वाचन प्रेरणा दिनानिमित्त, स्वतः लेखक, कवी, कलाकार काय वाचतात ? याविषयी आपण कालच्या पहिल्या भागात उद्बोधक माहिती घेतली. त्याला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. आजच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात वाचू या, ‘ते’ काय वाचतात…
कृषितज्ज्ञ आणि एकपात्री कलाकार डॉ. दिलीप अलोणे –
ग्रामीण कादंबरीची वाटचाल अभ्यासून पीएच.डी. मिळवलेले डॉ. अलोणे म्हणतात की, ग्रामीण कादंबऱ्या वाचून मला शेतकऱ्यांच्या समस्या खऱ्या अर्थाने कळल्या. कादंबरी कपोलकल्पित असली तरी ती वास्तवावरच आधारित असते. आता डॉ. अलोणे शेतकऱ्यांच्या शेती उत्कर्षासाठी झटत आहेत. उत्तम प्रतीचे पीक कसे काढता येईल यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.

“कथा, कादंबरी, चरित्र सर्वच प्रकारची पुस्तके मी वाचतो. विकत घेऊन संग्रह करून ठेवतो. माझ्याकडे तीनहजार पाचशे पुस्तके आहेत.” असे अलोणे सांगत होते. त्यांनी वाचनाची वेळ संध्याकाळ ठरवली आहे. गप्पाटप्पा, टीव्ही बघणे यापेक्षा वाचनाला महत्व दिले आहे. रात्री दीड दोन पर्यंत सुद्धा एखादे पुस्तक हातातून सोडवत नाही.
“एखादा लेखक वाचायला घेल्यावर मी तो पूर्णपणे वाचतो. जयवंत दळवी घेतले तर त्यांची सर्व नाटकं वाचायला हवी. ग. त्र्यं. माडखोलकर घेतले तर त्यांची सर्व पुस्तके वाचायची असे मी ठरवतो आणि त्याप्रमाणे वाचत रहातो.” डॉ. अलोणे सांगत होते. एखादा लेखक समजून घेण्यासाठी त्याचे सर्व लेखन वाचणे आवश्यक आहे. डॉ. अलोणे वाचताना टिपणे काढतात. कधी ही टिपणे भाषणाचे वेळी उपयोगी पडतात.
राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार शुभांगी भडभडे –
शुभांगी भडभडे यांची काही काळच भेट झाली पण भेटीतले ते क्षण उजळून निघाले. त्यांनी बावीस चरित्रात्मक कादंबऱ्या आणि बावीस सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. चरित्रात्मक कादंबरी लिहिताना केलेल्या अभ्यासाबद्दल त्या बोलत होत्या .
“चरित्रात्मक कादंबरी लिहिताना ज्या व्यक्तीचे चरित्र किंवा जिच्यावर कादंबरी लिहायची तिच्यावर इतर लेखकांनी आधी काय लिहून ठेवले आहे ते प्रथम वाचावे लागते. त्यावरचे समीक्षण ही वाचावे लागते.”

शुभांगी ताई म्हणाल्या की,” एखादे नवीन प्रोजेक्ट सुरू करताना, मी प्रथम आमच्या लेखकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर हे टाकते. ‘कोणाला काही याविषयी माहिती असल्यास पाठवावे ‘असे सांगते. लोकांचे वाचन बऱ्यापैकी असते आणि ते भरभरून माहिती देतात. संदर्भग्रंथ मात्र मिळवावे लागतात.”
आता दीपशिखा कालिदास ‘ही कालिदासाच्या जीवनावर आधारित कादंबरी शुभांगी ताईंनी पूर्ण केली, त्या वेळेचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या “कालिदासाचे चरित्र माहित करून घेण्यासाठी कोणतेच चरित्र ग्रंथ उपलब्ध उपलब्ध नाहीत. त्याचे साहित्य मात्र उपलब्ध आहे. साहित्यामध्ये नोंद असलेली सगळी स्थळे मी शोधत गेले, तर ती सगळी खरी आहेत. उज्जैन नगरी आहे.
