Home पर्यटन इंग्लंडची सफर : समारोप

इंग्लंडची सफर : समारोप

0
Westminster

इंग्लंडची किल्ली’

कालचा एक दिवस विश्रांती घेऊन आज सकाळीच डोव्हरला आलो. टॅक्सीनं डायरेक्ट किल्ल्याजवळ. Dover Castle उंचावर, निसर्गाच्या कॅनव्हासवर पिवळसर, पांढऱ्याशुभ्र ताशीव दगडांत भक्कम उभा आहे. पर्यटन केंद्रातून प्रवेशशुल्क भरून मनगटावर कागदी बॅंड बांधला. भव्य प्रवेशद्वारातून आत गेलो. उजवीकडे गर्द निळा समुद्र होता. त्यावरून वारा घोंगावत होता. हा समुद्र पार केला की पल्याड इंग्लंडची हद्द संपते आणि फ्रान्स सुरू होतो.

कशी गंमत आहे ना ? माणसाने आखलेल्या देशांच्या भौगोलिक सीमा समुद्राच्या वाऱ्यानं एकत्र जोडल्या होत्या.

जवळच्या दुकानातून थंडगार आईस्क्रीमचा कोन घेतला. डोळे, तोंड, जीभ – सगळ्या अवयवांनी त्याचा आस्वाद घेत चालत राहिलो.

डोव्हरच्या किल्ल्याला ‘इंग्लंडची किल्ली’ म्हणतात. ज्याच्या ताब्यात हा किल्ला, इंग्लंड त्याच्या ताब्यात, अशी पूर्वीची अटकळ होती. समुद्रमार्गाने इंग्लंडला येणाऱ्यांना पहिलं डोव्हर लागतं. म्हणून ‘Gateway of England’. परदेशांशी इथून व्यापार होत असे, म्हणून व्यापाराचं दारही होते.

या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या असतील. मात्र ज्या जागेवर कित्येक सैनिक आणि नागरी लोकांचं रक्त सांडलं असेल, तिथंच आज रंगीबेरंगी फुलं आणि हिरवेगार गवत डुलत होतं.

असं म्हणतात, राजा हेन्री (दुसरा )याने बाराव्या शतकात, ११८० च्या आसपास हा दगडी किल्ला बांधला. पुढे फ्रान्समध्ये परागंदा झालेला चार्ल्स (दुसरा) इथे आल्यावर त्याने डागडुजी करून जनतेत सांस्कृतिक जीवनाला प्रोत्साहन दिलं. त्याच्या काळात हा किल्ला केवळ शिक्षेचा तुरुंग न राहता राजवाडा बनला. समाजात स्थैर्य निर्माण झालं.

किल्ला निर्माण होण्यापूर्वी दोनशे वर्षे आधी इथं St. Mary in Castro चर्च बांधलं गेलं होतं. ते या किल्ल्यातील शांततेचं आणि प्रार्थनेचं बेट आहे. सॅक्सन शैलीच्या पायावर उभं राहिलेलं, नंतर Norman काळात दुरुस्ती झालेलं लाल-राखाडी दगडांचं हे चर्च मनाला शांतता देतं.

किल्ला पाहून आम्ही ‘White Cliffs of Dover’ ला गेलो. दुपार टळून गेल्याने आणि भरपूर पायपीट झाल्याने पोटात कावळे ओरडत होते. जवळच्या हॉटेलात मेनूकार्ड पाहिलं. नावं ओळखीची नव्हती. मुलीनंच ऑर्डर दिली. माझ्या वाटेला आलेला पदार्थ बटाट्याच्या तिखट करंजीसारखा लागत होता.

पायीपायी चालत तो Dover चा कडा पाहिला. कड्यावरून खाली समुद्राचं निळं पाणी दूरवर क्षितीजापर्यंत पसरलं होतं. खाली बंदर होतं. बोटी आणि वाहनांची धावपळ सुरू होती. समुद्रपक्षी आकाशात गिरक्या घेत होते.

कड्याचे खडक पांढरेशुभ्र होते. ते चॉक खडक म्हणजे कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या समुद्री जीवांचे अवशेष. पांढरेशुभ्र खडक, अरुंद पायवाटेवर हिरवेगार गवत, वाऱ्यानं झोके घेणारी रंगीबेरंगी फुलं, खाली विशाल समुद्र, बंदरात माणसांची धावपळ. भव्यता आणि सौंदर्य हात हात घालून स्मित करत होते.

अनेक रंगांची उधळण करणारा निसर्ग अप्रतिम. त्याची शिस्तीत रचना करून आपल्या आणि सृष्टीच्या भल्यासाठी त्याचा उपयोग करणारा माणूस त्याच्यापेक्षा मोठा.

बाबा आमटे यांची कविता आठवते….

‘माणूस माझे नाव,
माणूस माझे नाव.
दहा दिशांच्या रिंगणात
यापुढे माझी धाव…
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव…
माणूस माझे नाव…
समाप्त.

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा डॉ सतीश शिरसाट. लंडन.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version