Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यदसरा : काही कविता

दसरा : काही कविता

१. अंबा माता

जय जगदीश्वरी माता सरस्वती
माता भगवती जन पूजा करती ।।धृ।।

चंद्रबिंबा सम वदन साजिरे
गळ्यात माळा मुगुट शिरा वरती ।।1।।

श्वेत वसन कमला सम सुंदर
चतुर्भुजा शोभे बैसे मयूरा वरती ।।2।।

ब्रह्माची शक्ती माता नारदा शोभसी
देवादिक वंदिती तू विद्या दाती ।।3।।

वीणा हाती धारी वादन करिसी
काश्मिराज्ञी कला देवता देसी स्फुर्ती ।।4।।

अरुण गांगल

— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड

२. दसरा

मातेच्या भक्तिभावाचे
नऊ दिवस नवरात्रीचे
भजन, पूजन मनोभावे
तेजोमय जगदात्रीचे.

दशमीचा दिन कीर्तीचा
मुहूर्त सुवर्णयोग
पूजन लक्ष्मी सरस्वती
सरती मागचे भोग.

शस्त्रपूजा पाटीपूजन
दर्शन संस्कृती परंपरेचे
दृष्कृत्याचा रावण जाळून
लुटावे सोने सद्विचारांचे.

दुषप्रवृत्ती व्हावा नाश
अहंकाररूपी ‘मी’ दहन
सत्कर्माचे मंगल तोरण
हेच सारे दसरा पूजन….

भाग्यश्री खुटाळे

— रचना : भाग्यश्री खुटाळे. फलटण

३. सीमोल्लंघन

पुरे झाले एकतर्फी संबंध हे सलोख्याचे
सीमेवरले सुरुंग आता उडवूनि लावायचे
किती काढितो कुरापती
अन् माजवी हिंसाचार
दांभिकतेने तरी म्हणतसे
स्वच्छच मम आचार
किती घ्यायचे नमते आम्ही मवाळ किती व्हायचे //1//

सीमेवरले——
इतिहासाच्या पानोपानी
सुवर्णाक्षरे लिहिते झरणी
अन्यायावर न्याय्य तोडगा
साम दाम दंडचि असे गा
संयमाची ही सीमा सुटता भेदच आतां करायचे //2//

सीमेवरले——
प्रांत आमुचा प्रसिध्द काश्मीर खोरे लावण्याचे दुर्दैवाने तिथे पेरले
बी दहशतवादाचे
केशरमळ्यात रुधिर आतां शत्रूचे सांडायचे //3//

सीमेवरले—–
रामाचा वनवास संपला
अज्ञातवासी पार्थ प्रगटला
डिवचलेल्या नागासम
फुत्कार टाकीत डसायचे
अस्त्र शस्त्र सज्ज होऊनि सीमोल्लंघन करायचे //4//

स्वाती दामले

— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. दसरा निमित्ताने सुंदर कविता

    वाचनानंद झाला.

    गोविंद पाटील सर जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments