Sunday, October 19, 2025
Homeयशकथाथोर इतिहास संशोधक वा. सि. बेंद्रे

थोर इतिहास संशोधक वा. सि. बेंद्रे

महाभारतकार व्यास यांनी असे म्हटले आहे की, “इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे.” ही ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे काम इतिहास संशोधक करत असतात. भारताला तेजस्वी इतिहास आहे कारण भारतात अनेक इतिहास संशोधक आहेत त्यांनी आपले जीवन त्यासाठी खर्ची केले आणि राष्ट्राची ज्योत अखंड तेवत ठेवली. अशा संशोधकांत वा.सी.बेन्द्रे म्हणजेच वासुदेव सीताराम बेंद्रे यांचे नांव अग्रक्रमाने घेतले जाते.

वा.सी.बेन्द्रे यांचा जन्म पुर्वीचा कुलाबा म्हणजेच सध्याच्या रायगड जिल्ह्यातील पेण येथे १३ फेब्रुवारी १८९६ रोजी झाला. वडील सीताराम आणि आई भागिरथीबाई यांनी त्यांना खुप शिकवायचे असे ठरवले परंतु वडिलांचे लवकर निधन झाले. त्यामुळे आईने सर्व जबाबदारी पार पाडली. त्यांचे प्राथमिक शिक्षण पेण येथे तर पुढील शिक्षण मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये झाले.१९१३ साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आंतराष्ट्रीय स्पर्ध्येत ते लघुलेखन (Shorthand) परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाले. त्यांना सुवर्णपदक मिळाले.

बेंद्रे यांचे लग्न बडोदा येथे कमलाबाई पारकर यांच्या बरोबर झाले. त्यांना सात मुली व चार मुले झाली. जास्त शिक्षण झाले नसले तरी तल्लख बुध्दिमत्ता आणि इंग्रजी व मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व यामुळे त्यांना सरकारी नोकरी मिळाली. १९१८ साली बेन्द्रे ‘भारत संशोधक मंडळात’ दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हयातभर स्वतःला महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. त्यांनी महाराष्ट्राचा ‘१७ व्या शतकाचा इतिहास’ हे संशोधनाचे क्षेत्र निवडले. एक साधनसंग्राहक, साधनसंपादक, साधनचिकित्सक, संशोधक व इतिहासकार अशा भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या.

बेंद्रे यांच्या मते इतिहास म्हणजे कादंबरी नाही अथवा नाटक नाही तर इतिहास शास्त्रशुद्ध पध्दतीने पुराव्यांच्या आधार घेऊन लिहिलेला असावा.

वा.सी. बेंद्रे यांची संस्मरणीय कामगिरी:
मुख्य संशोधन करण्यापूर्वी बेंद्रे यांनी १९२८ साली शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड प्रकाशित केला. त्यांचा हा पहिला ग्रंथ संशोधन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या नवोदितांना दीपस्तंभाप्रमाणे वाटेल असा आहे.

@ शिवाजी महाराज यांची जन्म दिनांक यात दुमत होते. बेंद्रे यांनी १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख योग्य असल्याचे जाहीर केले. शासनाने त्यास मान्यता दिली.

@ शिवाजी महाराज यांची तलवार पुर्वी “जगदंब” म्हणून ओळखली जात होती. “भवानी तलवार” म्हणून नाही हे बेंद्रे यांनी पुराव्यानिशी सिध्द केले.

@ मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री खेर यांनी इतिहास संशोधनासाठी बेंद्रे यांना शिष्यवृत्ती देऊन युरोप व इंग्लंड येथे पाठवले.

@ बेंद्रे यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. १९३३ पुर्वी शिवाजी महाराजांचे जे चित्र पुस्तकात प्रसिद्ध होत असे अथवा तसबिरीत लावलेले असायचे ते योग्य नाही असे बेंद्रे यांचे मत होते. त्यांनी पुराव्यानिशी योग्य चित्र शोधून काढले. त्यास शासनासह सर्वांनी मान्यता दिली व शासनाच्या आदेशानुसार सरकारी कार्यालयात नवीन चित्रासह फोटो फ्रेम बदलण्यात आल्या तसेच पुस्तकातील फोटो सुध्दा बदलण्यात आले.

@ संभाजी महाराज यांच्याबाबत चाळीस वर्ष संशोधन करून सर्व पुराव्यानिशी १९५८ साली त्यांनी चरित्र प्रकाशित केले. त्यात संभाजी महाराज पराक्रमी, धोरणी, मुत्सद्दी, स्वाभिमानी, धर्मनिष्ठ होते ह्यावर प्रकाशझोत टाकला.

@ संभाजी महाराज यांची समाधी तुळापूर मध्ये आहे असा पुर्वी समज होता. बेंद्रे यांनी संशोधन करून पुराव्यानिशी “वढू – बद्रुक” येथे आहे हे सिध्द केले.

@ बेंद्रे केवळ इतिहास संशोधक नव्हते तर चतुरस्त्र लेखक होते. त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे, आजोबा मालोजीराजे, शिवाजी महाराज यांचे मोठे भाऊ संभाजी महाराज इत्यादींच्या चरित्रासह इंग्रजी, मराठीत साठ पुस्तके लिहिली आहेत.

@ माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे चरित्र लिहिले. त्यांनी देहूदर्शन, तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांची गुरू परंपरा हे ग्रंथ लिहिले. बेंद्रे यांनी “तुकाराम महाराजांचे अप्रकाशित अभंग” याचे हस्तलिखित तयार केले होते परंतु ते प्रकाशित करू शकले नाही परंतु त्यांचे पुत्र रविंद्र बेंद्रे यांनी २००३ साली प्रकाशित केले.

@ बेंद्रे यांची पुस्तके जगातील नावाजलेल्या वाचनालयात तसेच व्हाइट हाऊस च्या वाचनालयात पाहायला मिळतात.

@ बेंद्रे यांनी विद्यार्थी संघटना, ब्रदरहुड स्काऊट संघटना इत्यादी संघटनाद्वारे सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्याकाळी हुंडाविरोधी मोहीम राबवली.

वा.सी. बेंद्रे

सरकारने इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांची दखल घ्यावी

बेंद्रे यांनी संशोधनासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले तत्कालिन मोठे इंग्रज अधिकारी, मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री खेर तसेच माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे अनेक संशोधन करून ग्रंथ निर्मिती केली त्याबद्दल त्यांना शाब्बासकी जरूर मिळाली परंतु महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान केला नाही.

बेंद्रे यांच्या समवेत काम करत असलेल्या अनेकांची स्मारके बांधली. काही जणांचे पुतळे उभे केले, काहीकांची पोस्टाची तिकिटे प्रकाशित झाली. तर काही जणांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात करण्यात आले. यापैकी बेंद्रे यांना कोणताही सन्मान मिळाला नाही.

रायगड जिल्ह्यातील पेण ही बेंद्रे यांची जन्मभूमी आहे तर पुणे ही कर्मभूमी आहे. मुंबई येथे त्यांचे १६ जुलै १९८६ रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झाले. त्यामुळे पेण, पुणे, मुंबई येथे बेंद्रे यांचे स्मारक उभारावे. त्यांना मरणोत्तर “महाराष्ट्र भुषण” पुरस्कार जाहीर करावा, त्यांचे पोस्टाचे तिकिट प्रकाशित करावे, पुढील पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व महती व्हावी यासाठी त्यांची माहिती असलेला धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करावा, त्यांचे अल्पचरित्र प्रकाशित करून जास्तीत जास्त जणांना वाटावे. गेल्यावर्षी म्हणजे १३ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांची १२५ वी जयंती होऊन गेली. कोणीही त्यांची दाखल घेतली नाही. अजून चौदा वर्षांनंतर म्हणजे २०३६ साली त्यांची पन्नासावी पुण्यतिथी आहे तो पर्यंत इतिहासप्रेमी व्यक्तींनी तसेच इतिहास विषयक संस्थांनी शासनाकडे पाठपुरावा करावा ही अपेक्षा.

दिलीप गडकरी

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप