Sunday, July 6, 2025
Homeलेखदिवा

दिवा

लहानपणापासून शुभंकरोती म्हणता म्हणता ‘दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार’ असे शब्द आले की दिव्याचे आपल्या जीवनात किती त-हेचे महत्व आहे हे कळून येते.

साधं आपण एखाद्याला ‘काय दिवे लावलेस परीक्षेत?’ इथपासून ते “वंशाला दिवा हवाच” इथपर्यंत दिवा दिसून येतो. अशी इतर कितीतरी उदाहरणे आपल्या रोजच्या जीवनात नेहमीच आपल्याला दिसतात.’दीपक’ किंवा ‘दीपिका’ या मुलामुलींच्या नावातही एक प्रकाशाची ज्योत उजळलेली दिसून येते.

लहानपणी बाळाला घास भरवताना आई त्याला “दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट….” म्हणता म्हणता हाच कुलदीपक कधी मोठा होतो हे तिचे तिलाच कळत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत नित्याच्या देवपूजेतही दिव्याला अनन्यसाधारण महत्व दिलेले आढळते. दिव्याला धार्मिक महत्वही आहेच. जसे सकाळच्या वेळी पूजेत तुपाचा दिवा व संध्याकाळी सांजवात म्हणजेच समईतील तेलाचा दिवा लावावा इत्यादी.

आपल्या संस्कृतीतील सर्वात महत्वाचा सण म्हणजे “दिवाळी” किंवा “दीपावली”. या सणाच्या तर नावातच दिवा आहे. तेव्हा हा खरा दिव्यांचाच सण. यावेळी आपण सर्वजण दारात पणत्या लावतो. आकाशकंदिल लावतो. रांगोळ्या काढून दाराभोवती, देवासमोर सजावट करतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या नेत्रदीपक व नयनरम्य अशा आतषबाजीने सर्व आसमंत दिव्यांच्या लखलखाटाने अगदी उजळून निघतो. मंगलदीप लावल्याने सर्व वातावरण मंगलमय होऊन जाते.

“दिव्यादिव्यांची ज्योत सांगते, तुझी नि माझी प्रीती” किंवा “मालवून टाक दीप
चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात
लाभला निवांत संग” ही काही शृंगारिक रसातील गाणी, तिथेही दिव्याला असलेलं एक वेगळंच प्रेमाचं महत्व !!

त्यानंतर अलीकडच्या काळातील नव्या युगाच्या नव्या परिभाषेत सांगायचं तर ग्लॅमरस फिल्म इंडस्ट्रीतील कुणीतरी प्रसिध्द सेलिब्रिटी किंवा “बाॅलिवूड दिवा”. हा दिवा जरी इंग्रजी भाषेतील असला तरी आपल्या पारंपरिक दिव्याची सर काही या दिव्याला नाही.😊
असो.

तर असे हे दिव्यांचे असंख्य वेगवेगळे प्रकार.
आयुष्यभर सोबत असणारा हा दिवा आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतो. दिव्याशिवाय तर आपण जीवनातील आनंद घेऊच शकत नाही.
“मेरे खयालोंके ऑंगन में कोई सपनोंके दीप जलाए” किंवा “कही दीप जले, कही दिल” असं म्हणत दूरवरचे दिवे आपल्याला कायम खुणावत राहतात.म्हणून तर शेवटच्या क्षणी देखील ‘दिवा विझला’ किंवा ‘ ‘प्राणज्योत मालवली’ असं म्हणताना पण दिवाच असतो साथीला शेवटपर्यंत !!

स्वाती गोखले.

– लेखन : सौ.स्वाती गोखले.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments