स्वप्नातहि चंद्र मला
फिकट कधी दिसला ना
सूर्याची तेजनाळ
बुडताना तुटली ना
लाटांच्या रौद्रातहि
अवसानी धैर्य चढे
महापुरी नौकाही
सहज पैलथडा भिडे
वाळुवंटि फिरताना
कोरडला नाहि घसा
अवतरले ओयासिस
तृष्णित मी राहि कसा ?
खिंडीतच गाठतात
संकटेहि घेराया
कुठलीशी शक्ती ये
बाजीने रक्षाया
वाट पुसट होइ कधी
रातांधळ झालो की
काजवेच रांग धरत
पथदर्शक होती की
कुणीतरी अंतरात
दीप पेटवीत बसे
ना विझत्या प्रकाशात
जग सारे स्पष्ट दिसे
गलितगात्र झालो की
धनुष सहज गळुन पडे
सन्निध तो असताना
रडणेही दूर पळे
प्राचीवर शुभ स्वस्तिक
तो आहे म्हणुन दिसे
तनमन व्यापून तोच
माझ्यातुन नित्य वसे
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800