Wednesday, July 2, 2025
Homeकलाथोर कॅमेरामन पांडुरंग नाईक

थोर कॅमेरामन पांडुरंग नाईक

मुंबई दूरदर्शन केंद्रात मी काम करीत असताना माझे सहकारी असलेले, पुढे गाजलेल्या रामायण मालिकेचे कॅमेरामन म्हणून आजही गौरवित होत असलेले श्री अजित नाईक यांचे वडील, जुन्या काळातील चित्रपट कॅमेरामन श्री पांडुरंग सातू नाईक यांची तिथी नुसार आज ४६ वी पुण्यतिथी आहे.

विशेष म्हणजे श्री अजित नाईक यांचे चिरंजीव श्री सौमित, हे देखील आजचे आघाडीचे कॅमेरामन आहेत. एकाच घरातील तीन पिढ्या नामवंत कॅमेरामन असण्याचे बहुधा हे एकमेव उदाहरण असावे. या निमित्ताने श्री पांडुरंग सातू नाईक यांना आदरांजली अर्पण करतानाच त्यांचा जीवन परिचय जाणून घेणे नक्कीच उद्बोधक ठरेल.

अजित नाईक यांचे चिरंजीव सौमीत,कन्या ऋतुजा व पत्नी मीनल

आज चित्रपटांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे चित्तथरारक, वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग सहजपणे करता येतात.
पण १०० वर्षांपूर्वी चित्रपटांच्या छायाचित्रणात कल्पकता दाखविणारे, विविध प्रकारचे प्रयोग करणारे कॅमेरामन म्हणून श्री पांडुरंग नाईक यांच्याकडे आजही आदराने पाहिले जाते.

श्री पांडुरंग नाईक यांचा जन्म १३ डिसेंबर १८९९ रोजी गोव्यातील म्हार्दोळ येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना छाया चित्रणाचे वेड होते. त्यामुळे अवघे सोळा वर्षांचे असताना ते मायानगरी, मुंबईत १९१५ साली आले. मुंबईत आल्यावर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटसंस्थेत त्यांनी प्रवेश केला. खुद्द दादासाहेब फाळके यांच्या हाताखाली छायाचित्रणाचे प्राथमिक धडे घेण्याचे भाग्य त्यांना लाभले.

पुढे सहायक छायाचित्रकार म्हणून पांडुरंग नाईक यांनी कोहिनूर फिल्म कंपनी, लक्ष्मी प्रॉडक्शन्स व रणजित फिल्म कंपनी इ. संस्थांमध्ये विविध चित्रपटांचे छायाचित्रण केले.

पांडुरंग नाईक यांनी चित्रित केलेला आरती चित्रपट

छायाचित्रणाचे अद्ययावत शिक्षण घेण्यासाठी १९३४ मध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड या देशांत ते वर्षभर राहिले.

परदेशातून आल्यावर श्री नाईक यांनी इंपीरिअल फिल्म कंपनीत प्रवेश केला. तेथे १९३४ सालच्या इंदिरा एम्. ए. या बोलपटाच्या वेळी फळ्या बांधून तेथून प्रकाशयोजना करण्याचा त्यांचा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. आजही तीच पद्धत अनुसरण्यात येते एव्हढी ती मूलभूत ठरली.

१९३६ साली मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांच्या भागीत त्यांनी हंस पिक्चर्सची स्थापना केली. या संस्थेच्या छाया (१९३६), धर्मवीर, प्रेमवीर (१९३७), ब्रह्मचारी, ज्वाला (१९३८), ब्रँडीची बाटली, देवता, सुखाचा शोध (१९३९), अर्धांगी (१९४०) या गाजलेल्या चित्रपटांचे त्यांनीच उत्कृष्ट छायाचित्रण केले. तर १९४० मध्ये आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, विनायक व राजगुरू यांच्या नवयुग फिल्म कंपनीचा लग्न पहावं करून (१९४०) हा चित्रपट त्यांनी चित्रित केला.

रामायण मालिकेचे चित्रण बघताना “राम” अरुण गोविल यांच्या समवेत अजित नाईक.

कोकणच्या पार्श्वभूमीवरील, वि. स. खांडेकर यांचे शब्द सौंदर्य लाभलेल्या १९४१ सालच्या अमृत चित्रपटाचे प्रभावी छायाचित्रण नाईक यांचेच होते.

पुढे १९४२ साली बाबूराव पेंढारकर यांच्या सोबत पांडुरंग नाईक यांनी “न्यू हंस” या चित्रपट संस्थेची स्थापना केली. या संस्थेने पहिला पाळणा, भक्त दामाजी (१९४२) व पैसा बोलतो आहे (१९४३) हे चित्रपट निर्माण केले. अर्थातच या चित्रपटांचे छायाचित्रण नाईकांनीच केले होते.

१९३२ साली परदेशात प्रशिक्षण घेण्यासाठी जाताना पांडुरंग नाईक.समवेत प्रख्यात चित्रपट निर्माते नंदलाल जसबंतलाल व रेकोर्दिस्त सुभेदार

पुढे नाईक यांनी १९४४ साली प्रभात फिल्म कंपनीत प्रवेश केला. तिथे त्यांनी रामशास्त्री (१९४४) व लाखारानी (१९४५) या चित्रपटांचे छायाचित्रण केले. गोयलच्या चिराग कहाँ, रोशनी कहाँ या हिंदी चित्रपटाचे छायाचित्रण त्यांचेच होते. त्यांच्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत चित्रित केलेला हा शेवटचा चित्रपट होता.
तर गोयलचाच ‘दूर की आवाज’ हा त्यांनी चित्रित केलेला पहिला रंगीत चित्रपट होता.

श्री पांडुरंग सातू नाईक यांचे २१ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दादर येथील एका रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे. पण ते पुरेसे वाटत नाही. त्यांच्या स्मरणार्थ एखादे स्मारक किंवा छायाचित्रण संग्रहालय असणे अत्यंत आवश्यक आहे. भावी कॅमेरामन श्री पांडुरंग नाईक यांचे कायम ऋणी राहतील.
त्यांना विनम्र अभिवादन.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. नाविन्यपूर्ण आहे माहिती भर पडली देवेंद्र जी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४