नाटकाच्या नांदीत ज्या अष्टमुखी शिवलिंगाचा उल्लेख आहे, ते शिवलींग आपल्याला पाहायला मिळू शकते. भव्य आहे ते. मेघदूतात वर्णिलेल्या जागा तेथील, भौगोलिक वातावरण, रामगिरीपासून अलकानगरीकडे जाणाऱ्या वाऱ्याची दिशा सत्य आहे. याचं संशोधन झालं आहे. उज्जैन कडून निघाल्यानंतर लागणारे विदर्भाचे राज्य सत्य आहे. त्या आधारे त्याचे चरित्र लिहावे लागले. त्यात फक्त ‘मधुलिका’ हे गणिकेचे काल्पनिक पात्र घालून कादंबरी लिहिली. त्या काळी गणिकेला समाजानी आणि सम्राट चंद्रगुप्ताने सन्माननीय असं स्थान दिलं होतं.
काही पुस्तकांमध्ये संदर्भाची काहीच पाने मिळतात त्या तेवढ्या पानांसाठी संपूर्ण पुस्तक वाचायला नको म्हणून वाचनालयाचे ग्रंथपाल संदर्भ पुस्तकांमध्ये खुणेचे कागद ठेऊन तेवढाच भाग शुभांगीताईंनी वाचावा असे सुचवतात. वाचनालयाच्या या मदतीचे त्यांनी कौतुक केले.
कवयित्री प्रतिभा सराफ –
गेली तीन वर्षे मॅजेस्टिकच्या ‘ललित’ या मासिकात पुस्तकांवर परीक्षणे लिहिणाऱ्या प्रा प्रतिभा सराफ एक उत्तम वाचक आहेत. ‘ललित’ मासिकावरील ‘दृष्टिक्षेप’ सदरासाठी परीक्षणं लिहिताना काही चांगली पुस्तकं हाती आली त्यांचा त्यांनी उल्लेख केला.
‘ओम णमो’, शांतीलाल देसाई, (अनुवाद अजित मगदूम), ‘अलूफ’ (सदानंद डबीर), ‘चाफा लावीन तेथे लाल’ (वसंत वाहोकर), ‘पिंपळपान’ (लीना माटे), ‘आत्मनाद ‘ (श्रीकृष्ण बेडेकर), ‘भवताल’ (रविंद्र शोभणे)
प्रतिभा सराफ यांनी ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘सामना’ इत्यादी वर्तमानपत्रात तसेच ‘भटकंती’, ‘वसंत’, ‘मैत्रीण’ इत्यादी मासिकात परीक्षणं लिहिली आहेत. आपली भौतिकशास्त्र प्राध्यापिकेची नोकरी सांभाळून दर महिन्याला सहा पुस्तकांची परीक्षणं लिहायची असल्याने प्रतिभा सतत वाचन करत असतात.

“वाचन करताना मला पुस्तकात पेन्सिलने खुणा करणे, पुस्तकाची पाने दुमडणे असं करायला अजिबात आवडत नाही. पण त्यामुळे कधी कधी एखादा संदर्भ पहाण्यासाठी मला पुन्हा दहा पाने उलटून मागे जावे लागते.” प्रतिभा सांगत होत्या. पुस्तकांचे कव्हरपासून आतील शेवटच्या पानापर्यंत असे एक सौंदर्य असते. ते त्यांना तसेच जपायला आवडते. आस्वाद हा आशयाचा घ्यायचा असतो. मुखपृष्ठावरील चित्रालाही महत्व असतं
परीक्षण लिहिताना त्याचीही दखल घ्यायची असते. पुस्तकाचा कन्सेप्ट त्यात असतो. एखादे चरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरी वाचताना त्या काळातील पिढ्यांमधील व्यक्तींची नांवे आणि त्या संबंधीच्या घटना येतात. मग प्रतिभा सरळ वृक्षालेख (ट्री डायग्राम) काढणे पसंत करतात. एखादा बाळासाहेब किंवा भाईसाहेब असतो. त्याने पुन्हा आपल्या नातवाचं नांव तेच ठेवलेलं असतं. पुन्हा कथेत बाळ किंवा भाई येतो. अशा वेळी खूप बारकाईने वाचावे लागते.
“परीक्षणं लिहिताना मनाची स्थिती वेगळी असते. पुस्तकाच्या बाजूला वही ठेवून मी पुस्तकातील सौंदर्यस्थळं, महत्वाची वाक्यं सतत टिपत असते. त्यातील विचार लक्षात घेत असते. मात्र अशा प्रकारे पुस्तक वाचल्याने मला नवीन काही सुचले असे होत नाही.” प्रतिभा सांगत होत्या. “माझी कविता वर्षानुवर्षे तशीच राहिली. या वाचनाचा माझ्या कवितेवर परिणाम झालेला नाही.”
निवेदिका, लेखिका वासंती वर्तक –
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या देणाऱ्या आणि ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘प्रहार’ अशा दैनिकांमध्ये स्तंभलेखन करणाऱ्या वासंती वर्तक यांचे वाचन खूप आहे हे त्यांच्या बोलण्यावरून व निवेदन शैलीवरून कळतेच. त्या हजरजबाबी आहेत. मला त्यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली.
वासंती भूतकाळातील काही आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, “पूर्वी, म्हणजे माझी मुलगी जेव्हा आजारी असायची त्यावेळी, तिच्यासाठी रात्रभर जागताना मला पुस्तकांचा आधार असायचा. त्या काळात खूप पुस्तके वाचली.

आता मी मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या वाचनालयाची विश्वस्त आहे. पण तेवढे वाचन होत नाही. वर्षानुवर्षे सह्याद्रीवर बातम्या वाचताना आजूबाजूच्या जगातील घडामोडी कळत होत्या. मते तयार होत होती. त्यामुळे कोणत्याही वर्तमानपत्राची भूमिकाही पटकन कळते. अनेकदा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असला की त्यानिमित्त पुस्तक वाचून होते. कधी एखाद्या पुरस्कार वितरणाला किंवा एखाद्या खास महोत्सवाला त्या त्या विषयांची माहिती गोळा करण्यासाठी वाचन करावं लागतं.
निवेदकाने विषयाचा पूर्ण अभ्यास करणं हे अपेक्षितच असतं. पण निवेदनात मात्र माफकच बोलावं लागतं. नाहीतर स्टेजवरील वक्ते रागावतात. त्यांना मुद्दे उरले नाहीत असं होता कामा नये. कधी कधी पाहुण्यांना उशीर किंवा अन्य एखाद्या कारणामुळे निवेदकावर व्यासपीठ सांभाळण्याची जबाबदारी पडते. तेव्हा त्याचे अन्य वाचनच उपयोगी पडते.
सतत वाचन केलं की ते आपल्या मनात मुरत जातं आणि आपल्या भाषेवरही संस्कार करत जातं. हा वाचनाचा संस्कार अमूल्य असा आहे. वासंती यांनी आपल्या काही आवडत्या पुस्तकांचा उल्लेख केला. विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण ‘ ही कादंबरी, तसेच नवीन पुस्तकांमध्ये ‘घातसूत्र’ हे दीपक करंजीकर यांचे पुस्तक व वसंत वसंत लिमये यांची कृष्णावरची कादंबरी.
सुप्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. महेश खरात
महेश खरात सर हे विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथे मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांचे कामाचे ठिकाण घरापासून नव्वद किलोमीटर दूर आहे. त्यामुळे गाडीचा दोन तासाचा प्रवास जाताना व येतानाही करावा लागतो. या वेळेचा उपयोग ते वाचनासाठी करतात. त्यामुळे त्यांचे भरपूर वाचन झालेले आहे. तसेच त्यांनी विपुल लेखनही केले आहे.
नुकतीच त्यांची ‘बूर्गांट’ ही कादंबरी गाजत आहे.
डॉ. खरात म्हणाले की ते कथात्मक साहित्यात जास्त रमतात. त्यांनी काही पुस्तकांचा उल्लेख केला. सातत्याने नवीन विषयाची पुस्तके वाचणे ही त्यांची आवड आहे. मकरंद साठे यांची ‘गार्डन ऑफ इडन उर्फ साई सोसायटी’ ही कादंबरी पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केली. ही एक प्रयोगात्मक कादंबरी आहे. उत्तर आधुनिकीकरणानंतर जी आधुनिकता अपेक्षित आहे त्या संदर्भात ही कादंबरी महत्त्वाची ठरते.

तसेच नंदा खरे यांनी लिहिलेली ‘उद्या’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आल्याचे ते म्हणाले. या कादंबरीला साहित्य अकादमीचे अवॉर्ड मिळाले. नंदा खरे यांनी ते नाकारले. या कादंबरीत कमालीच्या अस्वस्थतेतून वर्तमान काळाचा वेध घेत बहुआयामी विशाल पट सादर केला आहे.
सध्या डिजिटल युग आहे. प्रत्येक व्यक्तीला एखाद्या नंबरने किंवा आधार कार्डने ओळखले जाते. व्यक्ती व नाती, दोन्हींचे वस्तूकरण झाल्याने आपल्याला कोणाशी जोडून घेण्यासाठी उपयोगिता हा एकमेव निकष झाला आहे. अशा वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके आपण वाचली पाहिजेत.
रवींद्र शोभणे यांच्या ‘भवताल’ या कथासंग्रहाचा च्या उल्लेख करून ते म्हणाले, “सद्यस्थितीवरील हा कथासंग्रह मला अतिशय आवडला. त्यात त्यांनी साहित्य, कलाक्षेत्र, शिक्षण क्षेत्र यातील सध्याच्या स्थितीचा वेध घेतलेला आहे. या कथासंग्रहात संशोधक आणि मार्गदर्शक यांच्या नात्यावर कथा आहे आणि अगदी वेश्येच्या जीवनावरसुद्धा एक कथा आहे. ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावरची गोविंद काळे यांची ‘महायोद्धा’ ही कादंबरी त्यांना आवडली.
तसेच अनुजा जोशी यांचा ‘उत्सव’ हा कवितासंग्रहही आवडला. प्रिया धारूरकर, वर्षा डोके याही उत्तम लिहितात. सध्या लिहिते हात खूप आलेले आहेत आणि नव्याने लिहिणाऱ्यांचे आपण वाचले पाहिजे असे ते वारंवार सांगतात.
वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी आपल्या ‘मुक्त सृजन पत्रिके’ द्वारे डॉ. महेश खरात वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करतात. साहित्यातील सर्व विचारधारांना सामावून घेणारी ही पत्रिका आहे. नवीन आलेल्या अतिशय वेगळ्या विषयावरच्या पुस्तकांवर मान्यवरांना बोलावून चर्चा आयोजित करतात. नवीन तसेच अतिशय नावाजलेल्या अशा कवयित्रींचे काव्यसंग्रह काढणे, साहित्यसंमेलने आयोजित करणे, लेखकांना पुरस्कार देणे असे अनेक उपक्रम केल्यामुळे डॉ. महेश खरात यांच्याशी एक मोठा लेखक आणि वाचक वर्ग जोडला गेला आहे.
तर मंडळी, हा दुसरा भाग आणि एकूणच उपक्रम आपल्याला कसा वाटला ? हे अवश्य कळवा आणि आपणही अधिकाधिक वाचत रहा.

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
धन्यवाद मेघनाताई, तुमचे दोन्ही लेख वाचले. व आवडले. आपण बऱ्याच वेगवेगळ्या लेखकांचे साहित्य वाचतो पण ते सर्व कोणते व कोणाचे साहित्य वाचतात याची मला उत्सुकता होती. आपल्या लेखांमुळे ती माहिती मिळाली. धन्यवाद.
वाह…त्या त्या लेखकाच्या वाचनाचा समृद्ध आढावा भावला.
मेघना… अतिशय सुंदर लेख लिहिला आहेस आणि त्यात मलाही सामावून घेतलेस, याबद्दल मनापासून धन्यवाद!
मेघना जी, नक्कीच एक आगळी वेगळी आणि छान संकल्पना आहे ही! लेखक, लेखिका आणि त्यांचं साहित्य वाचायला उद्युक्त करते! साहित्यातील नव निर्मिती सहज कळून येते. धन्यवाद!
मेघनाताई, पहिल्या भागाप्रमाणेच दुस-या भागात डॉ महेश खरात, प्रतिभा सराफ मॅडम, वासंती वर्तक मॅडम यांच्या कडून ब-याच नवीन पुस्तकांची नावं समजली आणि आपण स्वतःला नवीन पुस्तकांबरोबर जोडायला हवं हे ही समजलं….. धन्यवाद 🙏