Friday, May 9, 2025
Homeसाहित्य'ते' काय वाचतात ? भाग - १

‘ते’ काय वाचतात ? भाग – १

वाचक वाचत असतातच. पण लेखक, कवी, कलाकार अशी मंडळी सुध्दा वाचत असतात. तर ‘ते’ काय वाचतात, केव्हा वाचतात या उद्बोधक, मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ या आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त. आणि हे लेखनही केलं आहे ते स्वतः लेखक, संपादक, कलाकार असलेल्या मेघना साने यांनी…

नेहेमीच्या व्यस्त जीवनात वाचायला वेळ मिळतच नाही असं सांगणारी अनेक माणसं मी पाहिली. मात्र लॉक डाऊनमधे त्यांना अचानक काहीतरी वाचायला हवे होते. पण तेव्हा नेमकी वाचनालये, पुस्तकालये बंद होती. घरात फ्रीझ, टीव्ही, शोकेस सारेच होते, मात्र पुस्तके नव्हती.

खरंच वाचन हा दैनंदिन जीवनाचा भाग होऊ शकतो का ? वर्तमानपत्राशिवाय लोक आणखी काय काय वाचतात ? त्यासाठी वेळ कसा काढतात ? हे कुतूहल घेऊन मी अनेक लेखक, कवी, निवेदक, कलाकार यांना भेटले. काहींना प्रत्यक्ष तर काहींना फोनवरून. जाणून घेतली त्यांची दिनचर्या.

“श्वास” च्या कथालेखिका, माधवी घारपुरे –
“माणसाला जसं अन्न, वस्त्र, निवारा यांची गरज आहे तसंच वाचनाचीही गरज आहे. अन्न हे देहाचं पोषण करतं आणि वाचन मनाची भूक भागवतं. “सुप्रसिद्ध लेखिका माधवी घारपुरे म्हणाल्या. मन टवटवीत ठेवण्यासाठी वाचन हवेच. माधवीताई रोजच वाचन करतात. पण अमुक एक वेळ अशी न ठरवता, वेळ मिळेल तेव्हा वाचतात. कधी सकाळी तर कधी दुपारी फावल्या वेळात. पण रात्री मात्र हमखास वाचन हवेच. त्याशिवाय त्या झोपत नाहीत.

माधवी घारपुरे

वाचनात कथा, कादंबऱ्या असतात. पण गूढ किंवा रहस्यमय पुस्तके वाचण्याकडे त्यांचा अजिबात कल नाही. चरित्रे किंवा चरित्रात्मक कादंबऱ्या यातच माधवीताई रमतात. माधवीताईंशी बोलताना लेखकांचे वाचन कसे वेगळे असते याचा मला प्रत्यय आला. त्या म्हणाल्या, “प्रत्येक वाचनाचं मी टिपण ठेवते. चांगल्या गोष्टी किंवा महत्वाची वाक्ये लिहून ठेवायची असतात. नंतर लक्षात रहात नाहीत.”

इंग्रजी पुस्तकांचे सुप्रसिद्ध समीक्षक, विवेक गोविलकर
वर्तमानपत्रां मध्ये इंग्रजी पुस्तकांचं समीक्षण लिहिणारे विवेक गोविलकर म्हणाले, “चांगल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी मला “न्यू यॉर्क टाईम्स” आणि “द गार्डियन” या मोठ्या वर्तमानपत्रांचा साहित्यिक विभाग वाचावा लागतो. त्यात उत्तम पुस्तकांची यादी येत असते. बेस्ट सेलरची यादी असते. पुलित्झर, बुकर आणि साऊथ एशियनच्या पुरस्कारासाठी दरवर्षी आधी एक मोठी यादी जाहीर होते. त्यातून एक लहान यादी निवडली जाते आणि त्या यादीतून एक पुस्तक निवडून त्या लेखकाला पुरस्कार दिला जातो.

नामांकन झालेली यादी मी पहातो. पुरस्कार मिळालेली आणि लहान यादीतील पुस्तकेही मी वाचतो. तीही चांगलीच असतात.” गोविलकर म्हणतात की मुलाने सांगितले म्हणून त्यांनी हॅरी पॉटर वाचले आणि त्यांना ते आवडले. मग पुढील भाग देखील वाचले. पुढे जे. के. रोलींग ही लेखिका अधिक काय लिहिते आहे याकडे त्यांनी लक्ष ठेवले. तर ती अगाथा ख्रिस्तीसारखे रहस्यमय लिहायला लागली होती. पण “रॉबर्ट गालब्रेथ” या टोपण नावाने ! त्यांच्या वाचनातल्या आणखी काही लेखिका आहेत.

झुम्पा लाहिरी, मार्गो ली शेटर्ली, ऑगस्टीना बाझतरीका, चीमामांदा अंगोझी अदीची, हार्पर ली, माजा मेंगिस्टे या सर्वच लेखिकांचे लेखन त्यांना भावले. तसंच थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थतज्ञाने लिहिलेलं “कॅपिटल इन द ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी” अर्थशास्त्रावरील पुस्तक त्यांना फार आवडलं. मग त्याने अजून काय नवीन लिहिलं आहे यावर त्यांनी लक्ष ठेवले आणि ते वाचले.

