सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पद्मश्री,
‘मधु मंगेश कर्णिक’ यांच्या समग्र साहित्यावर ४५ आस्वादकांनी लिहिलेल्या ५२ लेखांच्या ‘मधुबन‘ या दिमाखदार पुस्तकाचं प्रकाशन नव्वदी पार केलेले खुद्द श्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत लेखक प्रा प्रवीण दवणे यांच्या हस्ते नुकतेच ठाणे येथे झाले. कोमसाप ठाणे शाखेच्या अध्यक्षा मेघना साने यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
मधुभाईंनी या संपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत “कोमसापच्या सर्व लेखकांनी हे वाड्मयीन कार्य हाती घेऊन यशस्वी केले, याचा आपल्याला खूप आनंद झालाय” असे सांगत मेघनाताई व साऱ्या आस्वादक लेखकांना धन्यवाद दिले.
प्रा. प्रवीण दवणे यांनी “सरस्वतीने वीणावादन करावं असे लेखन केलेल्या मधुभाईंना त्यांच्या चाहत्यांनी दिलेला हा ‘मानाचा मुजरा’ आहे, मधुभाईंचं साहित्य हे समाजाला दिशा देणारं साहित्य असून ते प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आहे” असे सांगत, प्रत्येक लेखाचं वैशिष्ट्य उलगडून दाखवलं.
कोमसापच्या केंद्रीय कार्याध्यक्ष, श्रीमती नमिता कीर यांनी या पुस्तकाने नवोदितांना आत्मविश्वास दिला असे सांगितले.
तर मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षा, सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका, वासंती वर्तक यांनी “या पुस्तकामुळे मधुभाईंच्या खात्यावर मोठा आनंद जमा झालाय” असे गौरवोद्गार काढले. प्रकाशक विवेक मेहेत्रे यांनी, “‘मधुबन’ होणे हे कृष्णाने गोवर्धन उचलण्यासारखे आहे” असे आपल्या मनोगतातून सांगितले.सध्या प्रतिकूल परिस्थिती असतानाही सगळ्या लेखकांनी उत्तम सहकार्य केलं, असे संपादक मेघना साने यांनी यावेळी सांगितले.
मधुभाईंच्या शुभेच्छा पत्राचे वाचन प्रा. प्रतिभा सराफ यांनी केले.
या वेळी मधुभाईंना श्री. विनोद पितळे यांनी, मधुभाईंवर केलेल्या कवितेची फ्रेम व सन्मानचिन्ह भेट देण्यात आले. मधुबनच्या लेखकांना पुस्तके देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
गायक श्री हेमंत साने यांनी मधू मंगेश कर्णिक लिखित ‘शब्दांनो मागुती या’ या कविता संग्रहातील ‘मी कळ्यांचे देठ झालो’ ही कविता स्वरबद्ध करून स्वतः सादर केली. त्यांच्या मधूर स्वरांनी वातावरण भारून गेले आणि कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला. हे सारं पाहून मधुभाईंचे भरलेले डोळे शब्दांपेक्षा अधिक बोलके होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन साधना ठाकूर, संगीता कुलकर्णी आणि प्रतिक्षा बोर्डे यांनी केले.
यावेळी विविध मान्यवर, रसिक उपस्थित होते.
– टीम एनएसटी, 9869484800.
‘मधुबन’चे प्रकाशन उत्तम झाले आणि ग्रंथही चांगला झाला आहे!