जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिंन 3 मे रोजी साजरा करण्यात येतो.तर राष्ट्रीय पत्रकार दिन 16 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. असे असले तरी हे दोन्ही दिवस साजरे करण्याच्या किती तरी आधी पासून महाराष्ट्र राज्यात 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो आणि याचे कारण म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले आणि त्याचे स्मरण म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद, पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात येतात.
तर परिचय करून घेयु या दर्पण वृत्तपत्र सुरू करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याचा….
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी “दर्पण” हे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित करून त्यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला. खरं म्हणजे भारतात पहिले वृत्तपत्र जेम्स ऑगस्टस हिकि या इंग्रजाने 29 जानेवारी 1780 रोजी सुरू केले होते. बेंगाल गॅझेट असे त्या इंग्रजी वृत्तपत्राचे नाव होते. त्या नंतर तब्बल 52 वर्षांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र सुरू केले.
भारतात इंग्रजांच्या आगमनानंतर आधुनिक शास्त्रांशी नाते जुळलेली विद्वानांची पहिली पिढी पुढे आली. त्या पिढीचेच प्रतिनिधित्व बाळशास्त्री जांभेकर करत होते.
ज्ञानाच्या अनेक शाखा अनेक भाषांतून अवगत आहेत आणि मानवाच्या भौतिक प्रगतीसाठी या ज्ञानाने संपन्न होणे गरजेचे आहे; हे त्या पिढीला उमगू लागले होते.
इंग्रजीचा प्रसार हा फक्त राज्यकर्त्यांच्या माध्यमातूनच होत नव्हता तर तो ख्रिस्ती धर्म प्रसारकांच्या माध्यमातूनही होत होता. त्यामुळे ख्रिस्ती धर्माचे गुणगान गाताना येथील समाज, त्यातील बर्या वाईट चाली रिती आणि अनिष्ट समजुती आणि प्रथा यावर होणारे हल्ले या नव शिक्षितांच्या दृष्टीस येत होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाऊन नव्याने विचार करणार्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी होते.
बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म कोकणातील देवगड जवळील पोंभुर्ले या गावी १८१२ साली झाला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ते आधुनिक शिक्षणासाठी मुंबईत आले. त्यांनी इंग्रजीचा अभ्यास सुरू केला. बाळशास्त्रींना एकूण ९ भाषा अवगत होत्या. अवघ्या १८ व्या वर्षी बापूशास्त्री छत्रे यांच्या आश्रयाने त्यांनी विद्याभ्यास पूर्ण केला. बाळशास्त्रींची हेंदवी शाळा पुस्तक मंडळाचे भारतीय सचिव म्हणून नेमणूक झाली.
बाळशास्त्रीनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी म्हणजेच १८३१ साली ग्रंथ लेखनास आरंभ केला. वयाच्या २०व्या वर्षीच मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे “दर्पण” वृत्तपत्र सुरू केले.
बाळशास्त्रींना बंगालीही अवगत असल्याने त्यांच्यावर बंगालमधील सामाजिक चळवळींचा प्रभाव होता. दर्पण हे तसे दोन भाषिक वृत्तपत्र होते. त्यात मराठी मजकूर असला तरी त्याच्या शेजारी इंग्रजीतही मजकूर प्रकाशित होत असे. सुरुवातीस पाक्षिक स्वरूपात प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र वाचकांच्या आग्रहामुळे चारच महिन्यांत साप्ताहिक झाले आणि दर आठवड्यास प्रकाशित होऊ लागले.
दर्पण नाव निवडण्यामागे बंगालमध्ये प्रकाशित होणार्या समाचार दर्पण चा प्रभाव असण्याची शक्यता आहे.
दर्पणचा उद्देश पाश्चात्त्य विचाराची गोडी मराठी समाजास लागावी, समृद्धी आणि स्वकल्याण या संबंधी विचार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, सामाजिक सुधारणांवर विचार मंथन व्हावे हा होता.
सामाजिक सुधारणांसंबंधी आग्रही असलेले दर्पण वाचकांचे स्वातंत्र्यही तेवढेच महत्त्वाचे मानत असे. त्यामुळे संपादकीय धोरण आणि विचार या विरोधातील मतांनाही त्यात योग्य स्थान मिळत होते. संपादकीय चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे मोठेपणही दर्पणकारांकडे होते, हे त्याचे लक्षणीय वैशिष्ट्य होते.
इंग्रजी विद्यांचा विचार करताना भारतीय विद्या आणि विद्वत्तेचा रास्त अभिमानही दर्पण बाळगत होते. बुद्धिमत्ता आणि विचारशक्ती ही इंग्रजांची मक्तेदारी नाही, यावर दर्पणकारांचा विश्वास होता.
दर्पणचा खप त्या काळात ३०० प्रतींच्या जवळपास होता. १८४० मध्ये मराठी साक्षरांमध्ये लोकप्रिय झालेले दर्पण अनाकलनियरित्या बंद करण्यात येऊन युनायटेड सर्व्हिस गॅझेट मध्ये विलीन करण्यात आले. उण्यापुर्या ८ वर्षांत आपली छाप उठवून दर्पण अंतर्धान पावले. पाठोपाठ १७ मे १८४६ रोजी दर्पणकारांचे निधन झाले. अल्पायुषी असूनही त्यांनी केलेले कार्य आजही आपल्याला दिशा देत आहे, यावरूनच त्यांची थोरवी दिसून येते. अशा या थोर देश भक्तास,मराठी वृत्तपत्र सृष्टीच्या जनकास भावपूर्ण श्रद्धांजली.
— लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.