इतिहास संशोधक, विचारवंत, लेखक सेतु माधवराव पगडी यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. सेतु माधवराव पगडी यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
एव पोट भरावयाची विद्या l
तयेसी म्हणू नये सदविद्या l
सर्व व्यापक सध्या l
पाविजे ते ज्ञान l
ऐसे जयापाशी ज्ञान l
तोचि जाणावा सज्जन l
तयापाशी समाधान l
पुसिले पाहिजे l
दासबोधा मधील हा श्लोक इतिहास संशोधनांमध्ये सज्जन माणूस कसा असतो हे सांगणारा आहे. या श्लोकाप्रमाणे जीवन जगणारे पंडित सेतू माधवराव पगडी यांचा जन्म २७ ऑगस्ट १९१० रोजी झाला.
महाराष्ट्राचा व मराठीचा ज्ञात इतिहास हजारो वर्षांचा प्राचीन आहे. तो विविध इतिहास ग्रंथ हस्तलिखिते पत्र व्यवहार प्रमाणे वंशावळी काव्य कथा दंतकथा शिलालेख मंदिर आणि मशिदी किल्ल्यांच्या दर्गांच्या रूपातून विखुरलेला आहे. त्या सर्वांचा शोध घेऊन सलग एकात्म स्वरूपात इतिहास सिद्ध करणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे.
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, गोविंद सखाराम सरदेसाई, वासुदेव शास्त्री खरे या प्रभुतींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि क्षण व्यतीत केला तो इतिहास संशोधनासाठी.
भारतीय अस्मितेची तेजस्वी शलाका म्हणजे मराठी भाषा व संस्कृती. ती विझविण्यासाठी दिल्लीश्वरांनी 12व्यां शतका पासून 19 व्या शतकापर्यंत निकराने प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्राने प्रखर प्रतिकार करून आम्हीही सज्ज आहोत असे सिद्ध केले. या प्रखर प्रतिकाराचा इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास होय. त्यातील प्रत्येक घटना प्रसंग, व्यक्ती, घर आणि घराणे यांना आपोआपच अखिल भारतीय स्वरूप प्राप्त होते. ही अखिल भारतीय भावना म्हणजे शिवप्रभूंची हिंदवी स्वराज्याची कल्पना.
स्वराज्य म्हणजे जमीन नांगरण्यापासून पीक घरात येईपर्यंतची हमी देणारी यंत्रणा म्हणजे स्वराज्य आणि ती देणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती. ते टिकविण्यासाठी सतराव्या शतकात अनेक सरदार घराण्यांनी आपल्या जीवनाचा होम केला होता. त्या आदर्शाचा शोध आणि बोध घेण्यासाठी पंडित सेतू माधवराव पगडी यांनी साठ वर्ष अहोरात्र इतिहास संशोधनाचा नंदादीप चालविला. तो तेवत ठेवला अखंड सावधानते बरोबर सतत लेखन, संशोधन, अभ्यास, संचार याच्या आधारावर हैदराबादच्या मूलस्थानापासून मध्य आशियापर्यंत त्यांच्या प्रज्ञाने त्या आदर्शाचे सांगोपांग सूक्ष्म व सर्वगामी निरीक्षण केले.
या सर्वांचे फलित म्हणजे पगडी यांनी त्यांच्या आयुष्यात 66 मराठी, इंग्रजी ग्रंथांची रचना केली. त्यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना समजण्यासाठी एकदा त्यांचे लेखन वाचणे आवश्यक आहे. त्यांचा जन्म सध्याच्या लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे झाला. 1925 मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते
1926 साली उच्च शिक्षणासाठी बनारस येथे गेले.
1928 आणि 1930 मध्ये त्यांनी बीएची पदवी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण केली
1933 मध्ये हैदराबाद राज्यात तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. त्याच साली त्यांचा सुशिलाबाई पुणतांबेकर यांच्याशी विवाह.
1934 मध्ये त्यांची तेलंगणा मधून बदली झाली
1935 पासून कथा आणि निबंध लेखनास प्रारंभ
1939 साली “उषा “हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला.
1943 साली “त्रिलिंग देशाची दैनंदिनी” हा ग्रंथ प्रकाशित झाला. 1947 साली गोंडी कोलाम संस्कृती बोली भाषेचा अभ्यास शब्दसंग्रहकोषरचना व्याकरण, चार इंग्रजी ग्रंथांची रचना त्यांनी केली.
1948 ते 56 हैदराबाद राज्यात शिक्षण खात्याचे संचालक झाले.तर 1951 मध्ये ते औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर. 1953 साली सुफी संप्रदाय हा ग्रंथ प्रकाशित झाला. 1953 मध्ये ते मराठवाडा साहित्य परिषदेच्या हैदराबाद अधिवेशनाचे अध्यक्ष
1953 साली हैदराबाद राज्यातील स्वातंत्र्यसंग्राम या विषयावर इंग्रजीत तीन आणि मराठीत एक ग्रंथ प्रकाशित झाला.
1956 साली त्यांचे मुंबई मध्ये आगमन झाले. 1956 मध्ये शिक्षण खातात ते डेप्युटी सेक्रेटरी झाले. 1957 पासून त्यांनी उर्दू भाषेचा अभ्यास सुरू केला. 1960 ते 68 महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सचिव होते.
मराठ्यांच्या इतिहासासंबंधी फारसी कागदपत्रांचा अभ्यास आणि अनुवाद त्यांनी केला. 1960 ते 70 या काळात उर्दू आणि फारसी भाषेतील 40 ग्रंथांचा त्यांनी मराठी अनुवाद केला. 1974 मध्ये शिवराज्याभिषेकाच्या त्रिशत सामाजिक प्रसंगी रायगडावर इंग्रजी शिवचरित्राचे प्रकाशन केले.
20 ऑगस्ट 1987 रोजी मराठवाडा विद्यापीठाकडून पगडी यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. 6 एप्रिल 1992 रोजी भारत सरकारने पद्मभूषण या पदवीने त्यांना गौरविले.
“जीवनसेतू” हे त्यांचे आत्मचरित्र सर्वांनी वाचावे, असे आहे.
पुणे जिल्ह्यातील पाबल महाविद्यालयातील शिल्पा शेटे यांनी “पगडी यांचे इतिहास लेखनातील योगदान : चिकित्सक अभ्यास” या विषयावर विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केली आहे.
सेतुमाधवराव पगडी हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली.त्यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेले संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे. इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणले.
मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लनेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“, “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ आदी संस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भूषविले आहे.
श्री पगडी यांच्या विषयीचे ग्रंथ समग्र सेतू माधवराव पगडी यांच्या समग्र साहित्य संपादन व प्रस्तावना अशा जोशी द. प जोशी असे आठ खंड आहेत.
त्यातील एका खंडाला डॉक्टर राजा दीक्षित यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. वाचकांनी ती जरूर पहावी.
हे सर्व खंड मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश यांनी प्रसिद्ध केले आहेत. सेतु माधवराव पगडी यांचे १४ ऑक्टोबर १९९४ रोजी निधन झाले.
— लेखन : लहू गायकवाड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
पगडी या विरळा आडनावाचे, सेतू माधवराव असे पदवी वाटावी अशा नावाचे व्यक्ती म्हणजे चालता बोलता इतिहास आहे. त्यांचे समग्र जीवन चरित्र वाचून त्यांचा बद्दलचा आदर वाढला.