Thursday, July 3, 2025
Homeलेखदामू ... साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा.

दामू … साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा.

  1. थोर स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते मामासाहेब कुलकर्णी यांची काल, ३ ऑक्टोबर रोजी १० वी पुण्यतिथी होती. त्या निमित्ताने त्यांच्या कन्या, स्वतः सामाजिक कार्यकर्त्या, आशा कुलकर्णी यांनी जागविलेल्या या काही आठवणी…..

“मामा स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ असल्यासारखे बालगंधर्व संगीत सभेच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातीने सर्व रसिकांचे सहर्ष स्वागत करतात” पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या मेहफिलीची सुरुवात करून देतांना प्रस्तावनेत पु.ल.देशपांडे उर्फ भाई मामांचं आणि त्यांच्या नियोजन कौशल्याचं कौतुक करत होते.

पु. लं. चं हे कौतुक अनाठाई नव्हतं ! कामाचा उरक, ध्येयसिद्धीसाठी परिश्रम, तल्लख बुद्धी, विनयशीलता, सहनशिलता, इतरांबद्दल आदरभाव या गुणांबरोबरच सात्विक विचार-आचार मिळून तयार झालेलं अजब रसायन म्हणजे माझे वडील, स्वातंत्र्य सैनिक दामोदर बळवंत तथा मामासाहेब कुलकर्णी ! अर्थात  “दामू … साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा” ३ ऑक्टोबर रोजी त्यांचा १० वा स्मृतिदिन. वयाच्या ९९ व्या वर्षी हृदय क्रिया बंद पडून ३ ऑक्टोबर २०११ रोजी त्यांचे निधन झाले. शारीरिक शक्ती जरी क्षीण झाली होती तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ते शेवटपर्यंत कार्यरत होते.

जन्म जळगांव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील लासगाव या छोटयाशा गावांत झाला. दिड वर्षाचे असतानाच आईचे छत्र हरपले. वडिलांची नोकरी फिरतीची म्हणून अंमळनेरला प्रताप हायस्कुलमध्ये वडिलांनी मुख्याध्यापक गोखले गुरुजींवर मुलाची जबाबदारी सोपवली. परंतु तेव्हा छत्रालयांत जागा नसल्याने जवळ जवळ दिड ते दोन वर्षे माधुकरी मागून आणि वार लावून जेवावे लागे. वार नसे तेंव्हा उपास घडे.

सुप्रसिद्ध भिडे वकिलांच्या बंगल्याच्या व्हरांड्यामध्ये रात्री झोपायची सोय झाली. बदल्यात त्यांच्या घरचे व कार्यालयाचे पडेल ते काम करावे लागे. नंतर छात्रालयात जागा मिळाली, व जेवणघरात वाढप्याचे कामही मिळाले. त्यामुळे राहायला जागा, जेवण व शिक्षण या सर्व गोष्टींची सोय झाली. आयुष्यातील सुवर्ण योग म्हणजे, छात्रालयात जी खोली मिळाली ती रेक्टरच्या खोली शेजारचीच आणि रेक्टर होते साक्षात “सानेगुरुजी” !

तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. लढ्याला बऱ्यापैकी वेग आला होता. जनसामान्यात वणवा पेटला होता. स्वातंत्र्याच्या कल्पनेने, देशप्रेमाने, राष्ट्रांभिमानाने पेटलेले शिक्षकगण विद्यार्थ्याना इंग्रजांविरुद्ध लहान सहान कुरापती करायला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहनच देत होते. प्रताप हायस्कुलच्या कौलारू इमारतीवर काही विद्यार्थ्यानी तिरंगा फडकावला. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी वाऱ्यासारखी पसरली. तिरंगा डौलाने शाळेच्या मुख्य इमारतीवर फडकत होता. स्वातंत्र्यप्रेमी तिरंग्याला सलाम करायला शाळेबाहेर जमू लागले. इंग्रज सार्जंट आले, चौकशी सुरु झाली. कोणी तिरंगा शाळेवर लावला. मुख्याध्यापकांपासून सर्वांनीच अनभिज्ञता दर्शवली. इंग्रजांचा जळफळाट झाला. एका पोलिसांनी तिरंगा खाली उतरवला. सार्जंट थयथयाट करत आला तसाच परत गेला. विद्यार्थ्यांमध्ये कुजबुज सुरु झाली ! सर्वांनाच ठाऊक होते की तिरंगा फडकावण्याचे काम अत्यंत चपळ आणि खिलाडूवृत्तीच्या दामूचेच ! परंतु कोणी चुगली केली नाही. असा राष्ट्राभिमानी आणि तिरंग्यासाठी जीवावर उदार झालेला “दामू” !

