ती पुन्हा पुन्हा विधवा होई
जीवनसाथी एक दिवस सोडून जाई
आजवर त्याच्या नावाने लावलेले कुंकू,
ल्यायलेले मंगळसूत्र, आणि मुख्य मिरवले
ती “सौ” ची बिरुदावली लुप्त होई,
“सौ” ची जागा “श्रीमती” ने कधी घेतली कळलेच नाही
कळले तोपर्यंत ती “विधवा ” होई ॥
समाजाच्या, नातेवाईकांच्या विविध प्रतिक्रिया पाहून मन विचारात गढून जाई I
कोणी म्हणे, “त्यात काय ?
काकांचे वय झालेच होते !”
तुम्ही कोण ठरवणार ?
कोणी म्हणे, “त्यात काय ?
आहेत नां मुले -सुना, मुली -जावई !
ते काय आईला बघणार नाही ?”
प्रतिक्रिया ऐकून ती व्यथित होई
वाटे आता ‘आपले’ कोणी नाही,
आणि ती विधवा होई ॥
जीवनाची एकाकी लढाई सुरू होई I
बँकेत जावे, हाती चेक घेऊन,
पैसे काढू म्हणून I
काऊंटरची सांगते बाई
“ताई हा चेक चालणार नाही,
सही वर “सौ” लिहू नका ?? ?
दुसरा चेक व मिस्टरांचा मृत्यु दाखला घेऊन येई I
संयुक्त खात्यातले पैसे एकटीला मिळणार नाही,
मृत्यु दाखला घेऊन येई
“सतत मृत्यु दाखला शब्द ऐकून ती व्यथित होई
पुन्हा ती एकदा ‘विधवा’ होई. ॥
हळदी – कुंकवाच्या यादीतून
तिचे नाव वगळले जाई
अलंकार घालण्याची मनाई I
कोणी पाहिलेच तिला तर,
“अग बाई ! तुम्ही इथेच होतात कां ? माहीतच नव्हते.”
ऐकू येई.
खरे कारण ओळखून ती व्यथित होई I
पुन्हा एकदा ‘विधवा’ होई ॥
दारावरचा फुलपुडीवाला पुडी टाके
पण पुडीत पूर्वीप्रमाणे
गजरा, वेणी न सांगता बंद होई
तुलसी पत्राचे प्रमाण वाढत जाई
फुलवेडी ती ! कारण ओळखून व्यथित होई
पुन्हा एकदा ‘ विधवा ‘ होई. ॥
दारावरची नियमित येणारी कोळीण बंद होई.
“कां गं हल्ली येत नाहीस ?”
चौकशी करावी, तर म्हणे,
“मला वाटले आता तुम्ही चिकन, मटण, मच्छी खाणार नाही”.
“कां बरे ! ? ?
मी काय काय खाणार नाही,
ठरवेल दुसरे कोणी !!!
विचारांनी ती व्यथित होई
पुन्हा एकदा विधवा होई. ॥
मुलाकडे जावे, सुनेची भुणभुण कानी येई
“तुमचा आईवर जीवच नाही,
‘त्यांच्या’ घरापासून दूर, इथे त्यांना किती कंटाळा येत असेल !
इथे त्यांच्या मैत्रिणी नाही.”
कायम आपल्या कडेच राहिल्या तर ? ?
तत्पर सून तिकीट काढून हाती देई, सासूची ब्याद टळो म्हणून
सूनबाईची प्रेमळ तळमळ लक्षात येई
ती दुःखी होई,
पुन्हा एकदा विधवा होई. II
मनात विचार येई, मुलीकडे रहावे
जावई पुत्रवत मानावे सारे किती चांगले !
तरी जननिंदेच्या भयाने भयभीत होई !
“नको बाई अवलक्षण”
पुन्हा एकदा ‘विधवा’ होई. ॥
टेकत, टेकत दुकानात जावे
दुकानदाराला दया येई I
त्रयस्थ तो फुकट सल्ला देई I
“आजी, अशा एकट्या येऊ नका, आजोबांचा हात धरून येई” !
“अरे ! मला का कळत नाही ?
आजोबा असते तर आणले असते
त्यांनी पण असे एकटे येऊ दिले नसते.
पण आता हात धरायला कोणी नाही.”
सांगतांना ती व्यथित होई ,
पुन्हा एकदा ‘विधवा’ होई ॥
आपले दुःख आपलेच असते
जगाला कळणार नाही.
ज्याचे जळते त्यालाच कळते.
जग मूग गिळून गप्प बसू देत नाही.
येनकेन प्रकारेण वारंवार टोचत राहते.
विसरू म्हणता विसरू देत नाही
पुन्हा पुन्हा आठवण करुन देत राही
ती व्यथित होत राही
पुन्हा पुन्हा ‘विधवा’ होई.”

– रचना : सुलभा गुप्ते
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800