दाह वाट्याला तो किती वेळा येतो
नको ते जीवन करूनी तो जातो
वस्त्रे फेडिता द्रौपदीची सभेत
पेटवून अंग जाळूनी टाकतो…
सुतपुत्र तुला अधिकार नाही
वाणी कर्णाला ती कापतच जाई
कवचकुंडले उदार तो दाता
अधोमुख तेथे पहा उभा होता….
अंधपुत्र आला नशिबात तिच्या
पट्टी लावूनी ती नेत्री गांधारीच्या
उभे आयुष्य दाहात भाजले
अग्नीतच स्वाहा शेवटी ते झाले..
नाकारती द्रोण एकलव्या जेव्हा
बाणांनी ती बद्ध श्वानाची केली जिव्हा
नसेल का दाह ? अंतरंगी त्याच्या
गुरू मानिले बद्ध होती वाचा…
अंबेचा तो शाप बाधला भिष्मांना
शिखंडी बनूनी सामोरी ठाकला
शरपंजरी ती पहुडली काया
दाह शमविण्या आयुष्य ते “जाया”…
दाह जाळतो वृक्षाची ती काया
कडाडता वीज कोळसाच व्हाया
उद्वस्त करतो दाह तो समूळ
नाही जातपात पहात तो कूळ ..

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुमती ताई मनापासून धन्यवाद शेयर केल्या बद्दल