अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख. अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटे या गावी जन्माला आलेले तुकाराम साठे मुंबईत आले आणि अण्णाभाऊ साठे झाले.
हे केवळ अण्णाभाऊंचे नाव बदलले नाही तर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाच्या विचारधारेच्या जाणिवा बदलल्या त्या त्यांच्या कामामधून.
एकंदरीत वर्गजागृतीचा प्रारंभ हा अण्णाभाऊ यांच्या साहित्यामधून झाला असे म्हणावयास हरकत नाही.
ते साक्षर झाले ते चित्रपटांच्या नावाच्या पाट्या जुळवत आणि समाजाचे चेहरे वाचत.
एका अर्थाने समाज वाचणे आणि समाज समजून घेणे सोपे नाही. मात्र अण्णा भाऊ साठे यांनी ती कला अवगत केली होती.
साहित्य प्रकारामध्ये कथा, कादंबरी, लोकनाट्य, पटकथा, लावणी, पोवाडे, जलसे, प्रवासवर्णन असा कोणता प्रकार राहिला नाही ज्यावर त्यांनी लेखन केले नाही.
दीड दिवस शाळेत गेलेल्या या महान व्यक्तिमत्त्वाने साहित्यिक म्हणून नाव कमवले. ते शाळेत गेले नाही किंवा विद्यापीठाचे तोंडही पाहिले नाही म्हणून काही बिघडले नाही.
मात्र त्यांच्या साहित्यावर विद्यावाचस्पती प्राप्त केलेले अनेक जण आपणास आज पहावयास मिळतील.
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर श्रीपाद अमृत डांगे यांचा प्रभाव दिसून येतो. बाबासाहेब आंबेडकरांची आणि सावरकरांची दोघांचीही भाषणे त्यांनी ऐकली. १९४२ च्या चलेजाव आंदोलन जवळून पाहिले. शाहीर अमर शेख यांच्याबरोबर उत्तम पद्धतीने काम केले.
१९४३ मध्ये “पार्टी” या मासिकात स्टॅलिन ग्रँड चा पोवाडा प्रसिद्ध झाला.
१९४५ अकलेची गोष्ट.
१९४६ देशभक्त घोटाळे.
१९४६ शेठजींचे इलेक्शन.
१९४७ बेकायदेशीर पुढारी मिळाला.
अमळनेरचे अमर हुतात्मे पंजाब दिल्लीचा दंगा १९४७ मध्ये केलेल्या काव्यरचना प्रसिद्ध झाल्या.
१९५० मध्ये महाराष्ट्राची परंपरा पोवाडा मुंबई कुणाची हे लोकनाट्य.
१९५२ लोकमंत्र्याचा दौरा.
ही लोकनाट्य सर्व समाजाने आवर्जून वाचावी.
एका अर्थाने बाबासाहेबांचा साहित्यिक वारसा अण्णाभाऊंनी पुढे चालवला. अण्णांची निरीक्षण शक्ती दांडगी होती. मराठमोळे लेखन नाट्यमयता आणि लोभसपणा त्यांच्या साहित्यात आहे.
त्यांचा “माझा रशियाचा प्रवास” हा ग्रंथ प्रवास वर्णन कसे असावे याविषयी खूप काही शिकवणारा आहे.
२०१५ सालापर्यंत अण्णाभाऊ यांच्या साहित्यावर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये ११ प्राध्यापकांनी विद्यावाचस्वती ही पदवी प्राप्त केली अशी माहिती मिळवली आहे. त्या पुढील कालावधीची माहिती अजून बाकी आहे.
जगातील २२ भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले आहे.
“वेळ राहत नाही. परिस्थितीवर मात करा. संकटांना संधी समजा आणि युवकांनो उभे रहा” हा अण्णाभाऊंचा संदेश म्हणजे महाराष्ट्राच्या परिवर्तनाचे एक अंग आहे.
जग बदलण्याचा आणि घाव घालण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपणावर दिली असे ते म्हणत. घाव घाव म्हणजे वैचारिक दृष्ट्या लिहिणे बोलणे होय.
अण्णाभाऊंच्या साहित्याविषयी लिहिणे म्हणजे त्यांच्या साहित्य दिंडीचा एक वारकरी होणे.
माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे या मताचा अविष्कार म्हणजे अण्णाभाऊ यांचे साहित्य होय.
व्यक्ती ही कोणत्या एका समाजाची नसते.
समाजाने त्या थोर चरित्राचा विचार स्वीकार करून त्याचे आचरण करावयाचे असते.
प्रतिभेला जर सत्याचे जीवनाचे दर्शन नसेल तर प्रतिभा अनुभूती वगैरे शब्द निरर्थक ठरतात. कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते.
अंधाराच्या छातीवर बसून म्हणजे अज्ञान घालवण्यासाठी आपण स्वतः प्रकाश यात्री झाले पाहिजे याविषयीचा क्रांतीप्रबंध अण्णाभाऊंच्या साहित्यात आहे. त्यांचे साहित्य म्हणजे पर्यायी जगाचा एक संकल्प आहे.
ज्याप्रमाणे महात्मा फुले यांनी प्रति संस्कृती उभी केली ते सेंद्रिय संस्कृतीचे निर्माते ठरले तसेच अण्णाभाऊ देखील पर्यायी संस्कृतीचे निर्माते आहेत. आजपर्यंत सामाजिक विषमतेच्या दरीत पिचलेल्या, हरलेल्या माणसाला साहित्यामध्ये अण्णाभाऊंनी नायक बनवले आणि त्यांचे साहित्य विषमतेच्या वणव्या विरुद्ध लढा करणाऱ्यांचे जग उभे करणाऱ्यांपैकी एक आहे.
त्यांनी आपल्या साहित्याने तमाशा मध्ये मूल्यांतर केले, तमाशातील नृत्य शृंगार रसाला बदलून शोषक व्यवस्थेवर हसत मात्र चिकित्सक टीका करणारा सोंगाड्या अण्णाभाऊंनी सक्षम बनवला.
तमाशा मधील गण हा कसे कोणास आळवून सुरू होत हे आपणास माहित आहे. परंपरा वादातील सुखकर्ता किंवा पठ्ठे बापूरावांच्या घरामधील सुखकर्ता अण्णाभाऊंना परिस्थितीमुळे दिसला नाही त्यांनी त्याऐवजी क्रांतीला महत्त्व दिले.
“कर त्याचा आम्ही पूजेला
जो व्यापूनी संसाराला
हलवी या भूगोलाला”
भक्ती आणि शक्तीची उत्तम जोड त्यांनी घातली.
रुद्ररुपी ज्याची शक्ती मानवाची करी जो भक्ती तोडून जुलमी श्रंखला हे त्यांच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य होते.
गुलामगिरीच्या या शृंखला सर्वप्रथम तोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी ते लिहितात….
प्रथम मायभूच्या चरणा l
छत्रपती शिवबा चरणा l
स्मरूनी गातो कवना l
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नव्हे तर दलित बहुजन कष्टकरी यांच्या तळहातावर तरली आहे कारण सर्वच कामे करणारा समाज रचनेतील हाच वर्ग होता आणि लाभ घेणारा वर्ग वेगळा होता हे सत्य त्यांनी अधोरेखित केले.
जयंती अथवा पुण्यतिथीच्या निमित्ताने केवळ पुतळे उभारून अथवा पुतळ्यांना हार घालून या थोर महापुरुषांच्या साहित्याचा जागर केला जाऊ नये. तर त्यांचे सर्व साहित्य आम्ही वैचारिक जगात वावरणाऱ्या लोकांच्या संग्रहात आहे का याचा विचार केला पाहिजे.
ज्याचा पुतळा उभारता त्याचा विचार समजून स्वीकारला का आपण करते सुधारक होणार की बोलके सुधारक की सत्य कार्यकर्ते हे जरा पहावे.
अण्णाभाऊंनी एवढे साहित्य निर्माण केले की त्यांच्या नावे साहित्य संमेलन उभे राहिले.
अण्णाभाऊंच्या आणि त्यांच्याविषयी लिहिलेल्या साहित्यकृती वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येते १९६० च्या पूर्वीच्या मराठी समीक्षा विश्वाने अण्णाभाऊंच्या साहित्याची उपेक्षा का केली हे समजत नाही.
२०१४ च्या पाचव्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केलेल्या भाषणातील एक ओळ आपणां समोर ठेवतो.
अण्णाभाऊंनी मराठमोळा मार्क्सवाद उभा केला.
शेळी होऊन शंभर वर्षे जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा हे वाक्य “फकिरा” या कादंबरीत आले आहे सर्वांनी एकत्र या आणि अण्णांच्या साहित्यात वारणेच्या खोऱ्यातही वारणेचा वाघ निर्माण होतो हे समजून घ्या.
गरिबांनी पीडित उपेक्षित समाजाला माणसाला अण्णाभाऊंनी साहित्याचा नायक बनवले.
शब्दांना आकार देणे सोपे असते त्या आकाराला आत्मा देणे अवघड असते म्हणजे त्यात जीव तने त्यापेक्षा अवघड असते तो जीव अण्णाभाऊ कारण माणसाला तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस हा साक्षात्कार अण्णाभाऊंच्या साहित्यातून मिळाला हे त्यांच्या साहित्याचे वेगळेपण आहे.
अण्णाभाऊ यांच्या विषयी ३७ उत्तम दर्जाची संदर्भ ग्रंथ प्रकाशित झाली आहे.
११ संशोधन पर पीएचडी प्रबंध,
१० साहित्य संमेलने,
किमान ५० च्या पुढे साहित्यिक विशेषण, विविध परकीय भाषांमध्ये अनुवाद.
यापेक्षा अण्णांचे मोठेपण कोणते पहा जरा.
अखेरीस मृत्यू कडून जीवनाकडे हा त्यांचा जीवन प्रवास लेखन अपूर्ण राहिला १८ जुलै १९६९ रोजी ते जग सोडून गेले पण साहित्य रूपाने प्रत्येकाच्या हृदयात आजही जिवंत आहेत.
— लेखन : लहू गायकवाड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अप्रतीम सर ! आणा भाऊंचा जिवनपट उत्कृष्ट साकार केलात