मार्च महिन्याच्या पहिला आठवडा हा आंतरराष्ट्रीय महिला सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. पण अजूनही महिला सुरक्षित आहेत का ? त्यांचे सक्षमीकरण झाले आहे का ? हा प्रश्र्न पुढील अनुभव आणि त्या अनुषंगाने मांडलेले विचार वाचून नक्कीच पडतो. आपल्याला काय वाटते ? नक्की कळवा.
– संपादक
नमस्कार, मैत्रिणींनो,
मी लतिका गायकर. माझ्या आयुष्यात घडलेली एक भयंकर घटना लिहीत आहे. मी MTNL मुंबई फ्लोरा फाउंटन-1 च्या ऑफिस मध्ये नोकरी करत होते. त्या वेळेस मी लालबागच्या येथे चाळीत रहात होते. तिथे दुपारी पाणी येत असे आणि ते आम्हाला कॉमन नळ असल्याने बाहेरुन भरावे लागत असे. माझा मुलगा खुप लहान होता, फक्त 9 महिन्याचा होता. त्याला सांभाळण्यासाठी कोणी नव्हते. ह्या दोन कारणांसाठी मी रात्री 10 ची शिफ्ट म्हणजे नाईट शिफ्ट करत असे.
ही गोष्ट 1984 साल ची आहे. ही घटना घडली तो दिवस सोमवार पहाटेचा होता. नेहमप्रमाणेच रविवारी रात्री मी ऑफिसला गेले व सकाळी 05.45 ला माझी ड्यूटी संपवून घरी निघाले. माझ्या बरोबर माझी मैत्रीण मीना काळझुमकर होती. आम्ही दोघी फ्लोरा फाऊंटन च्या मेन रोडवर 1 नंबर बस चा स्टॉप आहे तिथे उभ्या होतो. त्यावेळी एक टॅक्सी आमच्या समोर उभी राहिली. त्या टॅक्सीत एक बाई बसली होती, ती पुढे टॅक्सी ड्रायव्हर च्या बाजुला बसली होती. ती बाई पान खात बसली होती. भडक मेकअप, तोंडात पानाचा तोबरा, काळी साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज घातलेली. टॅक्सी फारच जुनी होती. नंबर प्लेट देखील नव्हती. तो टॅक्सी ड्राइव्हर आम्हाला टॅक्सीत बसायला सांगत होता, आपको व्हीटी तक छोडता हू. परत परत टॅक्सीत बसायची विनवणी करतं होता. आम्ही लक्ष देत नाहीं हे बघून ती पान खाणारी बाई सुद्धा आमच्या कडे रागाने बघायला लागली. मी विचार केला या वेळी टॅक्सीत बाई कशी पुढे बसली ? 40 वर्षा पूर्वी एकटी बाई टॅक्सी ने एव्हढ्या सकाळी फिरते आहे हे काही माझ्या सामान्य बुध्दीला पटत नव्हते म्हणून मी मीनाला सांगितले, काहीतरी गडबड आहे. कारण मी प्रमोद नवलकर यांच्या भ्रमंती या मासिकात एक गोष्ट वाचली होती की, एका परिचरिकेला पळून नेले होते. हे मी तिला सांगत असताना आम्ही दोघी तिकडून निघू लागलो असताना, त्या ड्राइव्हर ची आणि त्या बाईची काहीतरी खाणाखुणी झाली आणि रागाने तो ड्राइवर टॅक्सीबाहेर उतरून शिव्या देत आमच्याकडे धावत आला. घाबरून आम्ही दोघी तशाच ऑफिस कडे धावत सुटलो व ऑफिसच्या पायरीवर बसलो. सगळ शरीर थरथरत होत. तो टॅक्सी ड्रायव्हर देखील धावत आमच्या मागे आला. आम्ही पायरीवर घाबरून बसलेले पाहून ऑफीस चा वॉचमन आला व त्याने आम्हाला काय झाले म्हणून विचारले. आम्ही खुप घाबरलो होतो. घाबरत, चाचरत वॉचमनला आम्ही झालेला प्रसंग सांगत असताना तो टॅक्सी ड्रायव्हर आम्हाला वॉचमन बरोबर आम्ही बोलतोय ते बघून थोडा वेळ तिथेच घुटमळत होता व नंतर तो माणूस पळून गेला.
आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला काही सुचत नव्हते सकाळीं 07.00 च्या ड्युटी चा स्टाफ येत होता, ऑफिस मध्ये चर्चा चालू झाली होती काही तरी झालंय याची पण आम्हीं बोलायच्या मनःस्थितीत नव्हतो. 07.30 वाजे पर्यंत आम्ही ऑफिस मध्येच थांबलो. 8.00 वाजता घरी गेलो. घरी माझे मिस्टर माझ्या 9 महिन्याच्या मुलाला कडेवर घेऊन माझी वाट पाहात होते. त्यांना बघताच मी खुप रडले. त्यांना झालेला सगळा प्रसंग सांगितला, त्यांनी मला खूप धीर दिला अशा प्रसंगाला कसे सामोरे जायचे हे समजावून सांगितले, मुळात त्यांनी मला या प्रसंगात समजून घेतले हेच खुप महत्वाचे होतें. त्यांनी आपण पोलिस स्टेशन ला जाऊन तक्रार नोंदवू असे देखील सुचविले. नशिबाने मी वाचले होते. आम्ही घरी पोहचलो नसतो आणि जर आम्ही त्या टोळीच्या हाती लागलो असतो तर आमचे काय हाल झाले असते ? आमचे आयुष्य संपले असते. नको नको ते विचार मनात येत होते, जर त्या टॅक्सी ड्राइव्हर ने आम्हाला त्या भ्रमंती मासिकातील त्या नर्स प्रमाणे एखादया अश्या निर्जन ठिकाणी नेले असते की, तेथून आमची कधीच सुटका झाली नसती. ना आम्ही जगू शकलो असतो. ना आत्महत्या करता आली असती.
एवढी वर्ष झाली तरी त्या आठवणी ने सुद्धा घाम फुटतो. आता देखिल आपल्या मुली, सुना नोकरी निमित्त घराबाहेर पडतात, वेळी अवेळी घरी येतात. कामा निमित्त त्यांना थांबावे लागते. जरा वेळ निघून गेली तरी मनात अनेक शंका येतात. प्रश्न पडतो. आजच्या काळात खरंच महिला सुरक्षित आहे का ? तर मी म्हणेन नाही. मुली, महिला नोकरी करत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बस स्थानक, रेल्वे स्थानक, रस्त्याने चालताना अनेक वाईट अनुभव येतात. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा खूप कठीण.
ती बाई वेश्या होती व तो टॅक्सी ड्राइव्हर (पठाण), बापरे ! दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर खूप चर्चा चालू होत्या. त्यांना पकडले, तिकडे नेले पण तसे काही झाले नाही. मी आमच्या ऑफिसरना भेटून सर्व सविस्तार माहिती दिली. झालेला सगळा प्रसंग त्यांना कथन केला. आणि नंतर 8 दिवस ऑफिस मध्ये सांगून रजा घेतली. सारखं तोच प्रसंग डोळ्यासमोर येतं होता. आम्हा दोघींना आमचे चीफ जनरल मॅनेजर (CGM) श्री अशोक सोहनी सरांनी बोलविले व आम्हाला धीर दिला, म्हणाले, ‘घाबरू नका, आपण या गोष्टीवर विचार करू. मी त्यांना म्हणाले, मी पोलीस स्टेशन ला जाणार आहे कंप्लेंट करायला. ते म्हणाले, ‘तसे करू नका, ऑफिस चे नाव खराब होईल’. तेव्हा मी सांगितले, आज ही वेळ आमच्या आली, तर उद्या दुसऱ्या कोणावर येऊ नये म्हणुन मी कम्प्लेंट करायचं म्हणते, ते म्हणाले ‘आपण या वर नक्कीच मार्ग काढू’. नंतर त्यांनी व्हीटी ते फाऊंटन-1 व फाऊंटन-2 या आमच्या ऑफिसपर्यंत रात्री 10 वाजता व सकाळी 05.45 वाजता ऑफिस ते व्हीटी खाजगी बसची सोय करून दिली. त्यामुळे आम्ही सर्व भयमुक्त झालो.
आता तर स्त्री अत्याचारांच्या घटनात खुप वाढ होत आहे. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून वेळ प्रसंगी त्या वाईट प्रसंगांना खंबीरपणे तोंड देऊ शकतील असे काही उपाय योजना सुरू केली पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे. सरकार अनेक उपाय योजना करीत आहे तरीही गुन्हे घडतातच. असे वाटते हे कधी थांबणार ? मी जेव्हा जेव्हा महिला अत्याचारांवरील बातम्या वाचते, ऐकते तेंव्हा तेव्हा मला माझ्या वरील तो प्रसंग आठवतो व अंगावर काटा उभा राहतो.
एक न विसरता आलेली आठवण मी शेअर केली आहे, ती आजच्या काळातही लक्षात ठेवण्याची गरज आहे.
तुमची मैत्रीण,
— लेखिका : लतिका गायकर
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
विजया लक्ष्मी बिदरी मदमवरील लेख खूपच स्फूर्तिदायी आहे. त्यांच्या कार्याची पद्धत कौतुकास्पद आहे. लेखकाचे आभार