राबादला येऊन.मुलाची बदली इथे झाली आहे म्हणून. कालच भेटले वैशाली दाणींशी ,तेव्हाच आपल्याबरोबर ओळख झाली रस्त्यात व घरी येण्याचे आमंत्रणही मिळाले.आणिआपण घरी निघालात. नंतर एकदम आठवले श्री.देवेद्र भुजबळ
    यांनी आपण हैद्राबादला असल्याचे मला कळविले होते
    आता पुन्हा निवांत भेटूया का?
    बरेच काही शिकण्यासारखे लेखात सापडले नि भेटीत त्यात भरच पडेल.
    विजया केळकर__
    व्यंकटगिरी रेसिडन्सी
    हैद्राबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments