दलितमित्र राजा जाधव यांच्या “दादर ते दादर” या चरित्रग्रंथाचे प्रकाशन नुकतेच आमदार कालिदास कोळंबकर, लोकमान्य टिळक सायन रुग्णालयाच्या माजी डीन, बालरोग तज्ञ डॉ. माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते मुंबईत झाले. ग्रंथाली तर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे लेखन दादासाहेब दापोलीकर यांनी केले आहे.
राजाभाऊ जाधव यांनी वसई, नालासोपारा परिसरात केलेल्या समाजसेवेचा अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
प्रतिथयश लेखक सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी पुस्तकाच्या चरित्र नायकाच्या आयुष्यातील काही उल्लेखनीय घटनांचा आढावा घेतला. ‘यशस्वी बांधकाम व्यावसायिक, ग्रंथालय निर्माता, वास्तुसंग्रहालय निर्माता, क्रीडापटू, रिक्षासंघटक, सुलेखनकार, स्वच्छ राजकारणपटू, आदी नाना भूमिका उत्तुंगपणे जगणारे राजाभाऊ जाधव, सामाजिक दुर्घटनांवेळी नेहमीच मदत तत्पर राहिले. दानशूरतेची कमाल दाखवताना मोठा जनसंग्रह करत गेले’ असे गौरवोद्गार सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी काढले. कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या राजाभाऊंचे सदर चरित्र समाजाला कार्यप्रवण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दादासाहेब दापोलीकरांनी या पुस्तक निर्मितीमागील भूमिका विशद केली. ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर यांनी ग्रंथालीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800