दामोदर – नादारीवर शिकणारा गरीब मुलगा, बुद्धिमान, एकपाठी, खिलाडूवृत्ती या गुणांमुळे शिक्षक वर्गात आवडता विद्यार्थी, साने गुरुजींचा विशेष लाडका ! प्रेमाने गुरुजी त्याला “दामू” म्हणत. गुरुजींनी दामूवर आईच्या मायेची पाखर घातली. त्याच्यावर शिस्तीचे संस्कार केले. देशभक्तीचे बाळकडू पाजले. वय वर्ष १२ ते १५ अशा अत्यंत संस्कारक्षम वयात प्रत्यक्ष साने गुरुजींचा निकट सहवास आणि त्यांनी केलेले अनमोल संस्कार यामुळे दामूचे आयुष्य घडले.

साने गुरुजींनी आदर्शवाद त्याच्यात ठासून भरला. १९३४ साली मॅट्रिक झाल्यानंतर शिक्षणाबरोबर दामोदरने शाळा आणि महाविद्यालयात नोकरी केली, केवळ स्वातंत्र्य लढ्याला मदत करण्याच्या उद्देशाने ! पगाराचे २५ रुपये मिळत, दोन रुपये खाणावळीसाठी ठेऊन उरलेले २३ रुपये तुरुंगात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या घरी जाऊन दिली जात असे. असा हा आदर्शवादी उपक्रम १९३४ ते १९३९ अशी ६ वर्षे सातत्याने राबवला, नंतर विवाहामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या.

१९४२ ते १९४७ दरम्यान साने गुरुजी ब्रिटिश सरकारच्या ससेमिऱ्या पासून वाचण्यासाठी भूमिगत झाले, आणि वेशांतर करून वणवण करीत असत, अशा कठीण काळात मामासाहेब आणि पत्नी राधाबाई दोघांनीं धोका पत्करून गुरुजींची जबाबदारी घेतली. आपल्या घरात त्यांना आश्रय दिला. प्रसंगी त्यांना रात्री अपरात्री पलंगाखाली शिताफीने लपवले. त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली. त्या मंतरलेल्या काळातील आई वडिलांनी सांगितलेल्या अनंत आठवणी आजही माझ्या मनांत रुंजी घालतात, आणि त्यांचं स्वातंत्र्य प्रेम व देशभक्ती आठवून धन्य वाटतं !

वयाच्या १२ व्या वर्षी मिळालेली साने गुरुजींची अनमोल साथ मामांनी शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दार अस्पृशांना खुले करण्यासाठी केलेल्या उपोषणाचा प्रसंग असो की कामगारांसाठीचा लढा असो, अगदी “साधना” प्रकाशनाच्या स्थापने पर्यंत गुरुजींच्या प्रत्येक कार्यात मामासाहेब अग्रभागी असत.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परिवाराच्या उपजीविकेसाठी व्यवस्थापन क्षेत्रात शासकीय व खाजगी कार्यालयात मामांनी सेवा दिली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्थापने पूर्वीच मामा या विभागात कार्यरत होते. महामंडळाची घटना व स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते. समाजोन्नतीचे विचार त्यांच्या रोमारोमात भिनले होते. मामांनी एस.टी. सहकारी बँकेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. आज या बँकेची प्रत्येक जिल्ह्यात शाखा आहे.

एस. टी. च्या चालक आणि वाहकांच्या सोयीसाठी एस. टी. कोऑपरेटिव्ह कँटीन ची स्थापना मामांनी केली. कामगारांशी तसेच कामगार नेत्यांशी चर्चा-विचार विनिमय करून अनेक संप टाळण्याचे श्रेयही मामांच्या अंगभूत गुणांमुळे त्यांना मिळाले. प्रसंगी संप काळात त्यांना देऊ केलेले पोलीस संरक्षण त्यांनी नाकारले होते.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर साने गुरुजींबरोबर मामाही मुंबईत आले. सुरुवातीला १९४७ ते १९५६ गोरेगांवला शासकीय वसाहतीत राहिले. नंतर विलेपार्ल्यात आले. तेही बाबुराव परांजपे यांच्या विनंतीवरून ! बाबुरावांनी विलेपार्ल्यात सहकारी सहनिवासांचे निर्माण केले. परंतु त्यांना नुसत्या इमारती उभारायच्या नव्हत्या तर त्या इमारतीत ध्येयवादी व परोपकारी माणसांनी राहायला यावे आणि विलेपार्ल्याचे सामाजिक सांस्कृतिक जीवन समृद्ध करावे हा त्यांचा उदात्त उद्देश होता.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी निस्वार्थी स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्यांच्या वृद्धापकाळाची सोय म्हणून विलेपार्ले येथील जुहू डेव्हलोपमेंट स्कीम मध्ये ३५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे पांच प्लॉट राखीव ठेवले होते. त्यांचा आग्रह होता कि मामांनी एका प्लॉटचा स्वीकार करावा. परंतु मामांनी अतिशय नम्रपणे व स्पष्ट नकार दिला. आपल्या मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी घेतलेल्या कष्टांचा मोबदला घेणे त्यांना मान्य नव्हते. राष्ट्रभक्तीचे बीज रुजवणाऱ्या त्यांच्या साने गुरूजींच्या पुण्यस्मृतीला कलंक लावण्यासारखे होते. मामांनी ना कधी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे निवृत्ती वेतन स्वीकारले ना कधी सवलतींचा लाभ घेतला. निर्व्याज, निस्पृह सामाजिक कार्याचा वसाच गुरुजींनी मामांना दिला होता. हि घटना बाबुरावांच्या कानावर पडली आणि त्यांनी मामांना विष्णूप्रसाद सोसायटीत फ्लॅट घेऊन पार्लेकर होण्याचे निमंत्रण दिले, आणि आमचा परिवार पार्लेकर झाला.

विलेपार्ल्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मामांचे ५० वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान आहे. सुरुवातीच्या १२ ते १५ वर्षांच्या काळात लोकमान्य सेवा संघात मामांनी कार्यकारिणी तसेच पदांवर कार्य केले. त्यांच्या लोकसंग्रहाचा संघाला अनेक कामात लाभ झाला. मामांच्या पुढाकाराने वैद्यकीय शाखा तसेच नागरिक दक्षता शाखा अशा दोन नवीन शाखा सुरु झाल्या. महापालिकेशी त्यांचा असलेला संपर्क व आयुक्तांशी असलेल्या वैयक्तिक परिचयामुळे लसीकरण मोहिमेची मुहूर्तमेढ रचण्याचे श्रेय मामांकडे जाते.

आपल्या बाळाला लसीकरणासाठी घेऊन या अशी कळकळीची विनंती त्यांनी घराघरात जाऊन केली. लोकशाहीत निवडणुका अपरिहार्य असतात. त्या लढतांना यशाभिलाषा इतर सर्व गोष्टींवर मात करण्याचा धोका असतो. अशावेळी “मतदाता प्रशिक्षण” आणि “निवडणूक व्यवहारावर करडी नजर” ही दोन्ही कामे नागरिक दक्षता शाखेकडून व्हावी अशी त्यांची कल्पना होती. ती काही प्रमाणात सत्यात उतरली. यासाठी गोरेगावच्या वास्तव्यात सुरुवातीला केलेल्या कार्याचा अनुभव आणि जनसंपर्क त्यांना उपयोगी पडला.

१९७१-७२ दरम्यान चौथ्या लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याचा पार्लेकरांचा प्रस्ताव मामांनी नम्रपणे आणि ठामपणे नाकारला होता. परंतु आकाशवाणीवरून राजकीय नेत्यांची प्रचाराची भाषणे तपासून अनुमती देण्याचे काम करण्यासाठी शासनाने त्यांची नेमणूक केली. यासाठी मामांचा निःपक्षपातीपणाचा गुणच कारणीभूत होता. अतिशय जबाबदारीने हि नेमणूक स्वीकारून मामांनी निभावली सुद्धा !

तसेच त्यांनी अनेक शासकीय समित्यांवर अतिशय जबाबदारीची पदे भूषविली आणि उल्लेखनीय योगदानही दिले.

विलेपार्ल्याच्या सांस्कृतिक जडण घडणीत मामांचेही मोलाचे योगदान आहे. शास्त्रीय संगीत विशेषतः नाट्य संगीताची आवड असणाऱ्या मामांनी पुढाकार घेऊन बालगंधर्वांच्या निधनानंतर १५ ऑगस्ट १९६७ रोजी बालगंधर्व संगीत सभा स्थापन केली. उद्देश होता रसिकांना अल्पखर्चात गायन-वादनाचे उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकायला मिळावे आणि शास्त्रशुद्ध संगीत कलेचा प्रचार प्रसार जनसामान्यांपर्यंत पोचावा. जवळ जवळ २७ वर्षे प्रतिवर्षी ४ ते ६ कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले. पु.ल.देशपांडे बहुतेक कार्यक्रमांना हजर असायचे.

कंठसंगीतात म्हणजेच गायनात पं. मल्लिकार्जुन मन्सूर, उस्ताद आमिर खान, आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी पासून तर वादनात उस्ताद बिस्मिल्ला खान, पं. रवी शंकर,ते उस्ताद अल्लारखा पर्यंत सर्व दिग्गज कलावंतांनी आपली कला सादर करून पार्लेकरांना आनंद दिला. अनेक वर्ष मे महिन्यात नाट्यसंगीत स्पर्धा आयोजित केल्या जात, ज्या खूपच लोकप्रिय झाल्या होत्या.

