ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा ही एकमेकांना लागून छोटी सात राज्यं आहेत. या सर्व राज्यांची संस्कृती, परंपरा, जीवनशैली, खाद्यपदार्थ आणि सण यात बरेच साम्य आहे. यामुळे या राज्यांना ‘सेवन सिस्टर्रस’ असे संबोधतात.
आमच्या व्हियेतनाम सहलीचे सोबती मित्र मदन कोकीळ यांनी आसाम, मेघालय, अरुणाचल येथे सहलीस जाऊया काय ? अशी मला विचारणा केली. मग वर्गमित्र मित्र डॉ.वसंत पाटील, सुभाष उकरांडे यांच्यासह नऊ ज्येष्ठ नागरिक जोडप्यांनी अल्पावधीत होकार कळवला. सबब बारा दिवसांच्या आसाम, मेघालय, अरुणाचल या तीन बहिणींच्या भेटीसाठी आम्ही निघालो. इथे उष्मेचा कहर सुरू असताना आम्ही पाच एप्रिलला पुण्याहून लोकप्रिय गोपीनाथ बारडोई विमानतळ गुहाटी येथे प्रातःकाळी उतरलो. हॉटेल चेक इन ला अवधी असल्याने विमानतळावर निवांत फ्रेश होऊन आम्ही बाहेर पडलो.

दारातच फलक हातात धरून तरुण हसतमुख गाईड सुबोध भिसे आमची वाट पाहत होता. “मंडळी प्रवास कसा झाला ?” अशी विचारपूस करत त्याने आम्हाला दोन वातानुकूलित आर्बेनियामधून थेट नाश्ता करण्यासाठी नेले. तदनंतर आम्ही गुहाटी येथील हॉटेल सुई मध्ये आंघोळ व भोजन उरकले. थोड्याशा विश्रातीनंतर कामाख्या देवी दर्शनाला निघण्यापूर्वी आमचे आसामी पारंपरिक गमच्या देऊन स्वागत केले. तदनंतर ब्रह्मपुत्रा नदीच्या डॉ.भास्कर वर्मा सेतूवरुण जालुकबरी नीलाचल पर्वताकडे कामाख्या देवी दर्शनासाठी मार्गस्थ झालो. या मंदिरासाठी सुमारे साठ पायऱ्या चढून गेल्यावर तेथे हे ५१ शक्तिपीठांपैकी एक पवित्र मंदिर आहे. दरवर्षी जून महिन्यात येथे अंबुवाची मेला उत्सव भरतो, जो देवीच्या मासिक धर्माचे प्रतीक समजले जाते. येथे भाविक नवस पूर्तीसाठी बोकड बळी देतात. गाभारा दर्शनासाठी भाविकांच्या पहाटे पासून रांगा लागतात. मात्र मुखदर्शन तासाभरात आटोपते. दर्शनानंतर लागलीच आम्ही हॉटेलकडे परतलो. आदल्या दिवसाच्या प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी भोजन आटोपून रात्री लवकर झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमंत शंकरदेवा म्युझियम कडे रवाना झालो. तेथे विविध दालनातून आसाम राज्याची कला, सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळाली. एका दालनात भारतरत्न भूपेन हजारिका यांनी वापरलेल्या वस्तू व त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार लक्ष वेधून घेतले. नंतर उमट्रू नदीपार कडून शिलाँगकडे (जुने नाव सोहरा) प्रयाण केले. वाटेत मानव निर्मित युमीयम लेक पाहिले. लगत असलेले अनेक तलाव एकमेकांना जोडून हे अवाढव्य लेक तयार केलेले आहे.
शिलाँग मध्ये १८९३ मध्ये तत्कालीन चिफ कमिशनर सर विल्यम्स वॉर्ड्स यांनी युरोपियन धर्तीवर तेथील लेकचे सुशोभीकरण केले. लेक सभोवती कलकत्ता येथील बोट्यानिकल गार्डन येथून विविध रोपे आणून वृक्षारोपण केले. त्यामुळेच यास वॉर्डस लेक असे नाव देण्यात आलेले आहे. सभोवतालची आकर्षक फुलांनी बहरलेली बाग मनमोहक दिसत होती. येथेच महिलांनी मेघालय पारंपरिक वेशात फोटो व रील काढून घेतले. शिलाँगचे सृष्टीसौंदर्य व गोल्फ कोर्स मुळे याला भारताचे स्कॉटलंड समजले जाते.
पुढच्या दिवशी आम्ही मोठ्या वृक्षांच्या जिवंत मूळा पासून बनवलेला पुल पहिला. खळाळता पाण्याचा प्रवाह ओलांडण्यासाठी शतकापूर्वी स्थानिकांनी हा झाडांच्या मुळापासून बनवलेला हा पूल आजही सुरक्षित व मजबूत आहे. नजीक एक डोंगर उतारावरुन घसरून आलेला अवाढव्य दगड केवळ छोट्या दगडावर विसावला आहे. निसर्गाची किमया म्हणून हा बॅलन्सिंग रॉक बघण्यासाठी पर्यटक जातात.
तेथून आम्ही केवळ मेघालय राज्यात नव्हे तर भारतात सर्वात स्वच्छ मावलीनाँग हे गाव पाहिले. प्रत्येक घरासमोरच्या आटोपशीर बागेत सेंद्रिय शेती पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेतले जाते. येथे आम्ही अत्यल्प तेलाचा मसाला विरहित सात्विक भोजनाचा आस्वाद घेतला. सायंकाळी डावकी येथील पाण्याचा नितळ तळ दिसणाऱ्यां उमनगोट नदीत नावेतून फेरी मारली. या नदी पात्रालगत बांगला देशाची सीमा आहे. तेथे अगदी जवळून बांगलादेशीय लोकांची वर्दळ दिसते. याच नदी पात्रात बांगला देशीय फेरी मारण्यास आलेले होते. रात्री जेवणानंतर सहप्रवासी डॉ.सोनवणे उभयतांनी, दिलीप कोळपे व विभा साळवी यांनी करावके गाणी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यारात्री पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी चेरापुंजी येथे कसे वातावरण असेल याची धाकधुक लागली होती.
सकाळी आम्ही रेनकोट छत्रीसह जय्यत तयारीने चेरापुंजीकडे मार्गस्थ झालो. गंमत म्हणजे दिवसभर तेथे एक थेंबही पाऊस पडला नाही. प्रथम थेट आम्ही लाईम स्टोन केव्हज मध्ये शिरलो. सुमारे दोनशे मीटर लांब या ओबड धोबड नैसर्गिक गुहेतून चालत जाऊन दुसऱ्या टोकाला बाहेर निघालो. ओबड धोबड व अरुंद गुहेत छतातून ठिपकणारे थंडगार पाणी व गुळगुळीत दगड गोट्यातून वाटचाल करताना मजा आली. तेथून बाहेर पडल्यावर सूर्य दर्शनामुळे वातावरण अगदी स्वच्छ झाले होते. काही अंतरावर डाव्या बाजूला पठारावरून खोल दरीत कोसळनाऱ्या सात धबधब्याना ‘सेवन सिस्टर फॉल’ असे म्हणतात. तुषार उडवत शुभ्र फेसाळलेले पाणी पाहून मन मोहरुन जाते.
पुढे काही अंतरावर मोठ्या पाण्याच्या प्रवाहाचा नौकालिका फॉल देखील नेत्रदीपक आहे. येथे विविध मसाले व पारंपरिक कपडे, सोवेनियर वस्तू खरेदीस महिलांची झुंबड उडाली होती. दुपारी ऑरेंज रूट हॉटेलमध्ये सात्विक जेवण घेतले. नंतर ‘मावसमी केव्हज’ म्हणजे अकरा गुहांचे हे म्युझियम बघितले. येथेच सर्वात उंच व लांब बांबूचा पूल उभारलेला आहे. विविध धबधब्यातून कोसळणारे थंडगार पाणी विलोभनीय आहे. आयुर्वेदिक निर्मळ पाण्याच्या प्रवाहात साऱ्यांनी पोटभर पाणी प्याले. सायंकाळी ढगाळ वातावरणात गाणी म्हणत आम्ही हॉटेलवर मुक्कामी पोहोचलो.
क्रमशः
— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन’ : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800