महाराष्ट्र टाइम्स ,लोकसत्ता ,सामना साधना ,ललित, साहित्य सूची ,दीपलक्ष्मी ,लोकमुद्रा आणि अशा अनेक नियतकालिकांतून मराठी वाचकांपर्यंत इंग्रजी पुस्तक पोचवण्याचा प्रयत्न करणारे विवेक गोविलकर यांनी आजवर 100 हून अधिक पुस्तकांची समीक्षण लिहिली. त्यातली फारच थोडी पुस्तके संपादकांनी सुचविलेली होती. बाकी त्यांनी स्वतः शोधून काढलेल्या उत्तम पुस्तकांवर समीक्षण लिहिले. ते म्हणतात, “मराठीचा अभिमान कितीही बाळगला तरी इंग्रजीचा आवाका हा फार मोठा आहे हे आपण मान्य केले पाहिजे. फार वेगवेगळे विषय त्यात हाताळले जातात. मी शक्यतो नव्याने प्रकाशित झालेली पुस्तकेच वाचतो. अर्थात मैलाचा दगड म्हणून प्रसिद्ध असलेली जुनी पुस्तकेही वाचलेलीच असतात. समीक्षण लिहिण्यासाठी एक एक पुस्तक दोनदा सुद्धा वाचावे लागते.

विवेक गोविलकर

गोविलकरांची नोकरी मोठया हुद्द्याची व फिरतीची होती. अनेकदा विमानप्रवास करावा लागत असे. दिल्ली, बंगलोरच काय पण सिंगापूर, लंडन अशाही फेऱ्या होत. विमानामधे त्यांचा एक उत्तम सहप्रवासी नेहेमी असायचा – तो म्हणजे ग्रंथ! आताशा ते किंडल बुक वाचू लागले आहेत. त्यामुळे जाडजूड ग्रंथ प्रवासात न्यावे लागत नाहीत. कागद वापरला न गेल्याने पर्यावरणाचा ह्रास होत नाही.

सुप्रसिद्ध चित्रकार आणि लेखक विजयराज बोधनकर
“लहानपणी हरी नारायण आपटे यांची ‘उषःकाल’ ही कादंबरी वाचली नसती तर मी मुंबईत आलो नसतो. ही कादंबरी वाचून माझ्यात हिम्मत आली. बहिर्जी नाईक माझ्या आयुष्यात आला हे फार बरं झालं. ” विजयराज सांगत होते. लहानपणी आमच्या घरी सर्व वैचारिकच वाचत असत. आईला वाचनाची प्रचंड आवड होती. तिला विचारलं की तू कशासाठी वाचतेस, तर ती उत्तर द्यायची “मी प्रवासाला जाते. “खरंच पुस्तकाच्या खिडकीतून बाहेरचं जग बघता येतं.

विजयराज बोधनकर

बोधनकर म्हणतात, “अजूनही मला वाचनाची खूप आवड आहे. माझ्या घरी साडेतीन हजार पुस्तके आहेत. नवनवीन पुस्तके विकत घेऊन मी संग्रही ठेवतो. पुस्तकं म्हणजे ऊर्जेचा एक स्रोत असतो.” बोधनकारांच्या विचारांवर ओशोंचा प्रभाव पडला. टिळकांवरची ‘दुर्दम्य’ ही कादंबरी त्यांना प्रचंड आवडली. बेंद्रे यांनी लिहिलेलं तुकारामांचं चरित्र त्यांना रद्दीत मिळालं. ‘ग्रामगीते’ हे पुस्तक वाचलं तेव्हा मनातील जातीभेद नष्ट झाला. खलील जिब्रानच्या ‘बंडखोर आत्मे’ आणि ‘प्रेषित’ या कादंबऱ्या जरूर वाचाव्या असे ते सांगतात.

नुकतंच सध्या गाजत असलेलं भैरप्पांचं ‘आवरण’ हे पुस्तक त्यांनी प्राप्त केलं आहे. आपल्याला हवे असलेलं एखादे पुस्तक मिळाल्याचा आनंद काही अवर्णनीय असतो. काही पुस्तके वाचल्याने जीवनाची जाणीव प्रगल्भ होते, दृष्टिकोन विस्तारतो, दुसऱ्याला तुच्छ मानण्याची भावना निघून जाते. बोधनकारांना जी. एं.ची पुस्तकेही खूप आवडतात. बोधनकर स्वतः चित्रकार आहेत. जी.ए. आपल्या शब्दांच्या फाटकाऱ्यांनी जे चित्र उभं करतात त्याचं त्यांना फार अप्रूप वाटतं.
संशोधनपर पुस्तकं जरूर वाचली पाहिजेत. त्यामुळे सत्य समोर येतं.