त्या काळात विलेपार्ले रेल्वे स्टेशनसमोर मोर बंगला कंपाऊड मध्ये दरवर्षी विविध नाटक कंपन्या एकत्र येऊन आठ दिवसांचा नाट्यमहोत्सव आयोजित होत असे. त्यातही मामांनी मोठी भूमिका बजावली. आज त्या जागेवर जे नाट्यगृह महापालिकेने उभे केले आहे त्याचा मूळ प्रस्ताव आयुक्तांकडे मामांनी सादर केला होता आणि बरच वर्ष प्रत्यक्ष पाठपुरावा केला हे फार थोड्या लोकांना माहित आहे.

पुढे १९७३ साली निवृत्ती नंतर एका वेगळ्या विषयावर अतिशय गंभीर विचार करून संस्था स्थापन केली ती म्हणजे “हुंडाविरोधी चळवळ” ! हुंडा प्रतिबंधक कायदा पारित करून १० ते १२ वर्ष उलटूनही हुंडाबळींचे प्रमाण कमी होत नव्हते. महिलांवर होणारे अत्याचार दिवसे दिवस वाढतच होते. म्हणून मामांनी तरुण पिढीला हाताशी धरून तरुणांमध्ये जाणीव जागृतीचे कार्यक्रम आयोजित करणे सुरु केले. झंझावाती दौरे काढले. महाराष्ट्र तर अक्षरशः पिंजून काढला. राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश, दक्षिणेला कर्नाटक सारख्या राज्यांतही विद्यापीठे, बार कौन्सिल, महाविद्यालये व इतर संस्थामधून हुंडा प्रथे विरोधात ५००० हुन अधिक जाणीव जागृतीचे कार्यक्रम यशस्वी केले.

शिक्षण क्षेत्रातील मामांचे कार्य सुध्दा फार मोलाचे होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात विधिसभेवर राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून मामांनी १० वर्षे सक्रिय योगदान दिले. या काळात कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील एकूण एक महाविद्यालयात अतिथी व्याख्याता या नात्याने काम केले. तसेच जळगांव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न जळगांव, धुळे, व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतून “साने गुरुजी विचार यात्रेत” “गुरुजींचे जीवन आणि त्यांची माणुसकीची शिकवण” या विषयावर व्याख्याने दिली. या यात्रेचे आयोजन विद्यापीठाने केले होते. मुंबई, नागपूर, गोवा, अमरावती विद्यापीठाच्या काही समित्यांवर मोलाचे योगदान दिले आहे.

साने गुरुजींचे विचार आणि त्यांचे संस्कार मामा अक्षरशः जगले. समाजोन्नतीसाठी त्यांची तळमळ विलक्षण होती. “हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले” या गुरुजींच्या पंक्ती मामांच्या रक्तात अगदी भिनल्या होत्या. “स्वधर्म निधनं श्रेयः” अर्थात आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करतांनाच मृत्यू या वचनाप्रमाणे जीवनाचा शेवट होणे फार थोड्या व्यक्तींच्या भाग्यात असते. त्या भाग्यवंतांमध्ये मामांचा समावेश करावा लागेल.

सामाजिक संस्थांतर्फे तसेच शासनातर्फे मामांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. परंतु त्यांच्या सामाजिक कार्याचा खरा गौरव शासनाने केला, तो १५ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात ! मामासाहेबांच्या निवासस्थाना बाहेरच्या चौकाला “स्वातंत्र्य सैनिक मामासाहेब कुलकर्णी चौक” असे नामकरण करून !

आशा कुलकर्णी

– लेखन : आशा कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मामासाहेबांच्या सुकन्या आशाताईंनी मामासाहेबांच्या जीवनावर लिहिलेला लेख अत्यंत प्रेरणादायक आहे. मी काटोल जि.नागपूर येथील महाविद्यालयात प्राचार्य असतांना मामासाहेबांचे अनेक कार्यक्रम घेतले. त्यांच्या पावन चरणस्पर्शाने आमचे घर पवित्र झाले, ही माझ्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात साने गुरुजी दडले होते. आशाताई त्यांचे कार्य नेटाने पुढे नेत आहेत,ही अत्यंत आनंददायक बाब आहे🙏 डॉ.केशव भांडारकर, नागपूर

  2. “दामू” आशा कुलकर्णी लिखीत लेख, प्रेरणादायी आहे. अशी धडपडणारी व्यक्ती, निस्वार्थी पणाचे व्यक्तिमत्व, अभिमानास्पद आहे. आदरणीय मामासाहेब कुलकर्णी यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या अगणित कार्याच्या तळमळीस मानाचा मुजरा!🙏

    सौ. वर्षा म. भाबल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments