शब्दांनाही कोडं पडावं अस व्यक्तिमत्व असलेले केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार यांचा जन्म १७ सप्टेम्बर १८८५ रोजी पनवेल येथे झाला.
शब्दांना एकत्र गुंफून आपल्या लेखणी, वाणीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. अनेक क्षेत्रांत पारंगत असलेल्या व्यक्तीस अष्टपैलू म्हणतात परंतु प्रबोधनकार थोर विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार, साहित्यिक, भाषातज्ञ, सम्पादक, चित्रकार, अशा विविध भूमिकांत वावरत असल्याने त्यांचे व्यक्तिमत्व बहुरंगी होते. त्यांनी संत तुकाराम, श्यामची आई, या चित्रपटात भूमिका केली होती.
सामजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. अन्याय्य रुढी, परम्परा, जाती -व्यवस्था, अस्पृश्यता निवारण करण्यासाठी वक्तृत्व, लेखन, प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. त्यांची “खरा ब्राम्हण” आणी “टाकलेले पोर” ही दोन नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारक ठरली.
प्रबोधनकार यांनी ध्येय प्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. त्यांच्या लढ्यापासून परावृत करण्यासाठी अनेकांनी प्रयत्नं केला, अनेक आमिषे दाखवली पण प्रबोधनकारांनी कशाला दाद दिली नाही.
प्रबोधनकारांनी सारथी, लोकहितवादी, प्रबोधन हया नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रचार केला. राजर्षी शाहू महाराज यांचे ते निकटवर्ती होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा लढा होता. त्यात त्यांनी प्रल्हाद केशव अत्रे, कॉम्रेड भाई डांगे यांच्या बरोबरीने काम केले. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती, पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. या आंदोलनात त्यांना करावास भोगावा लागला.
कोदंडाचा टणत्कार, भिक्षूकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामण्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्व शास्त्र, या ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई ह्यांची चरित्र लिहिली आहेत. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांचे कार्य पाहिल्यानंतर सहज म्हणावेसे वाटते की,
शब्दांशी नाते तुमचे
शब्दांचे गाणे गाता
जगाची वेदना सारी
शब्दांत मांडून जाता
प्रबोधनकरांनी २० नोव्हेंबर १९७३ रोजी मुम्बई येथे जगाचा निरोप घेतला असला तरी कार्यरुपाने ते अजरामर झाले आहेत.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत-रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800