सुप्रसिद्ध कवी, चित्रकार रामदास खरे –
जानेवारी २०२१ पासून ‘महाराष्ट्र दिनमान’ या दैनिकात रामदास यांचे ‘पत्रास कारण की’ हे सदर चालू आहे. यात ते एखाद्या लेखकाच्या कार्याचा आढावा घेतात आणि त्याच्या लेखनातील विशेष गुण सांगतात. आत्तापर्यंत तीस लेख झाले. त्यात प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, मधू मंगेश कर्णिक, डॉ. अनंत देशमुख, अनंत सामंत, वसंत वसंत लिमये, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अरुणा ढेरे अशा दिग्गज लेखकांवर त्यांनी लेखन केले. या सर्वांच्या लेखांचा अभ्यास करण्यासाठी विपुल वाचन केले.

रामदास खरे

रामदास म्हणतात, “माझी पत्नी नोकरी करत असल्यामुळे सकाळची बरीचशी जबाबदारी माझ्यावर असते. पण सर्व आटोपून मी वाचनाची बैठक दुपारी दोन पासून जी घेतो ती संध्याकाळी सात पर्यंत. नियमितपणे वाचन करतो.
पुस्तकांवर परीक्षणे लिहिणे याचीही आवड आहेच. त्यासाठी उत्तमोत्तम पुस्तके संग्रही ठेवायची, वाचायची आणि नंतर परीक्षणे लिहायची हे सातत्याने सुरूच असते. उदाहरणादाखल, ‘मंटोच्या कथा’ (वसुधा सहस्रबुद्धे), ‘साद हिमालयाची’ (वसंत वसंत लिमये), ‘काळोखाच्या कविता’ (नामदेव कोळी), ‘सिम्फनी’
(अच्युत गोडबोले), ‘ऐसपैस दुर्गाबाईंशी’ (डॉ. प्रतिभा रानडे) ही पुस्तके त्यांनी वाचून त्यावर समीक्षणे लिहिली.

सुप्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड –
बालसाहित्याची आवड असलेले आव्हाडसर म्हणाले, “मी सतत बालसाहित्य वाचत असतो. मुलांसाठी हल्ली कोण काय लिहितंय याचा बारकाईने अभ्यास करतो. त्यावरची परीक्षणं वाचतो. मुलांसाठी किती सुलभ लिहिलं पाहिजे याचा सातत्याने विचार करतो. मुलांसाठी कोणत्या गोष्टी किंवा कविता सांगितल्या जाव्यात, कशा प्रकारे सांगितल्या जाव्यात याचे सतत चिंतन करतो. गेल्या पंचवीस वर्षातील बालसाहित्यावरील समीक्षांचा मी आढावा घेतला आहे.”

दादर पुलाखाली राहणाऱ्या मुलांना गोष्टी सांगताना एकनाथ आव्हाड .

एकनाथ आव्हाड हे कथाकथनकारदेखील आहेत. ते सतत कथांचे वाचन करतात. विजया वाड त्यांच्या आवडत्या कथालेखिका आहेत. जयवंत दळवी, गिरीजा कीर, द.मा.मिरासदार, शंकर पाटील हे सारे त्यांचे आवडते लेखक. पु.लं.चे ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘बटाट्याची चाळ’ याबद्दल ते म्हणतात, “ही पुस्तकं कितीदा वाचून मी एकटाच हसत बसतो. तर द. मां. च्या कथेचे चिंतन करावे लागते. त्यांची कथा सांगण्यासाठी ती मनात रुजवून घ्यावी लागते.” द. मां.ची ‘तास कवितेचा’, जयवंत दळवी यांची ‘चिमण’, विजया वाड यांची ‘अवेळ’ अशा काही आवडत्या कथांचा उल्लेख करून आव्हाडसर म्हणाले,
“एक एक कथा सांगण्यापूर्वी मी त्यावर खूप परिश्रम घेतो. ती कशी सादर करावी यावर खूप विचार केलेला असतो. आणि मुळात मला ती फार आवडलेली असते. म्हणून माझा कथाकथनाच्या कार्यक्रम कधी कंटाळवाणा होत नाही.”
आव्हाडसर शाळेचे टाईम टेबल आणि कार्यक्रमाच्या वेळा सांभाळून जमेल तेव्हा भरपूर वाचन करतात.
क्रमशः….

मेघना साने

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. लेखक काय वाचतात ही संकल्पनाच खूप आवडली, लेख खूप छान, प्रत्येक लेखकाची वाचनाची दिशाही निरनिराळी ,पण वाचनातून लेखनास प्रेरित होता येत हे ही यातूनच समजत

  2. सुंदर विषय आणि लेख सुद्धा माहिती देणारा.. वाचनानंद हाच मोठा आनंद आहे.

  3. खूप छान लेख,एक वेगळीच कल्पना,
    लेखक काय वाचतात हे जाणून,आपल्या वाचनाची दिशा ठर वायला छान मदत!!!

  4. वाह छान लिहिले आहे, प्रत्येकाचा वाचनाचा दृष्टिकोन वेगवेगळा. किरणे वेगळी , घेतलेला बोध पण वेगळा,आणि त्यामुळेच एवढे निरनिराळे दर्जेदार लेखन ,साहित्य आमच्या पर्यंत पोहचतं.

  5. ‘ते’ काय वाचतात ही कल्पनाही चांगली आणि लेखही छान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास