गेली काही वर्ष दिवाळीत मला एका गोष्टीची उणीव जाणवतेय ती म्हणजे दिवाळीतली घरी येणारी ग्रिटींग्ज !
किती मजा वाटायची लहानपणी पोस्टमन नी एखादं बंद पाकिट दारातून टाकलं की ! खूपवेळा नातेवाईकांच एखाद खुशालीचं पोस्टकार्डच यायचं.. तुम्ही कसे आहात ?.. विचारणारे.. किंवा आपली खुशाली अडचण सांगणारे.काही वेळा त्यातच एखादी पणती काढून दिवाळीच्या शुभेच्छा असायच्या.. पण शहरातल्या नातेवाईंकांकडून बंद पाकिटात, छापिल गुळगुळीत पेपर वर, छान चित्र असलेलं ग्रिटींग यायचं ! (शाळेत असतांना ती ग्रिटींगकार्डस जमवणं हा बऱ्याच जणांचा छंद असायचा.)cत्यातच हातानी लिहीलेल्या दोन ओळी, सगळ्यांची नांवं..आणि खाली काका, मामा अशी सही..
जवळचं वाटायचं सगळं ते… प्रत्यक्ष भेट झाल्यासारखं वाटायचं..
हळू हळू ह्या ग्रिटींग्जचा आकार, आतली कलाकुसर, कागदाचे पोत, काव्यात्मक मजकूर, किंमती सर्वच बदलायला, वाढायला लागलं. त्यातच नंतर हॅन्डमेड ग्रिटींग्जचा जमाना आला. अनेकांना आपली कलाकुसर, चित्रकला दाखवायला एक नविन गोष्ट मिळाली. ती सुध्दा घरच्या भावा बहिणीनी काढली असली, तर जपून ट्रंकेच्या तळाशी साठवली जायची.
आमचे शाळेतले चित्रकलेचे सर, छोटी ग्रिटींग्ज करायचे. आम्हाला चित्र काढायला सांगायचे आणि ग्रिटींग्जच्या कोपऱ्यात
छोट्या चौकोनात, सुंदर देखावे काढायचे. खाली ब्रशनीच रंगांनी मजकूर लिहायचे. ते ती ग्रिटींग्ज विकत असत. त्यांची बघून मी पण काढायला लागले.
शाळेत असतांनाच मला कोणीतरी टिकल्यांचे डिझाईन असलेलं माझं ग्रिटींग पाहून २५ करून देशील का ? म्हणून विचारलं. मी हो म्हटलं, आणि त्यांनी चक्क त्याचे पैसेही दिले.
मग मी दरवर्षी थोडी ग्रिटींग्ज करायला लागले. ओळखणारे घ्यायला लागले..
कागदावर भरतकाम करून, ओरिगामी करून, कोलार्ज करून, नविन प्रयोग करायला मला आवडायचे. इतरही वाढदिवसाला, प्रेझेंट वर लावायला फुलांची ग्रिटींग्ज करून ठेवत असे मी.

पण जेव्हा पासून मोबाईल आले हातात.. प्रथम शुभेच्छा फोनवर बोलून आणि मग सोशल माध्यमामुळे डिजिटल ग्रिटींग्ज
यांचा जास्त वापर व्हायला लागला आणि हातानी बनवायची ग्रिटींग्ज कमी झाली. पोस्टानी यायची तर बंद झाली. काही बॅंका, बिजनेसवाले अजून पाठवतात पोस्टानी .. पण त्यात ती आत्मियता कशी असणार ?
हल्ली सैनिकांना काही संस्था फराळाबरोबर छोटी ग्रिटींग्ज पाठवतात. ती करतांना मात्र खूप बरं वाटतं. मी ही अशी ग्रिटींग्ज करून सैनिकांना पाठवते.
आता जेव्हा नातवंड शाळेत शिकून, मला प्रेमानी ग्रिटींग्ज देतात तेव्हा ती मी जपून ठेवते.. पूर्वी ट्रंकेच्या तळाशी ठेवायची .. तशीच.अशा जपून ठेवलेल्या, मी केलेल्या ग्रिटींग्जचे काही फोटो पहा.आवडले तर नक्की कळवा..

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800