पहिली माझी ओवी ग क्रांतीज्योती सावित्रीला शैक्षणिक क्रांतीला आणि तिच्या सत्कार्याला
दुसरी माझी ओवी ग कृतार्थ मानवतेला,
सर्वधर्म समभावाने उद्धरिले बहुजना
तिसरी माझी ओवी ग
केशवपन बंदीसाठी नाभिकांना उद्भोदिल्या
चौथी माझी ओवी ग स्त्री- उद्धार कार्याला,
स्त्री-पुरुष समानतेला लिंगभेद रोखण्याला
पाचवी माझी ओवी ग झुगारीले पारतंत्र्याला,
इंद्रप्रकाश, दिनबंधतुूनी प्रबोधिले ज्ञानोदयाला
सहावी माझी ओवी ग तिच्या प्रौढ शिक्षणा,
बालहत्या प्रतिबंध आणि सामाजिक परिवर्तनाला.
सातवी माझी ओवी ग शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काला, मानवकल्याण, श्रमशक्ती, दुष्काळग्रस्त सेवेला
आठवी माझी ओवी ग अनाथ अबला उद्धाराला
दत्तक घेऊनी डॉक्टर केले यशवंताला
नववी माझी ओवी ग देशगौरव हिताला,
शेणमातीचा झेलुनी वाचा फोडली स्त्री मुक्तीला
दहावी माझी ओवी ग पवित्र स्वयं सिद्धेला, स्त्रीशिक्षणाचा घेऊनी वसा जगी इतिहास रचिला
अकरावी माझी ओवी ग सत्यशोधक समाजाला,
न्याय दिला शोषित पीडित दुर्बलांना
बारावी माझी ओवी ग शोषितांच्या सेवेला,
लेख साथीत झुंझुनी देह चंदनी ठेविला
तेरावी माझी ओवी ग त्या उत्कट करुणामाईला अमानुषतेच्या तोडुनी बेड्या न्याय दिला मानवतेला
चौदावी माझी ओवी ग देह चंदनी झिजविला,
प्रणाम त्या अक्षर योगिनी च्या असीम तपश्चर्येला
– रचना : पूर्णिमा शिंदे.
आकाशवाणी निवेदिका मुंबई
चवदाही ओव्या छान