Saturday, April 5, 2025
Homeलेखती दोघं

ती दोघं

न्यूज स्टोरी टुडे परिवारात आज स्वागत करू या सौ. मीनल गिरीश भदे, कल्याण यांचे. त्या निम-शासकीय कार्यालयात गेली २८ वर्षे कार्यरत आहे. नोकरी, रोटरी, इनरव्हील अशा सामाजिक संस्थांसोबत काम करताना किंवा दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात अनेक छोट्या- मोठ्या गोष्टींचे, प्रसंगांचे निरीक्षण करीत असताना मनात आलेले विचार व्यक्त करणे अथवा, कागदावर उतरवणे तसेच प्रवास, संगीत ऐकणे आणि वाचन हे त्यांचे छंद आहेत.सौ मिनल भदे यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. — संपादक

“नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो….”

आम्हा दोघांना अतिशय भावलेलं गाणं. पतिपत्नींच्या आयुष्यावर, त्यांच्या भांडणांवर, रुसव्याफुगव्यांवर, दोघांच्याही सासर माहेरच्या नातेवाईकांवर आजपर्यंत आपण अनेक जोक्स, लेख, मनोगतं वाचली आहेत.

लग्न झालं कि पहिलं वर्ष एकमेकांना आणि सासरकडच्या मंडळींना समजून घेण्यात जातं. घर, नातेवाईक, करियर, ऒफिसची प्रेशर्स यामधून एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढला जातो. दोनाचे चार झालेले हात, चाराचे सहा किंवा आठ होतात. म्हणजे एक किंवा दोन बच्चांची वाढ कुटुंबात होते. आणि ती दोघं राजाराणी संसाराच्या रामरगाड्यात पुरती अडकून जातात. मुलांच्या ऎडमिशन्स, बेबी सिटींग, नातलगांची लग्नं कार्य, ऒफिस मधून धावत पळत येउन घ्यायचा अभ्यास, पॆरेंट्स मिटिंग्ज, परिक्षा, ऒफिसच्या टुर्स, टार्गेट्स, ईन्कम टॆक्स रिटर्न्स, सणांची खरेदी, वाढदिवस, फोन बील्स, बाप रे बाप. या सगळ्यांमध्ये एकमेकांना दिला जाणारा वेळ हळूहळू कमी होत जातो.

अधुन मधून ट्रीप, पिकनीक अशी रुटीनला चटपटीत करण्यासाठी अरेंज केली जातात. एकमेकांशी बोलण्यातले विषय बदलतात. आपोआप, नकळत. त्यातही काही जोडपी आपल्या नात्यातला चार्म टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
तुला माझी कदरच नाही, मी म्हणून इतकं सहन केलं, दुसरी कुणी असती तर समजलं असतं, अशी तिच्या तोंडची वाक्यं. तर दुसरीकडे तुम्हाला काय जातंय बडबड करायला, आरामात घरी बसता. आम्ही बाहेर राबराब राबतो तेव्हा तुम्हाला हा आराम मिळतो अशी त्याच्या तोंडची वाक्यं. आपल्याही नकळत आपण एकमेकांना अगदी प्रत्येक गोष्टीत ग्रुहित धरायला लागतो. एकमेकांच्या सोबतीची सवय होउन जाते आणि अचानक एक दिवस त्यांच्यातील एकाला काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं.

यात जर त्याला बाहेरगावी जावं लागलं तर तिचा वेळ घरातल्या असंख्य कामांमध्ये रमू शकतो. पण तिला बाहेरगावी जायची वेळ आली तर त्याला संपूर्ण घर जसं काही खायला उठतं. दिवसभर थकून भागून आल्यावर घरी आपली वाट पाहणारं कुणी नाहीए आज ही जाणिवच बोचरी वाटते. घरामध्ये आजूबाजूला सवयीने तिचा वावर जाणवतोय, तिचा सुगंध दरवळतोय पण प्रत्यक्ष ती मात्र नाहीए. तिच्या माहेरी जाण्यावरुन मित्रांमध्ये केलेले जोक्स त्यावेळी टाळ्या घेउन जातात. पण प्रत्यक्ष ती वेळ येताच त्या हशांमधला फोलपणा जाणवतो. एखादी शनिवारची संध्याकाळ वा रात्र मित्रांबरोबर बॆचलर्स पार्टी म्हणून ऎंजॊय करण्यात जाते. पण रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र उद्याकडे नजर लावली जाते. दिवस पार पडला तरी संध्याकाळ, रात्र खायला उठते. आणि मग रात्री अपरात्री फोन फिरवून उद्याच्या उद्या घरी निघुन ये अशी आर्जव वजा विनंती केली जाते.

तिकडे तिचीही अवस्था काही वेगळी नसते. दिवसभराच्या असंख्य यांत्रिक कामांमधुन अचानक मिळालेली सुट्टी ती एखाद दुसराच दिवस ऎंजॊय करु शकते. पण नंतर मात्र आपल्या घराची, आपल्या माणसाची ओढ वाटू लागते आणि कधी एकदा घरी आपल्या हक्काच्या घरी परतून पुन्हा सगळी सूत्र आपल्या हाती घेते असं तिला होतं. आणि ती परतते. पुन्हा आपल्या घरट्यात.

ती अशी कुठेतरी गेलेली असताना त्याच्या झालेल्या अवस्थेचं फार सुंदर वर्णन या गाण्यात केलंय. जगातल्या समस्त ’ती’ वर्गाने मनापासून ऎकावं असं. आपण जर काही कारणाने गावी गेलो किंवा ऒफिसमधुन यायला उशीर झाला की, तू कुठे आहेस? कधी परतणार? असे फोन्स येण्यामागची त्यांची मानसिकता समजते. घरी परतण्याची फक्त आपल्यालाच ओढ नसून तो ही तितकीच आतूरतेने वाट पाहतोय ही भावना सुखावणारी, जणू काही जग जिंकल्याचा आनंद देणारी असते. ह्यासाठी वर्षातून एकदा तरी आपण रुटीन मधुन वेळ कढून दोन-चार दिवसांसाठी बाहेरगावी जावं आणि त्याला घरीच ठेवावं. पुन्हा त्याच उत्कटतेने भेटावं आणि नव्या उमेदीने, एकमेकांच्या संगतीने पुन्हा आयुष्याला, नव्या नव्या आव्हानांना सामोरं जावं. काय, कशी वाटते कल्पना ?

— लेखन : मिनल भदे. कल्याण
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
–निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments