तुळस ही प्रत्येक गृहिणीला आपली सखी वाटते. तिच्यापाशी बसून काही प्रार्थना करावी, काही मागावे, गाणी गावी असे प्रत्येक गृहीणीला वाटत असते. प्रत्येक गृहीणी आपल्या गाण्यात म्हणते,
“तुळसी ग बाई ।
जन्म अमृतमंथनी
बैस अंगणात ।
जागा देते वृंदावनी“
अशी हिंदु धर्मात अत्यंत पावित्र्याचं स्थान असणारी तुळस आपलं मनोगत सांगताना म्हणते,
“मला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्री विष्णुंना मी अती प्रिय आहे. माझं रोप हे वृंदावनात लावतात. त्याला वृंदावन म्हणतात ; त्याचे कारण असे की श्री विष्णुंचा एक अवतार म्हणजे श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे बालपणीचे दिवस जेथे घालविले ते शहर म्हणजे वृंदावन. हे उत्तर प्रदेशात मथुरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहरात भगवान श्रीकृष्णांनी बालपण घालविले म्हणून, माझं रोप ज्या ठिकाणी लावलं जातं त्याला वृंदावन म्हणतात.
माझ्याशिवाय श्रीविष्णूंची पूजा व्यर्थ असते .श्रीकृष्णांच्या चरणकमलावर मला वाहतात. माझी अनेक नावे आहेत ; वृन्दा , वृन्दावती, विश्वपूजिता, विश्वपाबनी, पुष्पसारा, नन्दिनी, कृष्णजीवनी अशी अनेक नावे आहेत. कृष्णजीवनी या नावानं मी कृतार्थ होते ; त्याचे कारण, पतिव्रतेचा जन्म पतीचे जीवन उज्वल करण्यात सार्थकी लागतो म्हणून मी कृष्णजीवनी आहे. मला ज्या वृंदावनात लावतात त्यावर “राधा-कृष्ण” लिहिले जाते ते यामुळेच. मला श्रीविष्णू पूजेत वाहतात ; म्हणून माझी महती सांगताना म्हटलं जातं……
मणिकांचन पुष्पाणि
तथा मुक्तभयानिच ।
तुलसीदल पत्रस्थ
कला नाहन्ती षोडशीम् ।।
परमेश्वराला किंवा देवाला दाखविला जाणारा नैवेद्य हा, त्यावर मला ठेवल्याशिवाय शुद्ध होत नाही. त्याशिवाय नैवेद्य भक्षण केला जात नाही. श्रीविष्णुंना ते आवडत नाही. माझे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण, सेवन हे सर्व पवित्र व पापक्षय करणारे आहे. कोणतीही गृहीणी सांजसकाळ निरांजन ओवाळते, पाणी घालते, नैवेद्य दाखविते, माझं दल भक्षण करते, तेंव्हा ती म्हणते,
“तुळशी श्रीसखी शुभे
पापहरिणी पुण्य दे ।
नमस्ते नारदनुते
नारायण मनःप्रिये।
वारकरी स्त्रिया माझ्यांसहीत असलेलं वृंदावन डोक्यावर घेऊन पालखी बरोबर पंढरीची वारी करतात.
विष्णु , कृष्ण , विठ्ठल यांचे पूजनवेळी माझी माळ गळ्यात घालतात. पंढरीची वारी करताना गळ्यात माझी माळ असली की तो भक्त त्या पंथाचा अनुयायी होतो .माझी माळ सदैव गळ्यात असणे हे पवित्र मानले जाते.
काही जाणांच्या पूजेत शाळीग्राम असतो. ज्यांच्याकडे शाळीग्राम असतो अशा घरातील स्त्रीयांनी शाळीग्रामाची पूजा करावयाची नसते . त्याचे कारण असे की , शाळीग्रामाला एक छिद्र असते ; त्यात भुंग्यासारखा प्राणी असतो व तो जेंव्हा पाषाण कोरतो तेंव्हा त्यातून माझी सुवर्णदले निघत असतात. हा प्राणी ही दले खात असतो .म्हणून पूजेवेळी मला वाहतात . या छिद्रात असणाऱ्या किड्याला रजस्वला स्त्रीचा स्पर्श झाला तर तो मरतो . मी अत्यन्त पवित्र आहे , त्या मुळे मासिक पाळीच्या वेळी स्रिया मला स्पर्श करीत नाहीत. माझी पर्णदले पौर्णिमा , अमावास्या , रात्री , द्वादशीस , मध्यान्हकाळी , संध्यासमयी , स्नानाशिवाय खुडू नयेत. तिन दिवसाची माझी शिळी पर्ण सुद्धा शुद्धच मानली आहेत.
माझं रोप हे ३० ते १२० सें.मी. उंची पर्यंत वाढते . मी दिवसातले २० तास ऑक्सिजन व ४ तास कार्बन डाय ऑक्साइड हवेत सोडते . माझे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात . माझी पाने दाताने चावायची नसतात ; कारण माझ्या पर्णामधे पारा हा धातू असतो , व तो दातांसाठी हानीकारक असतो . मला नेहमी घराबाहेरच लावतात .
माझे राम तुळस , कृष्ण तुळस , रान तुळस , ओवा तुळस (कर्पुर तुळस) आणि मेहंदी तुळस (सब्जा) हे पाच प्रकार पुजनीय व औषधी आहेत . कृष्ण तुळस व राम तुळस दाह , पित्त , रक्तदोष , कफ आणि वायू या सर्वांचा नाश करते . दोन्ही तुळशींचे गुण हे एकसारखेच आहेत . तुळशीची एक जात जी अनेक गुण स्वीकारणारी असते तिला बर्बरी असे म्हणतात ; तिचा रस काहीसा तुरट असतो हिला संस्कृत मधे अजगंधीत व पर्णास अशी नावे आहेत . माझा आणखी एक प्रकार ज्यामुळे सब्जा मिळतो तीचे “थाई तुळस” असे नाव आहे . मी कृष्णाला प्रिय आहे म्हणून मी लक्ष्मी रूप मानली जाते .
आयुर्वेदात मला खूप महत्व आहे . माझ्यापासून जो औषधी द्रव करतात त्याला काढा म्हणतात .मी अनेक आजारावर उपयुक्त आहे . मी एक वनस्पती असून वनस्पती शास्त्रात ” ऑसिमम बॉसिलिकम बेसिल ” असे नाव आहे . भारत हा पुजाप्रधान देश आहे . मला देवता कल्पून पूजा केली जाते .
कार्तिक शुद्ध द्वादशीला व तिथपासून पौर्णिमेपर्यंत माझी पूजा तुलसी विवाह म्हणून करतात ; माझा विवाह श्री विष्णूंचा अवतार समजल्या जाणाऱ्या शाळीग्राम यांचेशी लावला जातो…
आणि या विवाहानंतरच मुलाच्या अथवा मुलीच्या विवाहाला वयपरत्वे प्रतिवर्षी सुरवात केली जाते . अशा पद्धतीने मानवी जीवनात माझं महत्व खूप आहे .
म्हणून , माझी भक्तगृहीणी म्हणते…
“काशी काशी म्हणून ।
सर्व भारती घांवत ।
काशी माझे अंगणात ।
तुळसादेवी ।।
।। इतिशुभम् ।।
— लेखन : अरुण पुराणिक , पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
..तुळशी वनस्पती बद्दल खुप छान माहिती कळली. ज्ञानात भर पडली….धन्यवाद