काहींच्या मते तो हट्टी होता
कोणी म्हणे तो तर भारी तिरसट होता
तो हट्टी तिरसट दोन्ही नव्हता
तो आपल्या तत्वा वर कायम होता.
तत्वांचा आग्रह पण होता
कोणी म्हणे तो दुराग्रही होता
तो दुराग्रही मुळीच नव्हता
स्वतः पुरता तत्वावर कायम होता.
कोणी म्हणे तो माणुसघाणा होता
कोणी म्हणे तो एकलकोंडा होता
या उलट तो नाती जपणारा होता
माणसं जोडत त्यांना संभाळणारा होता.
भाऊ भावजयांवर चिडतही होता
पुतण्यांना प्रसंगी रागावतही होता
पण तितकाच मायेचा आधार होता
नातवंडांचा मात्र लाडका आबा होता.
मनाविरुध्द झाल्यावर दुखावत होता
पण समजावल्यावर समजत होता
आपण चुकलो हे जरी मानत नव्हता
तरी गपगुमान सारं ऐकतही होता.
तिच्याशी जरी खूप वाद घालत होता
हक्काने कामं सोपवत निश्चिंत ही होता
मानाने जरी नात्यात धाकटा दीर होता
तरीही तो मोठा भाऊ सखा स्नेही सारं होता.
वेळ प्रसंगी सर्वांचा आधार होता
प्रत्येक हाकेला धावून सोबत होता
आता मात्र तो तत्वासोबत पडून होता
कुणाच्या हाकेला न ऐकता जात होता.
आज त्याचा तो वाडा भकास वाटत होता
त्याने रोज पुजलेला देव पारोसा बसून होता
त्या स्पर्शाला आसुसलेला हिदोळा लोंबला होता
अबोली जाई जुई मोगरा ही वाट पाहत होता.
संजीव निर्जीव सगे सोयरे सोडून जात होता
सर्वात लिप्त असलेला आज निर्लिप्त होता
बिनडाग श्वेत वस्त्र नेसणारा गुलालाने डागाळला होता
तरीही काहीच न बोलता शांतपणे निघाला होता.
– रचना : सौ. राधिका इंगळे. देवास, मध्य प्रदेश
त्याची सुंदर कविता.