शाळा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते मुलांच्या पाठीवर असणाऱ्या दप्तराचे ओझे. अगदी आपणही या ओझ्यातून गेलो आहोत…. उलट दिवसेंदिवस हे ओझे वाढतेच आहे….
कधीतरी मनात येतं, की इतके ओझे घेऊन त्याचा आपल्या खऱ्या आयुष्यात काही उपयोग होतो का ? पण इलाज नाही आणि नसतोही म्हणा…
दप्तराचे ओझे न घेता मुले शाळेत जाऊन करणार तरी काय, असेही वाटते… आपले शैक्षणिक धोरण ही सर्वाना न पटणारेच आहे…. गेली काही वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा इतकी वाढली की, दिवसभर शाळा आणि त्यानंतर परत तितकाच वेळ क्लास यातच मुले अडकलेली दिसतात…. स्वतःसाठी खेळण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो, इतके ते या शिक्षणाच्या ओझ्याखाली दबुन गेले आहेत….
आपण कधी कल्पना केलीय् का, की दप्तराचं ओझॆ न घेता मुलं शाळेत जातील म्हणून…. नाही ना ? पण असा चमत्कार करून दाखवलाय् आमच्या एका मित्राने…. हे स्वप्न त्यानं सत्यात आणले आहे. समीर शेंडे असं या मित्राचं नाव….
वर्ध्येतील समीरने आपल्या शैक्षणिक पद्धतीवर अभ्यास सुरू केला…. लहान मुलांचे खेळण्याचे बागडण्याचे वय लक्षात घेऊन त्याबाबतीत विविध ठिकाणच्या अभ्यास पद्धतीचा अभ्यास त्याने केला, आणि 10 वर्षांपूर्वी वर्ध्येत “शायनिंग स्टार” नावाने शाळा सुरू केली…. शाळेचे नाव ठरवताना ही खूप विचार केलेला पाहायला मिळतो…. शायनिंग स्टार म्हणजे चमकते तारे, म्हणजेच या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी हे भावी काळात चमकणारे तारे असतील, अशी अपेक्षा ठेवून या शाळेचे नामकरण करण्यात आलं…

सुरुवातीला शायनिंग स्टार मध्ये एका वर्गात 10 विद्यार्थी आणि एक शिक्षिका, अशी शाळा सुरू झाली… ही montesari ची सुरुवात होती… प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष्य देता येत असल्यामुळे बघता बघता या शाळेत येणाऱ्या मुलांचा कल वाढू लागला. शाळेत येताना फक्त खाऊच्या डब्याची पिशवी घेऊन शाळेत यायचे… कोणतेही दप्तराचे ओझे नाही. त्यामुळे थोडे कुतूहल ही होतेच….
समीर स्वतः एका चांगल्या शाळेसाठी धडपडत होते… अभ्यास करत होते… त्याचवेळी मारिया मॉंन्टेसरीची मेथड अभ्यासात आली, आणि या वर आधारित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला… त्यासाठी त्यांनी स्वतः त्यांच्या स्टाफला घेऊन हैद्राबाद गाठले… तिथे ट्रेनिंग घेतले….

शाळा सुरू केल्यावर इथे मेमरी बेस एज्युकेशन न करता ब्रेन बेस्ड एज्युकेशनवर विशेष भर दिला गेला…. मुलांमधील सुप्त गुण शोधून त्याला वाव देण्यासाठी प्रयन्त सुरू झाले…. शाळेच्या फलकावर प्रत्येक विद्यार्थी कोणत्या गुणाने पुढे आहे, ते लिहिलेले असते.. अभ्यास ही घेतला जातो… पण कृतीतून घेतला जातो….
याठिकाणी समीर म्हणतात की, मुलांचा पाया चांगला होणे गरजेचे आहे, आणि याच वयात त्यांना चांगले संस्कार देणे ही गरजेचे आहे… नको ते ओझे देण्यापेक्षा त्यांच्या कलांने त्यांच्यातील गुण हेरून त्यांना शिकवले तर ते जास्त फायदेशीर ठरेल.

आज या शाळेत एकूण 250 विद्यार्थी आहेत. तीन प्री स्कुल आणि एक मोठी शाळा जिथे सीबीएससी बोर्डाने पहिली ते बारावी पर्यंतची मान्यता दिली आहे…. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षक लक्ष देत असतात.. त्यामुळे विद्यार्थी ही कंटाळत नाहीत तर पालक ही खूप खुश आहेत….
शायनिंग स्टार चे विद्यार्थी आयुष्यात नक्की चमकणारे तारे ठरतील, असा विश्वास समीर यांनी व्यक्त केला आहे. आजपर्यत अनेक वेळा शासन दरबारी प्रयत्न केले गेले की शाळेतील मुलांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे पण ते तितकेसे शासनाला जमले नाही, पण समीर यांनी आपल्या शाळेच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात आणून दाखवले आहे…. मुलांचं बालपण हिरावून घेऊ नका… त्यांना बहरू द्या, हा संदेश या शाळेने सर्वाना दिला आहे.
समीर स्वतःही राजकीय, सामाजिक चळवळीत सहभागी असतात…. विविध उल्लेखनीय कामांसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासाहित अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे आहे. अशा या शाळेचा शासनानेही आदर्श घेऊन दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयन्त करावा, असे सुचवावेसे वाटते.

— लेखन : मानसी चेऊलकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800