उल्लेख करण्यासारखे असते त्यास आपण उल्लेखनीय म्हणतो. प्रेक्षण करण्यासारखे स्थळ असते त्यास आपण प्रेक्षणीय स्थळ म्हणतो. याच धर्तीवर, जे दखल घेण्यासारखे आहे, ज्याची दखल घेतली गेली आहे, त्यासाठी मी “दखलणीय” हा नवा शब्द योजत आहे.
आपल्याला कल्पना असेलच आणि नसल्यास आता वाचून येईल, ती म्हणजे मी लिहिलेल्या “माध्यमभूषण” या पुस्तकाचे प्रकाशन विवेक प्रकाशनाचे संपादक श्री रवींद्र गोळे, अमेरिकास्थित ज्येष्ठ अभियंते तथा सामाजिक बांधिलकी मानणारे श्री विनोद बापट, रामायणफेम कॅमेरामन श्री अजित नाईक, दूरदर्शन निर्माती मीना गोखले, लेखक म्हणुन मी (देवेंद्र भुजबळ) आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशनची प्रकाशिका म्हणुन सौ अलका भुजबळ यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची प्रसार माध्यमांतून चांगली दखल घेण्यात आली असून अजूनही घेण्यात येत आहे आणि पुढेही घेण्यात येत राहील, अशी अपेक्षा आहे.

या पुस्तकात जेष्ठ लेखक तथा अनेक मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी राहिलेले पद्मश्री मधु मंगेश कार्णिक, दूरदर्शन संचालक म्हणुन निवृत्त झाल्यावर, गेल्या तीस वर्षांत चाळीस मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये लक्षणीय भूमिका केलेले याकूब सईद, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांंना फक्त चार भिंतीच्या आत न शिकविता, प्रत्यक्ष जीवनात ते सक्षम व्हावेत यासाठी झटणारे प्रो.सुरेश पुरी, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ुट च्या पहिल्या तुकडीचे पदवीधर, गेली पन्नास वर्षे चित्रपट लेखन, दिग्दर्शन करणारे, अनेक पुरस्कार प्राप्त प्रदीप दीक्षित, कल्याण येथील तत्त्वनिष्ठ जेष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, दूरदर्शन च्या वृत्त निवेदिका तथा मराठी भाषा आणि साहित्याच्या अभ्यासक वासंती वर्तक, टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामधून राजकीय संपादक म्हणुन निवृत्त झालेले आणि आता चित्रकार म्हणुन ख्याती मिळविलेले प्रकाश बाळ जोशी, दूरदर्शन निर्मात्या डॉ. किरण चित्रे, जेष्ठ इंग्रजी पत्रकार तथा माध्यम व्यवसायिक बी.एन.कुमार, दूरदर्शन चे निवृत्त उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, लोकसत्तातील निवृत्त मुख्य वार्ताहर तथा सामाजिक प्रश्नाचे अभ्यासक, लेखक मधु कांबळे, कवी तथा आकाशवाणीचे निवृत्त सहायक संचालक डॉ. महेश केळुस्कर, नागपुर येथील अष्टपैलू जेष्ठ पत्रकार अविनाश पाठक, मुक्त इंग्रजी पत्रकार रोनिता टोरकाटो, रामायण फेम कॅमेरामन अजित नाईक, सामाजिक आशयाची छायाचित्रे काढणारे, त्यांची प्रदर्शने भरवणारे डॉ नितिन सोनावणे, नेदरलँड्स मधील मुक्त पत्रकार प्रणिता देशपांडे, नागपुर येथील दैनिकाच्या मालक तथा संपादक शोभा जयपुरकर, महाभारत फेम सहायक संकलक विनय वैराळे, मराठी, हिंदी, गुजराथी माहितीपट, मालिका, चित्रपट संकलक तथा दिग्दर्शक विनोद गणात्रा, चित्रपटांची प्रसिद्धी करणारे सिद्धार्थ कुलकर्णी, संगमनेर येथील दैनिकाचे मालक तथा संपादक किसान हासे, माध्यमांसाठी नियमित लेखन करणारे, जेष्ठ संगणक व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते अमेरिकेतील माधव गोगावले, लेखिका, कवयित्री, दूरचित्रवाणी निवेदिका, सामाजिक कार्यकर्त्यां प्रो. डॉ. सुचिता पाटील, बिग बॉस चा आवाज असलेले, दूरदर्शन चे माजी वृत्त निवेदक रत्नाकर तारदाळकर, एकपात्री कलाकार, लेखिका मेघना साने, महापुरुषांना हार, फुले वाहण्याऐवजी वही, पेन, पुस्तके अर्पण करण्याची चळवळ सुरू करणारे पत्रकार राजू झणके, निवृत्त माहिती अधिकारी तथा पंचाहत्तरीत इंग्रजी वृत्तपत्रांसाठी लेखन करणारे यवतमाळ येथील रणजीत चंदेल, रंगभूशार शिवानी गोंडाळ, अनेक पुरस्कार प्राप्त युवा पत्रकार नितिन बिनेकर, दूरचित्रवाणी निवेदिका तथा मुलाखतकार स्मिता गव्हाणकर, चित्रपट पटकथा लेखिका मर्मबंधा गव्हाणे, सिंगापूर येथील लेखिका नीला बर्वे, ग्रंथाली चे सुदेश हिंगलासपुरकर, लेखिका, कवयित्री मीना घोडविंदे, अमेरिकेतील कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे यांच्या प्रेरणादायी जीवन कथा आहेत.

पुस्तक परीक्षण :
या पुस्तकाचे आटोपशीर परीक्षण लेखिका शुभांगी पासेबंद यांनी केले असून ते पुढे देत आहे.

आस्वाद पुस्तकाचा : माध्यमभूषण
माध्यमभूषण हे पुस्तक देवेंद्र भुजबळ यांनी न्यू स्टोरी पोर्टलवर प्रकाशित झालेल्या लेखनाचे संकलन आहे.
हे पुस्तक ग्रंथाली तर्फे निर्मित असून सौ अलका भुजबळ यांनी प्रकाशित केले आहे. मूल्य चारशे रुपये असून, पृष्ठे 178 आहेत.

माध्यम भूषण हे शीर्षक भूषणावह वाटते. लेखक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदावर काम केलेले, जेष्ठ अधिकारी असून सुरुवातीलाच अर्पण पत्रिकेत ते असं म्हणतात की : ‘अतिशय निष्ठेने माध्यम धर्म पाळणाऱ्या सर्व माध्यमकर्मींना हे पुस्तक अर्पण केले आहे.’
हे पुस्तक वाचनीय आहे. आयुष्यात अनेक विपरित परिस्थितींवर, संकटांवर मात करून पुढे गेलेल्या 36 व्यक्तींबद्दलचे अल्प पण प्रातिनिधिक परिचय या पुस्तकात आहेत. पुस्तकाला सुरुवात आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांच्यापासून होते. आशयामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, वासंती वर्तक, किरण चित्रे, डॉ महेश केळुसकर, मेघना साने, वासंती वर्तक, स्मिता गव्हाणकर, डॉ सुलोचना गवांदे, प्राध्यापिका डॉक्टर सुचिता पाटील आणि अन्य अशा 36 लोकांचे बद्दलचे प्रेरक असे लेख आहेत.
तरुणांना आजकाल आदर्श शोधणे अवघड झालेलं असताना या पुस्तकातील लेख वाचून तरुण प्रेरणा घेऊ शकतात. दिवसेंदिवस नोकरी अथवा व्यवसाय करणे दोन्ही अवघड असताना प्रतिकूल परिस्थितीने तरुणांवर परिणाम होतो. त्यावेळी हे लेख निश्चित प्रेरणा देतील. देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेली विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींची सुबक व्यक्ति चित्रणे या पुस्तकात आहेत.
उपरोक्त परीक्षण हे आता पर्यंत सामना, मुंबई, नवीमुंबई येथील नवे शहर, मराठवाडासाठी, युवा आदर्श, जालना या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

या पुस्तक प्रकाशना बाबत अनेक वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. तर कोकणातील दि म्हसळा टाईम्स या वृत्तपत्राने त्यांच्या तर्फे देण्यात येणार्या पुरस्कारास “माध्यमभूषण‘ हेच नाव दिले असून विशेष म्हणजे या पहिल्या पुरस्काराचे मानकरी देवेंद्र भुजबळ हेच ठरले आहेत.

लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात देवेंद्र भुजबळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या बातम्या देखील अनेक वृत्तपत्रांमध्ये, समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.

उपरोक्त सर्व व्यक्ती, संस्था, प्रसार माध्यमे या सर्वांचे मनापासून आभार.
आपला लोभ असाच कायम असू द्या.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
